Fanas Farming : ‘फणसकिंग’ ठरलेले झापडे येथील देसाई पितापुत्र

Jackfruit Farming : ८६ जातींची विविधता. विविध प्रक्रिया पदार्थांची निर्मिती.
Fanas Farming
Fanas FarmingAgrowon

राजेश कळंबटे

Konkan Farming : रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे येथील हरिश्‍चंद्र आणि मिथिलेश या देसाई पितापुत्रांनी जगभरातील फणसाच्या सुमारे ८६ जातींचे संगोपन करून त्याची बाग विकसित केली आहे.महाराष्ट्रातील या स्वरूपाची ही शासन प्रमाणित पहिलीच ‘नर्सरी’ असावी. सोबतच फणसावर मूल्यवर्धन करून त्यापासून विविध पदार्थही तयार केले आहेत. फणसाची कलमे, पाने परदेशात निर्यातही केली आहेत. हरिश्‍चंद्र देसाई यांनी फणसकिंग अशी ओळखही मिळवली आहे. .

आंबा, काजू ही कोकणातील मुख्य पिके आहेत. मात्र हवामान बदलाच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्तीत ही पिके अडचणीत आली आहेत. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे (ता. लांजा)
येथील हरिश्‍चंद्र व मिथिलेश या देसाई पितापुत्रांनी फणस पिकावर लक्ष केंद्रित करून
त्याचे व्यावसायिक व प्रक्रियेचे मूल्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. .

फणसाच्या ८६ जातींची बाग

तेरा वर्षापूर्वी हरिश्‍चंद्र यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फणसाच्या कापा आणि बरका जातींचे
सर्वेक्षण केले. त्यात कापा पावणेआठ टक्के तर बरका फणस ९२ टक्के असल्याचे आढळले. कापा फणसाला प्रचंड मागणी असल्याचेही लक्षात आले. दरम्यान केरळ येथील तज्ज्ञांशी संपर्क होऊन त्यांच्याकडून ३६ जातीची ४०० झाडे आणली. सन २०१६ मध्ये आपल्या झापडे गावी लागवड केली.
हरिश्‍चंद्र यांचा मुलगा मिथिलेश याने कृषी अभियांत्रिकी विषयातून ‘बी टेक’ पदवी घेतली आहे. सन २०१७ पासून वडिलांसोबत तो फणस विषयातच पूर्णवेळ कार्यरत आहे.

Fanas Farming
Pomegranate Farming : स्वकर्तृत्वातून राज्यातील ‘डाळिंब मास्टर’ ठरलेले पवार

अशी आहे फणसाची बाग

देसाई यांची जगभरातील ८६ विविध जातींची मिळून १५०० झाडांची बाग आहे. त्यात लाल, भगव्या, पिवळ्या, सोनेरी रंगाचे गरे असलेल्या जाती आहेत. डिसेंबर ते जुलै असे प्रत्येक महिन्यात उत्पादन देणाऱ्याही जाती आहेत. प्लॅस्टिक पिशवीत बी रुजत घातली जाते. एक वर्षाच्या रोपांवर कलम
केले जाते. एवढी विविधता असलेली फणसाची शासन प्रमाणित ही राज्यातील पहिली ‘नर्सरी’
असावी. मागीलवर्षी २५ हजार रोपांची विक्री विविध जिल्ह्यांसह परराज्यांमध्येही झाली
आहे. दीड वर्षे वयाची तीनशे कलमे मॉरिशसमध्ये पाठविण्यात आली. २८० ते ३०० रुपये प्रति नग असा त्यांचा दर होता. लागवड केल्यानंतर जातीनिहाय दीड, दोन ते तीन वर्षांनंतर कलमे उत्पादन देण्यास सुरवात करतात. त्याचे मातृवृक्ष बागेतच जपले आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्ये,
युक्रेन, जर्मनी, नायजेरिया, अमेरिकेतील व्यक्तींनी या बागेला भेटी दिल्या आहेत.
केरळ येथे फणस विषयावर २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देसाई पितापुत्रांनी भाग घेतला होता. हरिश्‍चंद्र यांना आता ‘फणसकिंग’ अशी ओळख मिळाली आहे.

फणस भाजीचा विदर्भात ट्रेंड

पूर्वी कोकणात विवाह सोहळ्यांमध्ये फणसाच्या गऱ्याच्या भाजीचा ‘ट्रेंड’ होता. सध्या तो
विदर्भात दिसून येतो. अमरावती येथे फणसाची भाजी आवडीने
खाल्ली जाते. तेथील एका शेतकऱ्याकडे १० झाडे आहेत. विदर्भातील व्यापारी २५ रुपये प्रति किलो दराने जागेवर त्याच्याकडून भाजीच्या उपयोगासाठी फणस घेतात असे हरिश्‍चंद्र सांगितले.

प्रक्रियेत संशोधन (इन्फो)

झापडे येथे मिथिलेश यांनी तीन वर्षांपूर्वी लघु प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. कृषी अभियांत्रिकी विषयातील शिक्षणाचा उपयोग करून नावीन्यपूर्ण पदार्थ बनवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
त्याने तयार केलेले काही पदार्थ पुढीलप्रमाणे.

-कुयरी किंवा छोट्या फणसापासून भाजी. (रेडी टू इट बनविणे शक्य)
-कच्च्या गऱ्यांपासून मधुमेहावर इलाज देणारी पावडर.
-पिकलेल्या गऱ्यांपासून कुरकुरीत चिप्स.
-गऱ्यांपासून बिर्याणी. गऱ्यातील बीपासून पौष्टिक पावडर.
-फणसाच्या पानांना कर्करोगाच्या विकारावर उपाय म्हणून परदेशात मागणी आहे. सन २०२१ मध्ये जर्मनीला पानांची एक टन व त्यापुढील वर्षी पाच टन निर्यात.

शेतकरी कंपनीची स्थापना (इन्फो)

मिथिलेश यांनी २०२० मध्ये ‘जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्यूसर’ ही शेतकरी उत्पादक कंपनी सुरु केली. फणसापासून पदार्थांची निर्मिती,निर्यात यासाठी शासनाच्या ‘स्मार्ट’ योजनेतून पाच कोटींचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे तेराशे टन क्षमतेचे युनिट आहे. त्यासाठी दीडशे टन फणस कच्चा माल म्हणून उपलब्ध आहे. प्रकल्प वर्षभर सुरू राहण्यासाठी पाचशे टन कच्च्या मालाची गरज आहे. उर्वरित माल शेतकऱ्यांकडून घेतला जाणार आहे.

मिथिलेश यांच्या शेतीतील कार्याची वैशिष्ट्ये

-कृषी विभागाकडून युवा शेतकरी पुरस्कारावर उमटवली मोहर.
-राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना तसेच कृषी विभागाची शेतीशाळा,शेतकरी प्रशिक्षण वर्ग याद्वारे फणस पिकात मार्गदर्शन.
-देसाई फणस संशोधन केंद्राचीही केली स्थापना.
-फणस विषयातील आंतरराष्ट्रीय गटात सहभाग.
-शेतीत सेंद्रिय पध्दतीचा अधिकाधिक वापर.
-परिसरातील मृद व जलसंधारण कामे, गावातील सार्वजनिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग.
-लांजा येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत फणस संशोधन केंद्राला ४० कोटी रुपये मंजूर झाले.
त्यासाठी सुमारे आठ वर्षे मिथिलेश यांनी पाठपुरावा केला.
-सुगंधी द्रव्ये निर्मितीतील अगरवूड या वनस्पतीच्या १२०० रोपांची लागवड.


मिथिलेश देसाई- ८२७५४५५१७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com