Indian Bison Gaur : गव्याच्या त्रासाने शेतकरी हैराण, उसाच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण?

Radhanagari : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल क्षेत्रात गवे चारा आणि पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडू लागले आहेत.
Indian Bison Gaur
Indian Bison Gauragrowon

Kolhapur Bison Gaur : कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांचे गावामध्ये येण्याचे प्रमाण वाढल्याने गावकऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. हातकणंगले भागातील उत्तर, पन्हाळा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात गव्यांच्या कळपाचा शेती पिकाला वारंवार त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वन विभागाकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत तर याचा मानवी वस्तीसह शेती पिकाला होणाऱ्या त्रासामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत.

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल क्षेत्रात गवे चारा आणि पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडू लागले आहेत. म्हासुर्ली (ता. राधानगरी) परिसरात थेट शेतात घुसून गव्यांचे कळप पिकांचे नुकसान करत आहेत. झापाचीवाडीजवळ निवृत्ती चौगुले व संतोष सुतार यांच्या शेतातील अडीच एकरांतील उसाचे गव्यांनी नुकसान केले आहे.

धामणी खोरा प्रामुख्याने राधानगरी दाजीपूर अभयारण्याला लागून असून, या परिसरात वनविभागाचे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

धामणी खोऱ्यातील उसाची बऱ्यापैकी कारखान्याकडे उचल झाल्याने उसाबरोबरच मका, भुईमूग व इतर आंतरपिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे. मात्र, जंगलातील चारा व पाणी संपल्याने गव्यांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ शेतशिवाराकडे येत असून, उभी पिके फस्त करत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Indian Bison Gaur
Landslide In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना भूस्खलनाचा धोका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्वेक्षण

शेतकरीवर्ग रात्रभर जागून पिकांचे रक्षण करत आहेत. गव्यांच्या तावडीतून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, गवे त्याला जुमानत नसून उलट शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. तरी वनविभागाने धामणी खोऱ्यातील गव्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जंगल क्षेत्राशेजारी असणाऱ्या गावांत गव्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वन विभागाला याबाबत माहिती द्यावी. वन विभागाच्या पातळीवर गव्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विश्वास पाटील, वनपाल, म्हासुर्ली वन परिमंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com