
Nagpur News : अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र, प्रचारात व्यस्त होते. ही तुमची संवेदनशीलता आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूरजवळील निमखेडा येथे नुकसानीची पाहणी केली. विरोधी पक्षांनी सरकारवर सडकून टीका करताच सरकार बांधावर गेल्याचे दृश्य अधिवेशन सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.
विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेल्या १००० मंडलांना अद्याप सवलती दिल्या नसल्याचाही आरोप केला. यावर ‘‘केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांतील दुष्काळग्रस्तांना ज्या सवलती दिल्या जातील त्याच सवलती राज्यातील दुष्काळसदृश १२०० मंडळांना लागू करण्यात येतील’’, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी दिली.
हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी (ता. ७) प्रारंभ झाल्यानंतर शासकीय कामकाज आटोपल्यानंतर स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. तत्पूर्वी विरोधी आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर संत्री आणि कापसाच्या बोंडांच्या माळा गळ्यात घालून जोरदार निदर्शने केली.
अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २२ जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मुद्दा समोर आणला. अवकाळी पावसामुळे राज्यातील संत्रा, धान, कापूस आणि कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. तसेच अवर्षणामुळे दुष्काळी परिस्थिती होती. ४० तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याचे जाहीर केले आहे पण या बाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविलेला नाही. या तालुक्यांना अद्याप मदत जाहीर केलेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला.
तसेच ज्या एक हजार मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे, त्यांना सवलती देण्यासाठी अद्याप मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झालेली नाही. राज्य सरकारने दुष्काळप्रश्नी हा वर केले आहेत. अवकाळी पावसाने नोव्हेंबर महिन्यात २२ जिल्ह्यांत उद्ध्वस्त झाले आहेत. या परिस्थितीत सरसकट मदतीची अपेक्षा होती.
शेतकरी होरपळून निघत असताना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. दुष्काळ आणि अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांना वेळ नव्हता. आता कामकाज थांबवा आणि शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ उत्तर देत वडेट्टीवार अर्धवट माहितीद्वारे बोलत असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, ४० तालुके केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे दुष्काळग्रस्त ठरले आहेत. आम्ही उर्वरित १२०० मंडळांना दुष्काळी घोषित केले. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे दुष्काळग्रस्त तालुक्यांना जे मिळणार आहे तेच या मंडलांना मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपये दिले.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांना २० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम दिला जात आहे. अवकाळी, गारपिटीवर कार्यवाही सुरू झाली आहे, असे सांगितले. यावर विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरली मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा होऊ शकते, असे सांगत परवानगी नाकारली.
मुख्यमंत्री बांधावर
राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, ‘मिगजौम’मुळे शेतकरी उद्धवस्थ झाला असताना मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नाहीत तर मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढताच संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळाचे कामकाज संपताच नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा, पारशिवणी या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत्रा, कापूस व धान पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली
विरोधकांची जोरदार निदर्शने
‘बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, विमा कंपन्या मालामाल शेतकऱ्यांना केलं कंगाल, शेतकरी विरोधी कलंकित सरकारचा धिक्कार असो, सरकार सांगते दुष्काळ सदृश कारण सरकार आहे अदृश्य, दुष्काळ अतिवृष्टी, गारपिटीने शेतकरी त्रस्त, खोक्यावाले गद्दारांचे सरकार मात्र मदमस्त अशा घोषणा देत विरोधी आमदारांनी पायऱ्यांवर निदर्शने केली. या वेळी विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, नाना पटोले, रवींद्र धंगेकर, सुनील प्रभू यांच्यासह आमदार उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.