Latur News : शेतीमालाच्या बाजारातील भावाच्या चढउताराचा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या शेतीमाल तारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना पणन मंडळाकडून कानमंत्र देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या येथील विभागीय कार्यालयात बुधवारी (ता. २८) घेण्यात आलेल्या शेतीमाल तारण कर्ज योजनेत चालू हंगामासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेला विविध ठिकाणांहून आलेल्या सचिवांनी प्रतिसाद दिला.
कार्यशाळेत मंडळाचे उपसरव्यवस्थापक महादेव बरडे यांनी शेतकऱ्यांसाठी बाजार समितींच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शेतीमाल तारण कर्ज योजनेचे महत्त्व, प्रचार प्रसिद्धी व अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. बाजारात मोठ्या प्रमाणात शेतीमाल आल्यानंतर भाव कमी होतात.
आवक कमी झाल्यानंतर भाव वाढतात. भाव वाढेपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतीमाल तारण योजनेतून कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे गरजा भागतात व शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा लाभही मिळतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनेसाठी बाजार समितीच्या सचिवांनी पुढे यावे, असे आवाहन श्री. बरडे यांनी केले.
कार्यशाळेत न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या विभागीय व्यवस्थापिका शारदा मांडवेकर यांनी गोदाम व गोदामातील शेतीमालाचा विम्यावर मार्गदर्शन केले. वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नीलेश लांडे यांनी गोदामातील शेतीमालाची साठवणूक व वखार पावतीवर दिल्या जाणाऱ्या कर्जाची माहिती दिली.
शिवानंद राठोड यांनी केंद्र सरकारच्या गोदाम विकास आणि नियामक प्राधिकरणाकडील गोदामाची नोंदणीचे महत्त्व, फायदे व नोंदणी कशी करावयची याची माहिती दिली. पणन मंडळाचे विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक राहुल गोरे यांनी शेतीमाल तारण कर्ज योजना व मंडळाच्या ईआरपी प्रणालीवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सहकार विकास महासंघाचे प्रशांत चासकर यांनीही मार्गदर्शन केले.
शेतीमाल साठवणुकीची प्रत्यक्ष माहिती
कार्यशाळेच्या दरम्यान सचिवांची गोदामास प्रत्यक्ष भेट घडवून आणत वखार महामंडळाचे व्यवस्थापक सुरेश माने यांनी गोदामातील शेतीमालाची साठवणूक करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, शेतीमालाच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजना, शेतीमालाची थप्पी लावताना काय काळजी घ्यावी, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. लातूर बाजार समितीचे सहायक सचिव भास्कर शिंदे यांनी बाजार समितीमार्फत राबवलेल्या शेतीमाल तारण योजना, आवश्यक कागदपत्रे व रजिस्टरची माहिती दिली. अवधूत तांबे यांनी सूत्रसंचालन केले. एफ. एफ. सिद्दीकी यांनी आभार मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.