Index of Swimming Ability : तरण क्षमतेचा निर्देशांकांबद्दलची माहिती...

Article by Dr. Chandrasekhar Pawar and Dr. Satish Patil : तरणक्षमता म्हणजे काय, आणि त्याचे निर्देशांक कसा काढायचा, याची या लेखात माहिती घेऊ.
Sustainable Development
Sustainable Development Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Assessment of Catchment Area : विश्‍वातील ७० टक्के जैवविविधता ही निसर्गसंपन्न अशा केवळ १२ राष्ट्रांमध्ये विभागलेली आहे. त्यात भारताचा क्रमांक वर होता. मात्र भारतातील वाढत चाललेल्या लोकसंख्येचा विपरीत परिणाम निसर्गाच्या जैवविविधतेवर होत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, ‘‘गाव हा विश्‍वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगता अवदशा, येईल देशा’’ अशीच काहीशी गावेच्या गावे भंगण्याची परिस्थिती अवर्षणप्रवण गावांमध्ये दिसून येते. त्याचाच परिणाम अंतिमतः सर्व देशावर होणार आहे.

निसर्गाच्या तरणक्षमता म्हणजे काय?

ज्या परिसंस्थेमध्ये किंवा नैसर्गिक अधिवासात आपण राहतो, त्या ठिकाणी राहत असणारी लोकसंख्या व या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्याची निसर्गाची क्षमता, यांचा समतोल म्हणजेच निसर्गाची तरणक्षमता होय.

माणसाप्रमाणेच निसर्गातील सर्वच सजीवांच्या गरजांमध्ये पाणी, अन्न, अधिवास आणि अन्य आवश्यक संसाधनांचा समावेश होतो. स्थानिक पातळीवरील निसर्ग व निसर्गाची तरणक्षमता टिकविण्याची मोठी ताकद पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांमध्ये आहे. एखाद्या गावाची मुळात असलेली तरणक्षमता पाणलोट विकास कार्यक्रमामुळे कशी बदलली, हे आपणास तरणक्षमता निर्देशांकावरून कळते. तो कसा काढायचा, यासाठी केवळ एक उदाहरण म्हणून आपण पाणलोट व्यवस्थापनाशी निगडित झालेला एक महत्त्वपूर्ण बदल म्हणून जनावरांची वाढलेली संख्या, त्यातून वाढलेले दूध उत्पादन व शेतकऱ्यांना झालेला आर्थिक फायदा याबाबत माहिती घेऊ.

Sustainable Development
Crop Diversity Index : पीक विविधता निर्देशांक

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी हे गाव पाणलोट क्षेत्राच्या कामासोबतच बाजूने जाणाऱ्या कॅनॉलमुळे चांगल्या प्रकारे बागायती आहे. या गावात चाऱ्याची उपलब्धता अधिक असून, प्रति दिन सर्वसाधारणपणे ३२ हजार लिटर दूध संकलन होते. या गावास दूधग्राम म्हणून देखील ओळखले जाते.

पण एखाद्या अवर्षणग्रस्त गावामध्ये केवळ पाणलोटाची कामे व्यवस्थित झाल्यामुळे पाण्याची व चाऱ्याची उपलब्धता वाढल्यास त्याचा सरळ फायदा पशुपालनास होतो. त्यामुळे शाश्‍वत पाणलोट कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एकदा आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनी एकदा तरणक्षमता निर्देशांक काढून पाहावा. तो एकच्या जवळपास आल्यास कार्यक्रम यशस्वी झाल्याचे म्हणता येते.

सूत्र :

तरणक्षमता निर्देशांक

वर्षभरामध्ये गावात उपलब्ध होणारा एकूण चारा (किलोग्रॅममध्ये)

(Carrying Capacity Index, CCI) = ----------------------------------------------------------

जनावरांची एकूण प्रमाणित संख्या × जनावरांच्या एकूण संख्येस

लागणारा प्रमाणित चारा (ओला व सुका चारा एकत्रित.)

या निर्देशांकाची किंमत शून्य ते एक या दरम्यान येते. या बाबतचे एक उदाहरण आपण तपासून पाहू.

उदाहरणार्थ,

एका अवर्षण प्रवण गावामध्ये ३०० दुधाळ जनावरे (गायी आणि म्हशी) आहेत. त्या जनावरांना प्रति दिन सरासरी २६ किलो चारा (हिरवा आणि सुका) लागतो, असे गृहीत धरू. या गावांमध्ये साधारणपणे १५०० मेट्रिक टन चारा उपलब्ध होतो. तर या गावचा तरणक्षमता निर्देशांक पुढील प्रकारे काढता येईल.

१५०० × १००० (किलोग्रॅम)

३०० × २६ × ३६५ (किलो ग्रॅममध्ये, वर्षभरासाठी)

१५,००,०००

तरणक्षमता निर्देशांक (CCI) = ------------------------------------

२८,४७,०००

तरणक्षमता निर्देशांक (CCI) = ०.५२

या गावासाठी तरण क्षमता निर्देशांक ०.५२ येतो. म्हणजेच या गावात जनावरांच्या संख्येनुसार एकूण उपलब्ध चारा कमी आहे. उर्वरित चारा शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागतो किंवा वेगळी तरतूद करावी लागते. परिणामी, पशुपालनाच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन, ते शेतकऱ्यांना परवडण्याच्या टप्प्याबाहेर जाते. अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पशुधन सांभाळणे अवघड असते. म्हणूनच त्यांची संख्या बागायती किंवा चाऱ्याची उत्तम उपलब्धता असलेल्या गावांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असते.

