Jackfruit Rate : अनास्थेमुळे फणस दुर्लक्षित, आर्थिक फायद्यासाठी मार्केटची गरज

Kolhapur Jackfruit : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, शाहुवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील काही भागात फणस मोठ्या प्रमाणात तयार होतात.
Jackfruit Rate
Jackfruit Rateagrowon

Kolhapur Jackfruit Market : सह्याद्रीच्या रांगांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक फणस, जांभूळ आणि डोंगरची मैना म्हणून ओळख असलेल्या करवांदेची मोठी रेलचेल असते. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारे फळ म्हणजे फणस आहे परंतु याची निगा व्यवस्थित होत नसल्याने फणस शेतीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत असल्याचे चित्र आहे. या फळाकडे सरकार अनास्था दाखवत असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हणणे आहे.

आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, शाहुवाडी तालुक्यातील परिसरात फणसाची झाडे आहेत; पण झाडावरून पडून फणस मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे सध्या चित्र आहे. हे दरवर्षीचे चित्र आहे. या फळावर स्थानिक पातळीवर मार्केटिंगसह प्रक्रिया उद्योग उभारल्यास रोजगारनिर्मितीबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल व अर्थकारणाला चालना मिळेल.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाऊस, हवामान व जमीन या गोष्टी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे फळ तयार होते. शेतातील बांधावर डेरेदार अशी फणसाची झाडे पाहावयास मिळतात.

जिल्ह्यातील चंदगड, आजरा, शाहुवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील काही भागात फणस मोठ्या प्रमाणात तयार होतात. मार्चमध्ये फणस बाजारात येतो. जुलै अखेरपर्यंत फणसाची फळे उपलब्ध होतात. फणसाच्या गरापासून फणसपोळी, फणसवडी, पल्प, वेफर्स यासह विविध प्रकारचे २७ पदार्थ तयार होतात. फणसामध्ये पोषण मूल्य अधिक आहेत. त्याबरोबर आरोग्यासाठीही फणस उपयुक्त असल्याने फणस मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.

Jackfruit Rate
Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

फणसामध्ये रसाळ व कापा हे दोन प्रकार आढळतात. यामध्ये कापा फणसाला मोठी मागणी आहे. सध्या फणसाची विक्री रस्त्याकडेला स्टॉल टाकून सुरू आहे. आजरा तालुक्यात फणस विक्रीतून दररोज सुमारे पन्नास हजारांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देणारे फळ सरकार, प्रक्रिया उद्योगाकडून दुर्लक्षित आहे. या फळावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून उत्तम प्रकारे मार्केटिंग केल्यास यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

फणसाच्या झाडांची तोड रोखणे गरजेचे

फणसाच्या झाडापासून उतम दर्जाचे फर्निचर तयार होते. इमारतीसाठीही या लाकडाचा वापर होतो. त्यामुळे काही वर्षांत फणसाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे. अशीच तोड होत राहिल्यास ही झाडे संपण्याची भीती व्यक्त होत आहे. काही पैशांसाठी शेतकरी झाड विकत असेल, तर ते रोखणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमी जी. एम. पाटील, निवृत्ती कांबळे यांनी सांगितले.

फणसाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती होते. औषध फवारणी न करताही फळे लागतात. हे फळ नैसर्गिकरीत्या पक्व होते. यामध्ये पोषणमूल्य अधिक असण्याबरोबर आरोग्यासाठी उपयोग आहे. यातून उपपदार्थ निर्मितीबरोबर मार्केटिंगची गरज आहे.

- विजय गुरव, फणस उत्पादक शेतकरी, देवर्डे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com