Agriculture News : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यान पात्र शेतकऱ्यांना २ टप्प्यात आलेल्या यादीनुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले परंतु तिसऱ्या टप्प्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याने नाराजी आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र दीड हजार शेतकरी वंचित आहेत.
अपात्र खातेदारांच्या याद्या कारणांसह सहायक निबंधक कार्यालयात पाठवल्या आहेत; पण परतफेडीच्या कालावधीच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पाहावयास मिळत आहे.
राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये केली होती. गेली चार वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात अधिक आहे.
त्यामुळे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ सर्वाधिक होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारच्या परतफेडीच्या कालावधीने जवळपास एक लाख खातेदार अनुदानापासून वंचित राहिले आहेत. एप्रिल ते मार्च ही परतफेडीचा कालावधी आहे, मात्र कोल्हापुरात ऊस पीक आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम एप्रिल, मेपर्यंत सुरू असतो. त्यामुळे विकास संस्थांच्या पातळीवर जूनअखेर पीक कर्जाची परतफेड केली जाते. त्यामुळे एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा उचल दिसते, ही मुख्य अडचण आहे. अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे दिल्या आहेत.
एक वर्ष परतफेड केलेले ३६ हजार शेतकरी राज्य सरकारने निर्धारित केलेल्या तीन वर्षांपैकी दोन वर्षे परतफेड करणे बंधनकारक आहे; पण अपात्र ठरलेल्यांपैकी ३६ हजार शेतकरी हे एक वर्ष परतफेड केलेले आहेत. प्रोत्साहन अनुदानाच्या अपात्र खातेदारांची नावे तालुका निबंधक कार्यालयाकडे पाठवली आहेत. शेतकऱ्यांनी तिथे जाऊन अपात्र का ठरलो, याची खातरजमा करावी. - निलकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.