जनावराची चाऱ्याची आवश्यकता

पाचशे किलोग्रॅम वजनाच्या जनावरास (गाय किंवा म्हैस) साधारणपणे ७ ते ८ किलो सुका चारा आणि १८ ते २० किलो हिरवा चारा आवश्यक असतो. प्रति दिन सरासरी २६ किलो चारा वर्षभर उपलब्ध असावा लागतो. जनावरांना त्यांच्या एकूण वजनाच्या अडीच टक्के, तर दुधाळ जनावरांना तीन टक्के चारा लागतो. याशिवाय प्रति जनावर ५० ते १०० लिटर दरम्यान पाण्याची गरज भासते. याशिवाय प्रत्येक जनावरास सरासरी दोन किलोग्रॅम पशुखाद्याची आवश्यकता असते.

Sustainable Development
Water Productivity Index : संवर्धित जल उत्पादकता निर्देशांक

हिवरे बाजारचे पाणलोट व्यवस्थापन

हिवरे बाजार हे अवर्षणप्रवण गाव असून, येथे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आणि व्यवस्थापनानंतर शेतकऱ्यांकडील जनावरांची संख्या वाढत गेली. दुग्ध व्यवसायातून आर्थिक सुबत्ता वाढीस लागली. पाणलोट प्रकल्पपूर्व केवळ ४०० मेट्रिक टन चारा उपलब्ध होत होता. आज त्याच भौगोलिक क्षेत्रात साधारणपणे ६००० मेट्रिक टन चाऱ्याची निर्मिती होते.

यात पाणलोट क्षेत्रांच्या डोंगर उतारावरती सलग समतल चर खोदून जल, मृदा व वनसंवर्धन उपचारासोबतच पीक पद्धतीमध्ये चारा पिकांची समावेश करण्यात आला. सर्वसाधारणपणे डोंगर भागात दहा लाख झाडांसोबत स्थानिक गवतांची वाढ केली गेली. ग्रामपंचायतीने चराईबंदी व कुऱ्हाड बंदी केल्यामुळे दरवर्षी गवतांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. याशिवाय गावातील शेतकरी, त्यांच्या गरजेनुसार दसऱ्यानंतर (ऑक्टोबर/ नोव्हेंबर) गवत बी तयार झाले, की गवत कापून जनावरांसाठी वापरतात.

ग्रामपंचायत डोंगर परिसरात दरवर्षी जाळपट्टा काढून वणवे पसरणार नाहीत, यासाठी काळजी घेते. जर चुकून आग लागल्यास आग / वणवे विझविण्यासाठी ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक ग्रामवन समिती बनवली आहे. हिवरेबाजारमध्ये सद्यःस्थितीमध्ये जनावरांची संख्या १६०० इतकी आहे. त्यापैकी ५५० हून अधिक जनावरे दुधाळ आहेत. दूध उत्पादन साधारणपणे ६००० लिटरच्या आसपास आहे. या व्यवसायामुळे हिवरेबाजारमध्ये प्रति लिटर ५० रुपये दराप्रमाणे सर्वसाधारणपणे तीन लाख रुपये प्रति दिन उत्पन्न हाती येते.

हिवरेबाजारचा तरणक्षमता निर्देशांक वरील सूत्रानुसार १.१४ इतका येतो. याचाच अर्थ हिवरेबाजार पाणलोट क्षेत्रामध्ये गावाच्या गरजेपेक्षा जास्तीचा चारा तयार होतो. त्याचा लाभ इतर गावांना देखील होतो. अधिकचा चारा परिसरातील दहिटणे, पिंपळगाव वाघा, गुंजाळ, जखणगाव, भोयरे खुर्द, भोयरे पठार इ. गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध केला जातो. त्यासाठी केलेल्या नियमाप्रमाणे विळ्यामागे रु. १००/- इतका महसूल ग्रामपंचायतीला भरून ते शेतकरी डोक्यावर नेता येईल, इतका चारा हिवरेबाजारमधून कापून नेऊ शकतात.

गवताची ही कापणी सर्वसाधारणपणे दोन महिने चालते. निसर्गाची ही तरणक्षमता निर्माण करायला हिवरेबाजार ग्रामस्थांना २५ ते ३० हून अधिक वर्ष सातत्याने कष्ट घ्यावे लागले आहेत.

जेमतेम ४०० ते ५०० मिलिमीटर पर्जन्य लाभणाऱ्या या गावाने योग्य व्यवस्थापनातून अधिवासातील नैसर्गिक तरणक्षमतेला योग्य रीतीने जपल्याचे उदाहरण दुसरे कुठेही नाही. यातून इतर अवर्षणप्रवण गावांनी योग्य तो बोध घेतला पाहिजे.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१,

(इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१,

(प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)

(टीप : हिवरेबाजारची आकडेवारी ही प्रत्यक्ष कार्यक्षेत्र भेट, ग्रामपंचायत व पोपटराव पवार यांचे सादरीकरण आणि त्या संदर्भात काम करणाऱ्या हबीब सय्यद यांच्या मुलाखतीतून घेतली आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com