Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Ahilyanagar News : पक्षपातळीवर काय कारवाई होणार याकडे लागले लक
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Vidhansabha Election : अहिल्यानगर ः जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने बंडखोरी झाल्याने पक्षीय उमेदवारांचे मात्र ‘टेन्शन’ वाढले आहे. बंडखोरी करणाऱ्यावर कारवाईचा वरिष्ठ पातळीवर इशारा दिला जात असल्याने बंडखोरांवर काय कारवाई होतेय, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पक्षीय लढती निश्चित झाल्या आहेत.

पक्षांतीलच नेत्यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला, असल्याने बंडखोरांनी पक्षीय उमेदवारांची चांगलीच गोची केल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने शिर्डीत भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांना पक्षाने खास निमंत्रण देऊन मुंबईला बोलावून घेतले तरी ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात अपक्ष रिंगणात आहेत. अकोल्यात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, शिवसेनेचे मधुकर तळपाडे, माजी सभापती मारुती मेंगाळ हे आमदार लहामटे आणि अमित भांगरे यांच्याशी अपक्ष लढत आहेत. शेवगावात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि महाविकास आघाडीचे अॅड. प्रताप ढाकणे यांच्या विरोधात रिंगणात आहेत.

Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election : सोलापुर जिल्ह्यात १२३ मतदान केंद्रांत वाढ

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार रिंगणात असल्याने ते महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, भाजपचे विक्रम पाचपुते यांच्या विरोधात लढत देणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट (पिपानी) चिन्हावर मोठे मताधिक्य घेणारे गोरख आळेकर श्रीगोंद्यातून विधानसभेलाही रिंगणात आहेत. पारनेरला शिवसेना नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, शिवसेना नेते संदेश कार्ले अपक्ष रिंगणात असल्याने राणी लंके आणि काशिनाथ दाते यांच्या अडचणीत भर पडली आहे.

नेवाशात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उमेदवारी मिळाली नसल्याने बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून माजीमंत्री शंकरराव गडाख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. श्रीरामपूरला उमेदवारी कापल्यानंतर काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन आमदार लहू कानडे यांनी उमेदवारी आणली तर शिवसेना (शिंदे) कडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे लढत आहेत. त्यामुळे महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांच्या समोर लढत आहेत. अहिल्यानगर शहरात महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर आणि महायुतीकडून आमदार संग्राम जगताप लढत आहेत. उमेदवारी मिळाली नसल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने पक्षीय उमेदवारांचे मात्र टेन्शन वाढले आहे. आता पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरांना कारवाईचा इशारा दिलेला असल्याने काय कारवाई होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

अपक्ष कमी नाहीत...

विधानसभा निवडणुकीत अपक्षांची संख्याही अधिक आहे. सोमवारी (ता. ४) एका अपक्ष उमेदवाराने आपली भावना व्यक्त करताना दुरंगी, तिरंगी लढती म्हणणाऱ्यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अपक्ष काय कमी नाहीत, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मतदार काय पक्षीय उमेदवारांचे बांधिल आहेत का? जर अधिक उमेदवार रिंगणात असतील तर केवळ दोन-तीन लोकांत लढत म्हणतातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com