Nagar News : मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी मुळा धरणातून रविवारी (ता. २६) चार हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. दुपारी तीन वाजता मुळा पाटबंधारे व छत्रपती संभाजीनगर मधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी सोडले जाणार असून चार हजार क्युसेकने हा विसर्ग तीन ते चार दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान रविवारी निळवंडे धरणाचा विसर्ग वाढवून तो आठ हजार करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा नगर, नाशिक जिल्ह्यांत पाणलोट भाग आहे. पावसाळ्यात जर धरणात ६५ टक्के पाणी कमी असल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणांतून तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात येते.
मागील चार वर्षांत जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र यंदा धरणात पुरेसा साठा झाला नाही. मराठवाड्यातील पाणीटंचाईचा विचार करता यंदा भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. प्रकरण न्यायालयात गेल्यावर झालेल्या सुनावणीत पाणी सोडण्याला स्थगिती मिळाली नाही.
त्यामुळे प्रशासनाने तयारी करत दोन दिवसांपूर्वीच श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील बंधाऱ्याच्या परिसरात जमावबंदी आदेश काढला. शुक्रवारी (ता. २४) रात्री उशिरा निळवंडे धरणातून पाणी सोडले. रविवारी (ता. २६) मुळा धरणातून दुपारी २ हजार क्युसेकने पाणी सोडले.
दोन दिवसांपूर्वीच प्रवरा नदीवरील बंधाऱ्याच्या परिसरात जमावबंदी आदेश काढत पाणी सोडण्याची तयारी केली होती. भंडारदरा-निळवंडे धरणातून ३.३६ टीएमसी, मुळा धरणातून २.१० टीएमसी असे ५.४६ व नाशिकमधील धरणातून ३.१४३ टीएमसी असे ८.६०३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. मुळातून पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.