Pomegranate Farming : स्वकर्तृत्वातून राज्यातील ‘डाळिंब मास्टर’ ठरलेले पवार

Fruit Farming : नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील रवींद्र पवार यांचे नाव राज्यातील आदर्श किंवा ‘मास्टर डाळिंब’ उत्पादक म्हणून घेतले जाते. सुमारे ८५ एकरांत त्यांनी विकसित केलेल्या डाळिंब बागा म्हणजे उत्कृष्ट, काटेकोर व्यवस्थापन, तंत्रज्ञान वापर व यांत्रिकीकरणाचे उदाहरण आहे.
Pomegranate Farming
Pomegranate Farming Agrowon

मुकुंद पिंगळे

Pomegranate Farming in Maharashtra : नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील रवींद्र पवार यांचे नाव राज्यातील आदर्श किंवा ‘मास्टर डाळिंब’ उत्पादक म्हणून घेतले जाते. सुमारे ८५ एकरांत त्यांनी विकसित केलेल्या डाळिंब बागा म्हणजे उत्कृष्ट, काटेकोर व्यवस्थापन, तंत्रज्ञान वापर व यांत्रिकीकरणाचे उदाहरण आहे. एकेकाळी मजूर असलेल्या रवींद्र यांनी संघर्ष, कर्तृत्व, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेच्या बळावर निर्यातक्षम डाळिंब शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेला पट्टा आहे. येथील सातमाने या छोट्या गावात रवींद्र धनसिंग पवार यांचा जीवनप्रवास सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व आदर्शवादी असाच आहे. अत्यंत प्रतिकूल संघर्षातून म्हणण्यापेक्षा शून्यातून पुढे येत त्यांनी राज्यातील आदर्श किंवा मास्टर डाळिंब बागायतदार अशी ओळख मिळवली आहे.

सुरुवातीचा खडतर प्रवास

रवींद्र यांची यांची वडिलोपार्जित अवघी अडीच एकर कोरडवाहू जमीन होती. त्यातून वर्षाकाठी कसेबसे एक दोन पोती धान्य पिकायचे. दरम्यान, वडिलांचे निधन झाले. घरात मोठे असलेल्या रवींद्र यांच्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी १९८३ मध्ये कुटुंबाची जबाबदारी आली. शिक्षण नाइलाजाने सोडावे लागले. त्यामुळे पोटापाण्यासाठी तीन रुपये मेहतान्याने वाद्य वाजविण्यासाठी ते जात.

सन १९८३ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांची बिगारीची तसेच विहीर खोदण्याची कामे केली. सन १९८४ ते १९८७ या कालावधीत रावळगाव साखर कारखान्यात ऊसतोडणी मजूर म्हणून ते राबले. परिस्थिती नाजूक असल्याने संघर्ष वाट्याला होता. पुढे लग्न झाल्यानंतर आई गंगुबाई व पत्नी सुरेखा यांच्या मदतीने घरच्या घरी विहीर खोदली. सन १९८६ मध्ये सासरे जोहरसिंग राजपूत यांनी वीजपंप घेऊन देण्यास मदत केली.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : २० वर्षांपासून डाळिंब उत्पादनात सातत्य

डाळिंब बागेचा अनुभव

दरम्यान, शेती महामंडळाच्या ‘सेक्शन फार्म’वरील व्यवस्थापक संपतराव मोरे यांनी जिद्द पाहून रवींद्र यांना डाळिंब लागवडीचा सल्ला दिला. पण त्यासाठी भांडवलाची गरज होती. पैशांविना काम खोळंबले. त्या वेळी थोरला मुलगा नीलेशचा जन्म झाला होता. मग त्याच्याच कानातील सोन्याच्या बाळ्या विकून पैसे उभे केले. त्यातून तीस गुंठे मुरमाड जमिनीवर खड्डे खोदून गणेश वाणाच्या डाळिंबाची १५० झाडे लावली.

