
Groundnut Production आज माझ्या शालेय आयुष्यातील एक आठवण जागी झाली. मधलं माळ या नावाने सात-आठ एकर जमीन होती. तांबूस माती. भुईमुगासाठी (Groundnut) खास. त्यावर्षी या मधल्या माळात भुईमुगाचं विक्रमी पिकं (Groundnut Production) आलं होतं. शेंगा काढणार्या बायकांना हिस्से करुन शेंगा मजुरी म्हणून देत.
मला आठवतंय, आम्ही त्यांनी उकरून काढलेल्या शेंगाचे २२ हिस्से करायचो. त्यातला दीड हिस्सा त्या बाईला जायचा. तो दीड हिस्सा म्हणजे पायलीभर शेंगा असत.
बायका खूष व्हायच्या. मी एका बाजुला, वडील दुसर्या बाजुला, दोघांच्या मध्ये भली मोठी चादर अंथरलेली. त्यावर शेंगांची वाटणी व्हायची.
चारला सुरू झालेलं काम, संध्याकाळी सहा- साडे सहापर्यंत चालायचं. मान-पाठ ताठून जायची पण त्यात आनंद होता. त्यावर्षी १०० पोते शेंगा झाल्या राशीला.
सरव्याला १४ पोते व तिसर्या वेळी ७ पोते अशा एकूण १२१ पोते शेंगा झाल्या. शिवाय उन्हाळाभर आम्ही रानावर भाजून निघालेल्या शेंगा खात होतो.
मी बी. ए. होईपर्यंत शेंगाचं उत्पादन टिकून होतं. नंतर ते कमी होतं गेलं. हळूहळू पिकं बदलत गेली. संकरित ज्वारी, सुर्यफुल आणि नंतर सोयाबीन आलं. भुईमुगासाठी पुरेसा आणि वेळेवर पाऊस होईना झाला.
भूईमूगाची पेर कमी होत-होत दोन-चार पायल्यांवर आली. पुढे शेंगांना रानडुकरांचा त्रास सूरू झाला. तरीही आईच्या आग्रहाखातर थोड्या शेंगा पेरायचो.
आजही शेंगाशिवाय माझा दिवस जात नाही. मला खायला शेंगा लागतातच. पण २०१० पासून भुईमूग पेरणं माझ्यापुरतं इतिहासजमा झालंय. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माझी पत्नी सविताने बागेत थोड्या शेंगा लावल्या होत्या.
ती रास माझ्या हातात आली. एक कढई भरून शेंगा झाल्या. तब्बल १२१ पोती ते छोटी कढई, असा हा शेंगांचा प्रवास डोळ्यापुढून झर्रकन गेला...
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.