.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वैभव कापडणीस
Guava Production : पेरू हे फळ जागतिक पातळीवर महत्त्वाचे असून, फळांच्या पूर्ण उत्पादनात पेरूचे स्थान चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा साठपेक्षा अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. पेरू उत्पादक देशांमध्ये भारत, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, केनिया, संयुक्त अमेरिका आणि पाकिस्तान हे देश अग्रस्थानी आहेत.
भारतातही बहुतांश सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पेरूची लागवड असली तरी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब व तमिळनाडू ही मुख्य उत्पादक राज्ये आहेत. देशात पेरू लागवड जवळपास १८२ हजार हेक्टरवर आहे. त्यामधून १८.२३ दशलक्ष टन पेरूचे उत्पादन प्राप्त होते. क्षेत्रफळाच्या बाबत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने कर्नाटक हे राज्य अग्रस्थानी असून, त्यानंतर पंजाब, बंगाल व गुजरात यांचा क्रमांक लागतो. म्हणजेच महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित एकरी उत्पादन घेण्यामध्ये आपण कमी पडतो. हे लक्षात घेऊन लागवडीच्या नव्या पद्धतीकडे वळण्याची गरज आहे. विशेषतः पेरू लागवडीसाठी दोन झाडे व दोन ओळींतील अंतर कमी ठेवून कमी क्षेत्रफळात जास्त झाडे ठेवणे गरजेचे आहे. त्याचा सघन किंवा अतिसघन लागवड असे संबोधले जाते.
लागवड आणि छाटणी पद्धत
अतिसघन लागवडीमध्ये दोन ओळींतील अंतर २ मीटर व दोन झाडांतील अंतर १ मीटर ठेवले जाते. त्यामुळे प्रतिहेक्टर ५००० झाडे बसतात. लागवडीनंतर झाड व्यवस्थित स्थिर झाल्यावर त्याला ४० ते ५० सेंटिमीटर उंचीपर्यंत वाढू दिले जाते. ५० सें.मी. उंचीवर पूर्ण झाड छाटून घेतले जाते.
या छाटणीनंतर पंधरा ते वीस दिवसांत झाडाला नवीन फांद्या फुटू लागतात. या नवीन फांद्यांमधील फक्त तीन ते चार सशक्त फांद्या राहू दिल्या जातात. तीन ते चार महिन्यांनंतर परिपक्व झालेल्या या फांद्या परत पन्नास टक्के कापून घेतल्या जातात. त्या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन फांद्या फुटतात.
यातून झाडांना आवश्यक तितक्या आणि मजबूत फांद्या राहतात. यामुळे झाडाला व्यवस्थित आकार येतो. या फांद्या पुन्हा चार महिने व्यवस्थित वाढू दिल्या जातात. त्यानंतर पुन्हा एकदा झाडाची उंची नियंत्रित राहावी म्हणून ५० टक्के परत एकदा छाटल्या जातात. यानंतर आलेल्या नवीन फांद्यांवर येणारी फुले जपली जातात.
या छाटणी पद्धतीमुळे झाडाचा आकार लहान राहून कमी क्षेत्रात अधिक झाडे उत्पादनक्षम राहतात. एका वर्षांनंतर छाटणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत केली जाते. या छाटणीनंतर फुटलेल्या नवीन फांद्यांवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात फुले लागण्यास सुरुवात होते. सामान्यतः फळधारणा ऑगस्ट महिन्यात होते.
बॅक प्रूनिंग : अति सघन पद्धतीमध्ये झाडाची उंची एक ते दीड मीटरपर्यंतच ठेवली जाते. झाडामध्ये फळ धारणा होणाऱ्या भागांची वाढ होण्याकरिता झाडाचा घेर (कॅनोपी) व्यवस्थित नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. या पद्धतीत ६ ते ७ वर्षांनंतर जेव्हा फळधारणा होणारे भाग कमी होत जातात, तेव्हा संपूर्ण झाडाच्या ५० टक्के भाग छाटून टाकला जातो. परत वरील प्रमाणे छाटणीची प्रक्रिया राबवली जाते.
पाणी आणि अन्नद्रव्ये नियोजन
पेरूच्या अतिसघन बागेत झाडांचे वय, जमिनीचा व मातीचा प्रकार यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. सामान्यतः नत्र : स्फुरद : पालाश (N:P:K) = ३५०:२४०:२०० ग्रॅम प्रति झाड असे प्रमाण ठेवावे.
उत्पादन
पारंपरिक पद्धतीने लागवड केल्यास लागवडीपासून दुसऱ्या वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात होते आणि हेक्टरी १२ ते २० टन एवढे उत्पादन मिळते. मात्र अति सघन पद्धतीने लागवड केल्यास पहिल्या वर्षापासूनच उत्पादन सुरू होते. छाटणी तंत्रज्ञान आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन यातून सघन लागवडीतून चांगले उत्पादन मिळते. ते वाढत वाढत व हेक्टरी ४० ते ६० टन इतके मिळू शकते.
छाटणीचा फ्लो चार्ट
अति सघन पद्धतीने लागवड अंतर (२ ×१ मी)
१ ते २ महिन्यानंतर झाड सेट झाल्यावर जमिनीपासून ४० सेंमी अंतरावर कट करावे.
कट केलेल्या जागेखालून नवीन फुटवे येतात
त्यातील समान अंतरावरचे ३ ते ४ फुटवे वाढू द्यावे.
३ ते ४ महिन्यांनी या फुटव्यांची छाटणी करावी (५० टक्के कापावे)
कापलेल्या जागेखालून नवीन फुटवे येतील.
३ ते ४ महिन्यांनी या फुटव्यांची छाटणी करावी. (५० टक्के कापावे)
आता नवीन आलेल्या फुटव्यांवर फुले येतील.
दरवर्षी या झाडांवर छाटणी करावी. (५० टक्के कापावे)
झाडाचा आकार लहान राहण्यासाठी ५ वर्षांपर्यंत दरवर्षी अशा पद्धतीने छाटणी
करत राहावी.
५ वर्षांनंतर बॅक प्रूनिंग म्हणजेच
झाडाच्या पूर्ण आकाराचा ५० टक्के भाग कापावा.
(हीच पद्धत प्रत्येक ५ वर्षांनंतर करत राहावी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.