विनयकुमार आवटे
Crop Insurance : विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे. आंबिया बहर ०२३-२४ मधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी आणि पपई या फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली आहे.
अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार आहे.
चौकट १ ः फळ पिकांचे उत्पादनक्षम वय
या योजनेत आंबिया बहरामध्ये सन २०१६-१७ पासून ते सन २०२२-२३ पर्यंत एकूण भरलेला विमा हप्ता ४,४५९ कोटी रुपये असून, आतापर्यंत मंजूर नुकसान भरपाई ३,९६४ कोटी रुपये आहे. विमा नुकसान भरपाईचे एकूण विमा हप्त्याशी प्रमाण ८९ टक्के आहे.
यात शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम रुपये ७८२ कोटी आहे. विमा नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्त्याशी प्रमाण ५०७ टक्के आहे.
१) या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुक, नोंदणीकृत भाडेकरार असणे आवश्यक आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)
५) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल. (उदा. द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब)
६) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
७) शेतकऱ्यांना ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा नियमित विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्याच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र वास्तवदर्शी विमा हप्ता हा जर ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास शेतकऱ्यांना नियमित ५ टक्क्यांपेक्षा अधिक विमा हप्ता भरावा लागतो, म्हणून जिल्हानिहाय, पीकनिहाय विमा हप्ता वेगवेगळा असू शकतो.
टीप :
१) विमा हप्ता वास्तववादी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, जो कमी दर आहे त्यानुसार शेतकऱ्यास विमा हप्ता भरावा लागेल.
- या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
यात गारपीट व वेगाचे वारे यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासांचे आत संबंधित विमा कंपनीस याबाबतची सूचना द्यावी लागेल. त्या नंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
-------------
(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.