
Watermelon seeds Production : केंद्र सरकारने कलिंगड बियाणे आयातीवर बंदी घातली आहे. लघु उद्योग भारती संघटनेकडून आयात बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने देशातील बियाणे उत्पादकांचे हित जपण्यासाठी कलिंगडाच्या आयातीवर बंदी घातली आहे. परंतु या निर्णयामुळे देशातील बाजारात देशी बियाण्यांचे दर १५ ते २० टक्के वाढू शकतात. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. तर वाढती मागणी लक्षात घेता बीज गुणवत्तेचा प्रश्नही निर्माण होऊ असं अभ्यासकांचं मत आहे.
२०२१-२२ मध्ये कलिंगड बियाणे आयात २० हजार ३५५ टनांची टनांवर होती. तर २०२२-२३ मध्ये आयात ६५ हजार ९८९ टनांवर पोहचली होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात ८३ हजार टन टरबूज बियाणे आयात करण्यात आले. जे की, गेल्या तीन वर्षातील सरासरी ४० हजार ६९७ टन आयातीच्या दुप्पट होते.
देशात कलिंगड बियाण्यांची मागणी दरवर्षी सुमारे ६० ते ६५ हजार टन आहे. मात्र उत्पादन केवळ ४० हजार टनांपर्यंत मर्यादित राहतं. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित २० ते २५ हजार टनांची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे बियाण्याची आयात वाढली होती.
सध्या कलिंगड बियाण्यांची आयात काही अटींवरच करता येते. ही आयात केवळ बियाणे प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनाच करता येते. त्यासाठी त्या कंपन्यांकडे 'एफएसएसएआय'चा मान्यताप्राप्त उत्पादन परवाना असणं आवश्यक आहे. तसेच त्यांची नोंदणी 'मेलन सिड्स इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम'मध्ये असणं बंधनकारक आहे. परंतु मागील वर्षीच्या जूनपर्यंत ही बियाण्यांची आयात कोणत्याही अटीशिवाय करता येत होती. कोणतीही खास परवानगी किंवा नोंदणी त्यासाठी गरजेची नव्हती. त्यामुळे देशातील कलिंगड बियाणे आयातीत वाढ झाली.
या आयातीचा परिणाम देशी बियाण्यांवर झाल्याचं भारतीय किसान संघाच्या राजस्थान राज्य शाखेचे सरचिटणीस तुलचराम सिवार यांचं मत आहे. "मोठ्या प्रमाणावर झालेल्या आयातीतून देशी बीज निर्मितीवर परिणाम झाला असून, सरकारचं स्वदेशी बियाण्यांबाबतचं धोरणच विस्कळीत होत आहे. हायब्रिड बियाण्यांचा वापर उत्पादन वाढवतो खरा, पण त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि रासायनिक खतांचा अधिक वापर करावा लागतो." असं सिवार सांगतात.
देशी बियाण्यांपेक्षा आयात बियाण्यांचा दर १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त असल्यामुळं देशी बीज उत्पादकांवर दबाव निर्माण झाला होता. मात्र, आता आयातीवर बंदी घातल्याने देशी बियाण्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल, असंही सिवार सांगतात.
दरम्यान, यंदा राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील कलिंगड शेतीला अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये कलिंगडाचे उत्पादन मुख्यतः उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत होते.
देशभरात अर्का माणिक, अर्का ज्योती, असाही यामातो, दुर्गापुरा मिठा आणि ब्लॅक थंडर या टरबुजाच्या जाती विशेष लोकप्रिय आहेत. जगभरात कलिंगड उत्पादनात चीन सर्वाधिक पुढे असून, दरवर्षी ते ७९ दशलक्ष टनांपेक्षा जास्त उत्पादन करते. चीन पाठोपाठ तुर्की, इराण, ब्राझील आणि उझबेकिस्तान या देशांचा क्रम लागतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.