Agriculture Business Training : महिलांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविणे आवश्यक

Women's Empowerment In Agriculture : ग्रामीण महिलांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविणे आवश्यक आहे. बचत गटांच्या महिलांना योग्य दिशा मिळाली, तर ग्रामीण भागातही दिशादर्शक काम होऊ शकते. यातून शाश्‍वत शेती आणि ग्रामजीवनाचे स्वप्न साकार होईल.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

कांचनताई परुळेकर

ग्राम आणि शेती विकासात महिलांचे अनन्यसाधारण योगदान आहे. पुरुषांइतकेच महिलांचे योगदान महत्त्वाचे असले, तरी आजही निर्णय प्रक्रियेत त्यांना फारसे मानाचे स्थान नाही. ग्रामविकासामध्ये महिलांना जास्तीत जास्त सहभागी होता यावे यासाठी शासनाने आरक्षण दिले.

याचा अनेक ठिकाणी चांगला फायदा झाला. उपक्रमशील महिलांना ग्राम विकासात प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली. मात्र अजूनही ७५ टक्के महिलांना पुरुषांच्या निर्णयाशी सहमत होऊन गाव कारभार करावा लागतो.

प्रस्थापित राजकीय व्यक्तीची पत्नी किंवा कुटुंबातील महिला सदस्यांना राजकीय व्यासपीठ मिळते. अशाप्रकारे सत्तेवर आलेल्या या महिला पतीच्या इशाऱ्यावर राज्यकारभार करतात.

ग्राम विकासात सर्वसामान्य महिलांना मानाचे स्थान मिळविण्यासाठी त्यांना योग्य संधी मिळण्याबरोबरच प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे शेती तसेच कुटुंब विकासासाठी महिलांना मार्गदर्शन मिळू शकते.

मला प्रगती करावीशी वाटते, मी करू शकते, मी हे करीनच हे वाक्‍य महिलांच्‍या मनावर ठसविले गेले पाहिजे. यासाठी त्यांना नवीन व्यवसायाचे, शेती प्रगतीचे प्रशिक्षण दिले पाहिजे. पण हे प्रशिक्षण देताना पुस्‍तकी स्वरूपात देऊन फारसा फायदा होत नाही. महिलांचा वावर जेथे असतो तेथे जाऊन प्रशिक्षित केल्यास नक्कीच अपेक्षित सुधारणा होऊ शकतात, असा आमचा अनुभव आहे.

भजन, कीर्तन, यात्रेच्या काळात महिलांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. हे प्रशिक्षण त्यांच्या रिकाम्या वेळेत दिले गेले पाहिजे. प्रशिक्षण घेताना महिलेवर कसलाही दबाव असता कामा नये. स्वयंस्फूर्तीने ती प्रशिक्षणात सहभागी होणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण तीन तासांच्या वर जाता कामा नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे झाले तरच प्रशिक्षण फलदायी ठरू शकते.

Agriculture
Indian Dog Breed : देशी श्वानांच्या विविध प्रजाती तुम्हाला माहितीयेत का?

प्रशिक्षणासाठी सोशल मीडियाचा वापर

आम्ही खेड्यापाड्यातील लाखो महिलांना विविध व्यवसायांत पारंगत केले. यासाठी सहज प्रशिक्षण दिले. महिलांच्या वेळेत वेगळ्या पद्धतीने महिलांशी संवाद साधला. विविध अभ्यास दौऱ्यांचा आधार घेतला.

महिलांचे गट करून त्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या सहली घडविल्या. केवळ सहली न घडवता यातून थेट प्रशिक्षण दिले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. महिलांनी सहजपणे ज्ञान मिळविले.

याबरोबरच आम्ही प्रत्येक गावात शेतीतील नवीन संशोधनाची प्रात्यक्षिके आयोजित करतो. लॅपटॉपच्‍या माध्यमातून महिलांशी संवाद साधला. नव्या पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर फायदेशीर ठरतो.

संस्थेच्या वतीने बचत गट संकल्पना आणि उद्योजकीय प्रेरणा यांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहेत. गरीब गरजू १५० विद्यार्थिनींना दरवर्षी शिष्यवृत्ती, गणवेश, आर्थिकसाह्य केले जाते. येथे शिकणाऱ्या मुली तीन हजारांपासून ते तीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात.

शिवणकाम, रेक्झीन पर्सेस, क्रोशा, स्वेटर, ब्यूटी कल्चर, स्क्रीन प्रिंटिंग, योगासने, हस्तकला, भरतकाम, ग्रंथालय चालवणे, अभ्यास वर्ग, संस्कार वर्ग, काउंटर सेल्समनशिप, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर कार्यशाळांचे काम अव्याहत सुरू आहे. महिलांच्या अंगभूत कौशल्यांना बळ देण्याचं काम संस्थेने केले.

