Maharudra Mangnale : अवकाळीमुळं हंगामच बदलतोय की काय?

महिन्यातील पाऊस १००मि.मी.च्या पुढे गेला असेल.जून सारखंच आभाळ गर्जणं,विजांचा कडकडाट सुरू आहे. हे सगळं बघून त्यांनी पावसाळा सुरू झाल्याचा अंदाज बांधून उत्सव सुरू केला असेल तर, त्यांना कसा काय दोष देणार? त्यांचे फोटो काढले.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Unseasonal Rain Update : काल सायंकाळी सहाच्या सुमारास शिरूरला पोचलो तेव्हा जोरदार पाऊस पडून गेलेला.नरेशने कसरत करीत चार चाकी कशीबशी शेतात आणली.रस्त्यावर सगळीकडं चिखल.जागोजाग पाणी साचलेलं.डोंगरातून येणाऱ्या ओढ्यातून गढूळ पाणी आलेलं.

मी अंदाज केला,१५ मि.मी.पाऊस झाला असावा.बॅग ठेवून शेततळ्यावर दहा मिनिटे फिरलो.चपलेला चिखल पकडत होता.परत येऊन जेवण केलं.आठ वाजताच डाटा बंद करून मच्छरदाणीत आडवा झालो.थकव्यामुळं झोपून गेलो.

एका पक्ष्याच्या अनोळखी आवाजाने जाग आली.पहाटेचे साडे- चार वाजले होते.ही काही पक्ष्यांनी किलबिलाट करायची वेळ नव्हती.त्याची काहीतरी अडचण असावी.पाणी पिऊन तसाच पडलो.तासाभराने विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला.

बहूतेक सगळे ओळखीचे ध्वनी.काही वेळात उठलो.फ्रेश होऊन शेततळ्यावर पोचलो.तिथले आवाज ऐकून मी हादरलोच.किमान पन्नास - साठ बेडकांचे डऱ्यावं...डऱ्याव सुरू होतं.नुसता कलकलाट.मला पहिला प्रश्न पडला,ही एवढी बेडकं अचानक शेततळ्यात गेली कशी? आतापर्यंत काही बेडकं दिसत होती पण ही तर शेकड्यांवर होती.

आरडाओरडा करीत त्यांचा हनिमून चालू होता.हे दृश्य पावसाळ्यात कुठल्याही पाण्याच्या डबक्यात हमखास बघायला मिळते.उन्हाळ्यात गायब झालेली बेडकं, पाणी साचलं की त्यात आरडाओरडा करीत येतात.

सकाळी आणि सायंकाळी त्यांच्या कर्कश आवाजाने ते वातावरण भारून टाकतात. ही आता कशी काय उगवली आणि पावसाळ्यातलं सारखं त्यांचं वर्तन कसं काय?

Rain Update
maharudra mangnale: महारुद्र मंगनाळे यांच्या नजरेतून व्हिएतनामची सफर

थोडा वेळ विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, बेडकांचा असा समज झालाय की पावसाळा सुरू झालाय.सतत महिनाभरापासून ढगाळ वातावरण,झड,मोठा पाऊस चालूच आहे.सलग चार दिवसातील पाऊसच ७० मि.मी.च्या आसपास झाला असावा.

महिन्यातील पाऊस १००मि.मी.च्या पुढे गेला असेल.जून सारखंच आभाळ गर्जणं,विजांचा कडकडाट सुरू आहे. हे सगळं बघून त्यांनी पावसाळा सुरू झाल्याचा अंदाज बांधून उत्सव सुरू केला असेल तर, त्यांना कसा काय दोष देणार? त्यांचे फोटो काढले.व्हिडीओ बनवला.शिवाजी आपटे या मित्राशी याच विषयावर बोललो. विशेष म्हणजे,आज शंखातून बाहेर पडून फिरणाऱ्या गोगलगाईंही बऱ्याच दिसल्या.

तळ्यावरून विहिरीवर गेलो. आत डोकावून बघितलं तर,पाच- सहा चांगलेच पाझरे सुरू झाले होते.हे दृष्य जुलैमध्ये दिसते.कडूलिंबाची झाडं उन्हाळ्यात हिरवीच असतात.पण या पावसामुळे सगळ्याच झाडांना टॉनिक दिल्यागत तजेली आलीय.

झाडं बघत बघत हटकडं निघालो.या दिवसात सीताफळाच्या झाडांची पानगळ झालेली असते.झाडं वाळलेली खराट्यागत दिसतात.मान्सूनपूर्व पाऊस झाला की, ही हिरवी व्हायला सुरू होतात.पण या सलगच्या अवकाळी पावसाने सगळी झाडं हिरवीगार झालीत.काहींना फुलं दिसताहेत.

बागेलगतच्या ज्या झाडांना सतत पाणी मिळतयं तिथं बोराएवढी सीताफळ तयार झालीत.आता सगळ्याच झाडांना फुलं लागली तर,ऐन पावसाळ्यात सीताफळं येतील.तिच्यात अळ्या होणार.ती खाण्यायोग्य असणार नाहीत. म्हणजे या अवकाळीने फळांच्या हंगामाचं गणितच बदललं.आता सगळ्याच सीताफळाच्या झाडांची कटींग करावी लागेल.