मात्र दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडला. अशा परिस्थितीत मातीच्या वीस घागरी विकत घेतल्या. दोघे सपत्नीक विहिरीतून पाणी उपसून घागरी भरायचे. बैलगाडीतून शेतात आणून प्रत्येक झाडाला पाणी द्यायचे. अशा खडतर प्रयत्नांमधून बाग जगविली. पुढे वाढीच्या अवस्थेत दुष्काळ पडला. विहिरी खोदण्याच्या कामावर जावे लागले. तिसऱ्या वर्षी मात्र बाग धरला. अनुभव नसल्याने काही कच्च्या फळांची तोडणी झाली. एकूण ११ हजार रुपये उत्पन्न मिळाले. स्वतःच्या शेतीतील ही कमाई असल्याने वेगळाच आत्मविश्‍वास आला. हुरूप वाढला.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : डाळिंब शेती संशोधनाची दिशा बदला

शेतीतील प्रगती

परिस्थितीशी चिवट झुंज देत रवींद्र यांनी मग शेतीत प्रयोगशीलता जपली. अनुभवाची जोड देत
ते एकेक पाऊल पुढे टाकत उत्पादन घेत राहिले. सन २००४ मध्ये डाळिंबात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने कामकाज कोलमडले. त्यामुळे पर्यायी मोसंबी, आंबा, संत्री अशी मिश्र लागवड करून पाहिली. मात्र त्यात अपेक्षित उत्पन्न नव्हते. पुढे द्राक्ष लागवड यशस्वी केली. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान व जोखीम अधिक असल्याने डाळिंबावरच सर्व लक्ष केंद्रित केले.


कांदा, स्ट्रॉबेरी, पपई, सीताफळ, शेवगा यासह जरबेरा, कार्नेशिअन, लिली आदी फुलपिकांचेही प्रयोग केले. पुढे जमीन खरेदी केली. त्यातून आज स्वतःची ६० एकर शेती झाली आहे. कराराने ३० एकर घेतली आहे. दोन्ही मिळून सुमारे ८५ एकरांत डाळिंब लागवड केली आहे. चार-पाच एकर क्षेत्र सीताफळ व अन्य पिकांना दिले आहे. अभ्यासूवृत्ती, तांत्रिक शिफारशींचा अवलंब व बाजारपेठांचा अभ्यास यातून वाटचाल होत राहिली. शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन जपला. त्यातून ‘गंगा ॲग्रोटेक फार्म’ची उभारणी केली.

डाळिंब शेतीतील ठळक बाबी

-आज सर्वाधिक सुमारे ८५ एकरांत डाळिंब हेच मुख्य पीक. सुपर भगवा वाणाची लागवड
-लागवडीचे अंतर- १४ बाय १० फूट, एकरी झाडांची संख्या सुमारे ३११.
-पूर्वी द्राक्ष बाग असलेल्या ठिकाणी मागील वर्षी डाळिंब घेतले. १५ बाय १० फूट अंतरावर ही लागवड.
-बाजारपेठेतील जोखीम कमी करणे व गुणवत्ता जपणे यासाठी ८५ एकरांचे तीन बहरांसाठी तीन समान भाग केले. त्यानुसार एका भागात मृग, दुसऱ्या भागात हस्त व तिसऱ्या भागात
आंबिया बहराचे नियोजन. प्रत्येक भागात एकच बहर घेण्यात येतो. रवींद्र सांगतात, की मृग बहरात अधिक परतावा मिळतो. मात्र जोखीम अधिक असते. आंबिया बहरात पावसाळ्याच्या अगोदर आर्द्रता असते. त्या वेळी तेलकट डाग रोगाचा धोका असतो. हस्त बहरत परतीचा मॉन्सून आल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यानुसार व्यवस्थापन करावे लागते.
-आटपाडी, सांगोला या डाळिंब उत्पादक पट्ट्यात फिरून तेलकट डाग रोग नियंत्रित करण्याचे तंत्र अभ्यासले. मर्यादित सिंचन व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास हा प्रादुर्भाव कमी होतो हे अभ्यासले. त्यानुसार नियोजन ठेवले. आता प्रति झाड उन्हाळ्यात तिसऱ्या दिवशी ४० लिटर, हिवाळ्यात १५ ते २० लिटर, तर पावसाळ्यात वाफसा अवस्था असे जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन केले आहे