महिला उत्पादित करत असलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी संस्थेने सर्वतोपरी मदत केली. महिलांच्या उत्पादनाचे विविध ठिकाणी स्टॉल्स लावले जातात. दर बुधवारी संस्थेच्या आवारात महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचा बाजार असतो. त्यामुळे कोल्हापूर शहरातील लोकांनी ही उत्पादने खरेदी करता येतात.

महिलाच बनल्या ‘रोल मॉडेल’

आमच्या संस्थेचे राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी आदी दुर्गम भागातही पोहोचले आहे. इथे आव्हान असते ते ग्रामीण मानसिकतेचे. महिलांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण उद्योजक बनविणे आवश्यक असते.

अनेक बचत गट केवळ नावापुरते असतात. त्यांना छोट्या-छोट्या उद्योगातून बळ देण्याचे काम आपल्याला करावे लागेल. बचत गटांच्या महिलांना योग्य दिशा मिळाली तर ग्रामीण भागातही दिशादर्शक काम होऊ शकते. आम्ही राबविलेल्या प्रकल्पातील काही महिला संस्थेच्या ‘रोल मॉडेल’ बनल्या आहेत.

आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक ताण यामुळे जीवन संपवायला निघालेल्या महिलांनाही स्वयंसिद्धाच्या आधारामुळे आयुष्याचा अर्थ गवसला, जगण्याची उमेद मिळाली. प्रत्येक गावामध्ये असे काम उभे राहण्याची गरज आहे.

बचत गट वगळता ‘स्वयंसिद्धा‘ने सामुदायिक शेतीचा प्रयोग राबविला. पारंपरिक भात शेतीत असणाऱ्या महिलांना चारसूत्री पद्धतीने भात लागवडीसाठी प्रवृत्त केले. यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाली. पारंपरिक जातींची लागवड करणाऱ्या काही प्रयोगशील महिलांना काही प्रमाणात बासमती जातीची लागवड करण्यासाठी प्रवृत्त केले.

यामुळे भाताला चांगला दर मिळून महिलांचे जीवनमान सुधारले. ग्रामीण बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन गिरिराजा कोंबडीपालनाला प्रोत्‍साहन दिले. यामुळे अनेक उद्योजिका घडविता आल्या. काहींची उलाढाल तर कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

Agriculture
Bio-Tech International Conference : बायोटेक्नॉलॉजी फॉर बेटर टुमारो विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

माहिती तंत्रज्ञानाची साथ घ्या...

भारतीय शेतीत बहुतांशी निर्णय पुरुष शेतकरी घेतात. पण इस्राईल, चीन, स्वीडन, फ्रान्स या देशात शेतीतील महत्त्वाचे निर्णय महिला शेतकरी घेतात. तेथे समानता आहे. प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेमध्येही महिलांना मानाचे स्थान आहे.

या महिला शेती आणि पूरक उद्योगात माहिती तंत्रज्ञानाचा चांगला वापर करतात. असे चित्र भारतात निर्माण झाल्यास शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढून त्यांचे जीवनमान उंचावू शकते. योग्य पाणी वापर, बियाणे, शेती प्रक्रियेत यांत्रिकीकरण आदींचा वापर करून बाजारपेठ काबीज करणे शक्य आहे.

आधुनिक शेती तंत्र आत्मसात करा, असा माझा ग्रामीण भागातील मुलींना सल्‍ला आहे. आपण आत्मसात केलेल्‍या शेती ज्ञानाची माहिती घरातील पालकांनाही द्यावी. शेतकरी नवरा नको या पालुपदापेक्षा सुशिक्षित, सुधारित पद्धतीने शेती करणारा शेतकरी नवरा निवडा. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात शेतीचा समावेश करण्यासाठीचा आग्रह धरा, असा माझा आग्रह आहे.

ग्रामीण भारत आता वेगाने बदलत आहे. तो अधिकाधिक शहरीकरणाकडे झुकत आहे. महाराष्‍ट्र, पंजाब ही राज्ये शेतीमध्ये अग्रेसर आहेत. मात्र राजकारणामुळे गावे उध्वस्त होत आहेत. नवी पिढी निष्क्रिय होत आहे.

अलीकडे काही प्रमाणात कृषी पर्यटन, ग्रामीण अभ्यास दौरे यामुळे आयटी क्षेत्राला कंटाळलेली पिढी शेतीकडे वळत आहे. ही समाधानाची बाब आहे. इस्राईलचे माजी पंतप्रधान बेन गुरियन यांनी ‘आठवड्यातील एक दिवस शेती’ हा उपक्रम राबवला होता.

आपल्या देशातही हा उपक्रम घेण्याची गरज आहे. असे झाले तर शेतीत किती कष्‍ट आहेत, पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांची धडपड नव्या पिढीच्या लक्षात येईल. शेतीकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन सुधारून शाश्‍वत वैभव प्राप्त होईल.

कांचनताई परुळेकर - संपर्क - ०२३१-२५२५१२९ -(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.) (शब्‍दांकन - राजकुमार चौगुले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com