हा विषय केवळ सीताफळांपुरता मर्यादित नाही.पेरूंना सध्या अजिबात पाणी नकोय.पण या पाण्यामुळे त्यानाही भरपूर फुलं लागलीत.छोटे पेरू तयार झालेत.हे सगळे तोडून टाकावे लागते.विशिष्ट फळझाडांना उन्हाळ्यात मुद्दाम पाण्याची तडण दिली जाते...आता तेही गणित चुकलंय.

तापलेल्या रानावर पाऊस पडला की,पेरणी करायची ही शेतकऱ्यांची इच्छा तर पूर्ण होणारच नाही.या अवकाळीमुळे पेरणीचा पाऊस लांबेल,अशी सर्वजणच भीती व्यक्त करताहेत.अर्थात ही भीतीच आहे.हवामान खात्याने तसा काही अंदाज व्यक्त केलेला नाही.पण पाऊस लांबेल,कमी पडेल, दुष्काळ पडेल...अशी भीती या अवकाळीनं निर्माण केलीय,हे नक्की.

आज मी,नरेश ,सविता या विषयावर बोललो.मी माझं नेहमीचं प्रतिपादन केलं...आपण शेती करण्यासाठी इथं आलेलो नाही.निसर्गात राहाण्यासाठी इथं आलोय...आणि इथं राहातोय म्हणून शेती करतोय.त्यामुळं त्याची चिंता आपण करायची गरज नाही!

नरेश बोलला,पण दोन माणसांची पगार कशी निघणार? मी म्हटलं, आजपर्यंतच असं एकही वर्ष नाही की,ज्यावर्षी दोन गड्यांच्या पगारी शेतातून निघाल्या.म्हशीपालनातही बहुतेक वर्षी शेणच उरलं.तू तर गाडीचा चालक आहेस.मुक्तरंगच्या कामासाठी तू आहेस.तुझ्या पगारीचा विषय नाही.दुसऱ्या माणसाची निम्मी अधिक पगार निघाली तर ठिक...नाहीतरी ठिक.

नरेश अस्वस्थ होऊन बोलला,असं कसं जमेल मामा, दरवर्षी नुकसान कसं सहन करणार.मी म्हटलं, लातूरमध्ये आम्हाला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रूपये लागायचे.इथं पाच हजारात भागतं.ते लाखभर रूपये वाचले.माझा लातुरातील हॉटेलिंगचा खर्च महिना दहा- बारा हजार रुपये होता.ते लाखभर वाचले.म्हणजे दोन लाख तर असेच निघाले. याच्या पुढच्या तुझ्या लक्षात न आलेल्या काही गोष्टी सांगतो तुला.

मी दोन वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात एका मित्रासोबत कृषि पर्यटन बघायला गेलो होतो.पाच- पंचवीस झाडांच्या मधे काही खोल्या बांधल्या होत्या.तिथं एक रात्र थांबण्याचे चार हजार रूपये घेतले होते.तेव्हा मी चकित झालो.तो मालक बोलला, झाडांच्या सानिध्यात राहायचं तर अधिक पैसे लागतीलच.ते मलाही पटलं.

तो हिशोब केला तर, महिन्याला बारा हजार हेच होतात.एका कुटुंबाचे.इथं तर आपण तीन कुटुंब राहतो.शिवाय आपण तर पाचशे झाडांच्या सहवासात राहातो... त्यामुळं या राहण्याचं जास्तच भाडं आकारावं लागेल....कर हिशोब...

आणि इथं आपण ज्या हवेत राहातो,तशी हवा कुठल्या शहरात मिळते का? जर मिळत नसेल तर,त्या शुध्द हवेचे काही ना पैसे लावावेच लागतील ना?...कर हिशोब.

भल्या सकाळी पक्ष्यांचे आवाज बाहेर ऐकायला मिळतात का?...कर हिशोब.आपल्या बागेत आपण जी फळं खातो,तशी फळं बाहेर मिळतात का?...तो बोलला, नाही मामा. मी म्हटलं,याचे काही पैसे लाव आणि कर हिशोब.. आता नरेश डोकं खाजवू लागला.

मी म्हटलं,अशा आणखी किती तरी बाबी आहेत,ज्या पैसे मोजूनही आपण बाहेर अनुभवू शकत नाही.

Rain Update
Sudhir Mungantiwar : नागपुरात १०० एकरांवर ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र

आपण शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी नाही.शेती आपली आवड,छंद आहे.लोक नाही त्या छंदावर नको तेवढे पैसे खर्च करतात.आपला हा छंद चांगला आहे.आपल्याला तंदूरूस्त ठेवणारा आहे. त्यामुळं शेतीची चिंता करायची नाही.

हवामान बदलावर आपण कितीही बोललो,चिंता व्यक्त केली तरी परिस्थिती बदलणार आहे का? नाही.कारण ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नसतानाही,त्याचे परिणाम भोगणं अपरिहार्य आहेआपल्याला.निसर्गाबाबत आपण काहीच करू शकत नाही.‌.पण

आपण निसर्गपूरक वागून आनंददायी जगू शकतो... आपण फक्त तेवढंच करायचं... आनंददायी शेती!

हो मामा म्हणत नरेश गेला...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com