जमिनीची सुपीकता

-पिकांच्या विश्रांती कालावधीत पावसाळ्यात हिरवळीचे खत म्हणून धैंचा, ताग पेरणी. बायोगॅस स्लरी वापरातून जमिनीत गांडुळांची नैसर्गिकरीत्या वाढ.
- बोदावर पीक अवशेष, पालापाचोळा, तण, मका चाऱ्याची व सोयाबीन कुट्टी, उसाचे पाचट वापरून
सेंद्रिय आच्छादन. हे अवशेष जागेवरच कुजविले जातात. शेणखत प्रति झाड सुमारे दोन क्रेट (३४ किलो) यांचा दरवर्षी वापर. गुजरातहून ते मागविण्यात येते. बोन मिल, शेंगदाणा, एरंडी पेंड यांचाही वापर.
-रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक व सेंद्रिय निविष्ठांवर अधिक भर. बायोडायनमिक पद्धतीने कंपोस्ट खत बेडनिर्मिती. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस आदी मित्रबुरशींचा वापर.
-जिवामृत, सूक्ष्मजीव कल्चर, वेस्ट डी कंपोजर यांचा वापर.
-या सर्व प्रयत्नांतून मागील वर्षी केलेल्या माती परीक्षणात जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यावर आल्याचे रवींद्र यांनी सांगितले.
- फवारणी, उत्पादन तसेच जमा खर्च यासाठी मराठी भाषेतून वापरता येणाऱ्या सॉफ्टवेअर वापर.

दहा किलोमीटवरून पाइपलाइनद्वारे पाण्याची उपलब्धता. प्रत्येकी तीन कोटी लिटर शेततळ्यांची उभारणी. संपूर्ण क्षेत्रावर केंद्रीकृत पद्धतीने इनलाइन ठिबक सिंचन व्यवस्था. फवारणीसाठी आवश्यक पाण्याचा पीएच टीडीएस नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा.
-जमीन खडकाळ असल्याने सुरुवातीला सपाटीकरण. पाण्याचा निचरा होईल या पद्धतीने उताराची रचना
-एकात्मिक पीक संरक्षणासाठी पिवळे स्टिकी कार्डस्, फेरोमोन ट्रॅप्स, फळमाशी सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदींचा वापर
-हवामान बदलानुसार सिंचन, किडी-रोगांबाबत पूर्वसूचना देणारे सेन्सर आधारित स्वयंचलित हवामान केंद्र शेतात बसविले.
-गुणवत्तापूर्ण फळे देणाऱ्या झाडांची निवड करून गुटी पद्धतीने रोपे तयार करून नवीन बागांचा विस्तार.
-शेताच्या चारही बाजूंनी साग व निलगिरी लागवड करून वनभिंतींची रचना.
- सुमारे ७५ मजुरांसाठी निवास व्यवस्था
- शेतीशी बोलता आले पाहिजे, ती समजून घेता आली पाहिजे, कुणी सांगते म्हणून नको तर आपण निर्णय घेऊन पुढे गेले पाहिजे अशी रवींद्र यांची धारणा आहे.

मागील तीन वर्षांचे उत्पादन- एकरी १० ते १३ टन

विक्री व्यवस्था


-निर्यातक्षम ३५० ते ४०० ग्रॅम व कमाल ९०० ग्रॅम वजनापर्यंत फळ.
- बाजारपेठा- युरोप, मलेशिया, रशिया, दुबई, बांगलादेश, श्रीलंका येथे १० वर्षांपासून निर्यात
(निर्यातदारांमार्फंत). सर्वाधिक निर्यात बांगलादेशात.
-देशांतर्गत बंगळूर कोलकाता, जयपूर, इंदूर, सुरत, अहमदाबाद, वाराणशी येथे विक्री.
-सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत दर स्थिर; त्यानंतर राजस्थान, गुजरात राज्यांतील मालाची आवक सुरू होऊन दर कमी होतात.

मिळालेले दर रु. (प्रति किलो)

वर्ष....किमान...कमाल...सरासरी

२०२०...१००...१८०...१३०

२०२१...८०...१३०...१००

२०२२...१००..१४०...१२०

बांधावरचा संशोधक

मजूरटंचाईच्या आव्हानावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने काही यंत्रे रवींद्र यांनी विकसित केली. काही आपल्या बुद्धिकौशल्यातून विकसित करताना बनवून घेतली. त्यात ट्रॅक्टरचलित तणकाढणी,
खत वापरण्यासाठी बोद कोरणे, खत टाकण्याचा गाडा, खत बुजवणी आदी यंत्रांचा समावेश
आहे. यात शिवाजी भोरकडे यांची मदत झाली आहे. पूर्वी खत टाकण्याचा खर्च प्रति झाड २० रुपयांपर्यंत येत असे. आता यंत्राद्वारे तो अवघा दोन रुपये येतो आहे. तणकाढणी यंत्र पाच लिटर डिझेलमध्ये १० एकरांवर सुमारे सहा तासात काम करते. यातून मजुरी खर्चात निम्म्याहून अधिक बचत होते.

