
डॉ. व्ही. व्ही. गौड
Soybean Update : राज्यात सोयाबीनची दरवर्षी सुमारे ४९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीचा ४५ दिवसांचा कालावधी पीक आणि तणांमध्ये स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या कालावधीत तण व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते.
संवेदनशील कालावधीनंतर तण व्यवस्थापन केले, तरी उत्पादनात झालेली घट भरून काढणे शक्य होत नाही. त्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
तणांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांमध्ये कमी उत्पादन होण्यासह गुणवत्ता कमी होणे, काढणीदरम्यान अडचण येतात. याशिवाय विविध तणे कीड आणि रोगांना यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी तण व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
जमिनीची मशागत, जांभूळवाही, प्रमाणित बियाण्यांचा वापर, योग्य वाण निवड, योग्य अंतरावर आणि वेळेवर लागवड, पिकांची फेरपालट, संतुलित खत व्यवस्थापन आणि निंदणी या बाबींचे काटेकोर पालन केल्यास कमी खर्चात प्रभावी तण व्यवस्थापन शक्य होते. आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.
सलग सोयाबीन
तणनाशक---प्रति एकरासाठी मात्रा---वापर
अ) उगवणपूर्व
१) पेंडिमिथॅलिन (३८.७ टक्के सी.एस.)---७०० मिलि---उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पानी तणांच्या व्यवस्थापनासाठी.
२) डायक्लोसुलम (८४ टक्के डब्ल्यू.डी.जी.)---१२.४ ग्रॅम---उगवणपूर्व, लव्हाळा, केणा, दुधी, जंगली धान, दीपमाळ, गाजर गवत इ. तणांसाठी.
ब) उगवणपश्चात
१) इमॅझिथापर (१० टक्के एस.एल.)---३०० ते ४०० मिलि---उगवणपश्चात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी), लव्हाळा केणा, विंचू, दुधी इ.तणांसाठी.
२) क्लोरिमुरॉन ईथाईल (२५ टक्के डब्ल्यू.पी.)---१५ ग्रॅम---उगवणपश्चात (पेरणीनंतर १५ दिवसांनी), लव्हाळा, केना, कुंजर, गाजर गवत व दीपमाळ इ. तणांसाठी.
३) क्विझॅलोफोप- पी-इथाईल (५ टक्के ई.सी.)---४०० मिलि---उगवणपश्चात (पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी), गवतवर्गीय तणांसाठी.
४) प्रोपाक्विझॅफोप (१० टक्के ई.सी.)---३०० मिलि---उगवणपश्चात (पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी), गवतवर्गीय तणांसाठी.
५) इमॅझीथापर अधिक इमॅझिमॉक्स (७० टक्के डब्ल्यू.जी.)---४० ग्रॅम---उगवणपश्चात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी किंवा तण २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना)---केणा, दुधी आणि जंगली धान इ. तणांसाठी.
६) प्रोपाक्विझॅफोप (२.५ टक्के) अधिक इमॅझीथायपर (३.७५ टक्के एम.ई.)---८०० मिलि---उगवणपश्चात (तण २ ते ४ पानांच्या अवस्थेत किंवा पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी)---केणा, दुधी आणि जंगली धान इ. तणांसाठी.
आंतरपीक पद्धती
पीक पद्धत---तणनाशक---प्रति एकरासाठी मात्रा---वापर
१) कापूस अधिक सोयाबीन किंवा भुईमूग---पेंडिमिथॅलिन (३८.७ टक्के सी.एस.)---७०० मिलि---उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पानी तणांसाठी.
२) कापूस अधिक तूर किंवा सोयाबीन ---पेंडिमिथॅलिन (३० टक्के ई.सी.)---१३०० मिलि---००
३) कापूस अधिक उडीद किंवा सोयाबीन किंवा भुईमूग---क्विझॅलोफोप-पी-ईथाईल (५ टक्के ई.सी.)---४०० मिलि--- उगवणपश्चात (पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी)---गवतवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी.
४) तूर अधिक सोयाबीन---पेंडिमिथॅलिन (३० टक्के ई.सी.)---१३०० मिलि---उगवणपूर्व, गवतवर्गीय आणि रुंद पाणी तणांसाठी--- ००---इमॅझीथापर (१० टक्के एस.एल.)---४०० मिलि---उगवणपश्चात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी)---केणा, दुधी आणि जंगली धान इ. तणांसाठी.
५) तूर अधिक मूग किंवा उडीद---इमॅझीथापर (१० टक्के एस.एल.)---३०० मिलि---उगवणपश्चात (पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी)
६) तूर अधिक सोयाबीन किंवा भुईमूग---इमॅझीथापर (३५ टक्के) अधिक इमॅझीमॉक्स (३५ टक्के डब्ल्यू.जी.)---४० ग्रॅम---उगवणपश्चात (पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी) किंवा तण २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.---केणा, दुधी आणि जंगली धान इत्यादी तणांसाठी.
तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची काळजी
- तणनाशक सोबतच्या लेबलवरील माहिती नीट वाचून घ्यावी.
- तणनाशकाची फवारणी शिफारशीत मात्रेत आणि वेळेनुसार करावी.
- उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असताना करावी.
- उगवणपश्चात तणनाशकाची ढगाळ, पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तसेच कडक उन्हात फवारणी करणे टाळावे.
- फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे.
- सतत एकाच तणनाशकाचा वापर टाळावा.
- तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप ठेवावा.
- फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
- तणनाशक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- तणनाशक फवारणी करताना फवारा शेजारच्या शेतातील इतर पिकांवर उडणार नाही याची दक्षता घ्यावी.
संपर्क - डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५, (कृषिविद्यावेत्ता, तण व्यवस्थापन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.