
Indrayani Rice Rate : यंदा इंद्रायणी भाताच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इंद्रायणी भाताचे उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शेतकरी इंद्रायणी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. यंदा प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी भाताचा दर घसरला असून, बाजारपेठेत २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये क्विंटल दराने या भाताची खरेदी होत आहे.
दुसरीकडे आजरा घनसाळचा भाव वधारला असून, ५ हजार रुपये प्रतिक्विंटल टप्पा ओलांडला आहे. मागणी वाढल्यामुळे आगामी काळात घनसाळच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गतवर्षी इंद्रायणी भाताचा दर प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला होता. यामुळे यंदा शेतकरी इंद्रायणीच्या लागवडीकडे वळला. गतवर्षीच्या तुलनेत इंद्रायणी भाताची लागवड दीडपटीवर गेली. पुण्यामधील मावळसह सर्वच इंद्रायणी उत्पादक भागात लागवड वाढली असल्याने बाजारात आवकही वाढली आहे. त्या तुलनेत मागणी नसल्याने इंद्रायणीच्या दरात घसरण झाली आहे. गतवर्षी सुगीच्या दिवसात इंद्रायणीचा दर प्रतिक्विंटल ३ हजार ६०० रुपये होता. पुढे तो प्रतिक्विंटल ३ हजार ३०० रुपयांवर स्थिरावला. यंदा मात्र प्रतिक्विंटल २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये दराने या भाताला मागणी आहे.
याबाबत आजरा तालुक्याचे कृषी अधिकारी विजयसिंह दळवी म्हणाले की, "यंदा इंद्रायणीचे क्षेत्र वाढले असून, त्याची लागवड तालुक्यात साडेपाचशे हेक्टरवर झाली आहे. हे बियाणे सुधारित असल्याने ते दुसऱ्याही वर्षी वापरता येते. या कारणाबरोबर गतवर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली आहे." असे दळवी म्हणाले.
यामुळे शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसत आहे. कोणी इंद्रायणीचे भात घेता का? असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे आजरा घनसाळचे लागवड क्षेत्र २५ टक्क्यावर आल्याने या भाताची मागणी वाढली आहे. सध्या प्रतिक्विंटल ५००० ते ५५०० रुपये दर मिळत आहे. पुढे तो प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांच्या पुढेही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा घनसाळ उत्पादकाना फायदा आहे.
आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत म्हणाले की, "आजरा घनसाळ या सुवासिक वाणाबरोबर इंद्रायणी या सुवासिक वाणाची मागणी राज्यभर आहे. यंदा मात्र इंद्रायणीची लागवड वाढल्यामुळे उत्पादनात वाढ झाली. मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने दर घसरला. यंदा भात काढणीच्या काळात ढगाळ वातावरण व पाऊस असल्याने भाताची गुणवत्ता घसरली. त्याचा परिणाम इंद्रायणीच्या दरावर झाला आहे". असे सावंत यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.