संपूर्ण क्षेत्राला प्लॅस्टिक आच्छादन

फळवाढीच्या काळात सनबर्निंगमुळे फळांना डाग पडणे. फळे पक्वतेला येण्याच्या काळात गारांसह किंवा अवकाळी पाऊस पडणे, रोगांचा प्रादुर्भाव, फळाला रंग न येणे अशा अनेक अडचणी सतत येत
असतात. त्यावर उपाय शोधण्यासाठी सुरुवातीला इटलीहून एकरी दीड लाख रुपये खर्च येणारे प्लॅस्टिक नेट आयात केले. त्याचा द्राक्षशेतीत वापर केला. पण पुढील वर्षी ते फाटले. त्यानंतर एकेठिकाणी दुकानात गेले असता ओढणी वस्त्राच्या नेटचा शोध रवींद्र यांना लागला. त्यावर अधिक संशोधन व अभ्यास करून आपल्याला हव्या तशा आच्छादनाची निर्मिती त्यांनी संबंधित व्यावसायिकाकडून करून घेतली. त्यातून २२ मेश जाडीचे आच्छादन तयार करून घेण्यास यश आले. आज त्याचा वापर
संपूर्ण डाळिंब बागेत केला आहे. रंग, आकार येणे तसेच तेलकट डाग रोगाला रोखणे आदी कारणांसाठी त्याचा फायदा होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) शास्त्रज्ञांनी या पद्धतीचा अभ्यास केला आहे.

कृषी ज्ञानाची भूक कायम

हाडाचा शेतकरी असल्याने रवींद्र यांनी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी राज्यातील संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे (उदा. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ), कृषी विज्ञान केंद्रे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत सुधारणा केल्या. सन २०१८ मध्ये जागतिक पातळीवर संधी व बाजारपेठ अभ्यासण्यासाठी दुबई येथे दौरा केला. मुलगा नीलेश याने २०१५ मध्ये इस्त्राईलचा दौरा करून अत्याधुनिक ठिबक सिंचन पद्धतीची पाहणी केली. ड्रोन फवारणी चाचण्याही घेतल्या आहेत.

झोपडीतून बंगल्यात

कधी काळी अतीव कष्टातून शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले. मात्र बंगला, गाड्या खरेदीला प्राधान्य न देता त्या उत्पन्नातून शेतीचा विकास केला. सुमारे बारा वर्षे या कुटुंबाने आपले आयुष्य झोपडीत काढले. आज झोपडीतून बंगल्यात असा या ऊसतोड मजुराचा प्रवास प्रगतिशील शेतकऱ्यापर्यंतचा प्रवास आदर्शवत झाला आहे. राज्य डाळिंब बागायतदार संघाकडून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २०१८ मध्ये ‘डाळिंबरत्न पुरस्कार’ त्यांना मिळाला. कृषी विभागाकडून शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मान झाला. कृषिमंत्री दादा भुसे, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, आंतरराष्ट्रीय द्राक्षतज्ज्ञ ओ. रॉड्रिगो आदींनी बागेला भेटी दिल्या आहेत. त्यांच्या गुणवत्तापूर्ण फळांची प्रसंशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही केली आहे. वडिलांचा हाच वारसा नीलेश व ज्ञानेश्‍वर ही मुले चालवीत आहेत. रवींद्र यांनी आपल्या साडूचा अनाथ झालेला मुलगा सुनील मंगलसिंग पवार यास आपल्याच मुलगा मानून आपल्या कुटुंबाचा भाग बनविले आहे. त्याचे लग्न करून त्याचा संसार उभा केला आहे. तोही शेतीतच आहे.


रवींद्र पवार, ९८२३०३३६००
नीलेश पवार, ९८२३०६८६६६
ज्ञानेश्‍वर पवार, ८२०८३७०६८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com