Buldana News : शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच ते शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरणार की दुसऱ्या पक्षाची कास धरणार यावर मात्र त्यांनी कोणतेच भाष्य केलेलं नाही. तर मी निवडणूक लढवावी असे भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे. माझं न्यायालय शेतकरी असल्याचे तुपकर यांनी म्हटलं आहे.
'दिल्ली दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तसेच ती जिंकणारसुद्धा असल्याचा विश्वास तुपकरांनी व्यक्त करताना, लोकवर्गणीतून ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
पुढे तुपकर म्हणाले, 'मी फाटका माणूस असून माझ्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे दोन नंबरचे पैसे नाहीत असे तुपकर म्हणाले. 'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर येणाऱ्या लोकसभा निवडणूकीला सामोरं जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच बुलढाणा जिल्ह्याला आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा असा कलंक लागला आहे. मला तो पुसायचा आहे. कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळवून देण्यासह नवीन शिक्षण प्रणाली आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सभागृहात आवाज उठवू असे तुपकर म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी गेल्या 20 वर्षांपासून संघर्ष करत आहे. ज्या प्रश्नांसाठी मी लढत आहे. त्याचे मुळच दिल्लीत आहे. त्यामुळे हे प्रश्न दिल्लीत मांडायला हवेत. त्यासाठीच मी संसदेत जाणार असल्याचे तुपकर म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून माझ्यावर शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा दबाव आहे. लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जावं असा त्यांचा हट्ट आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून लढणार आहे,' असल्याचेही तुपकरांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या प्रश्नावर तुपकर म्हणाले, राजू शेट्टी प्रत्येक निवडणुकीत सहा जागा लढवण्याची घोषणा करतात. मात्र यावेळी मी निवडणूक लढवावी असा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. आता माझं न्यायालय शेतकरी आहेत. तेच निर्णय घेतील असेही तुपकर यांनी म्हटलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.