Lemon Rate : लिंबू, शेवग्याच्या दरात वाढ तर कोबी, फ्लॉवर वांगी दरात घसरण

Market Rate : उन्हाळ्यामुळे लिंबू, शेवग्याचे दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत.
Lemon Rate
Lemon Rateagrowon

Kolhapur Fruit Market : कोबी, फ्लॉवर आणि वांग्याचे भरपूर उत्पादन झाल्याने सध्या बाजारात याचे दर काही प्रमाणात खालावले आहेत तर वरणा, ढब्बू, दोडक्याचे दराने चांगलीच तेजी घेतली आहे. कांदा आणि बटाट्याचे दर स्थिर असून, लसणाच्या भावात दीड महिन्यानंतर थोडी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे लिंबू, शेवग्याचे दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

फळबाजारात कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. जनावरांच्या बाजारात मागणी घटल्याने आवकेसह उलाढालही मंदावली आहे.

उसाच्या शेतीत दुबार पीक घेतलेल्या कोबी, प्लॉवर, वांगी यांची अधिक आवक झाल्याने दर स्वस्त झाले आहेत. कोबी २० तर वांगी २५ रुपये किलो आहेत. फ्लॉवर नग १५ ते २० रुपये आहे. वरणा, ढब्बू व दोडक्याचा दहा किलोचा भाव दोन महिन्यांपासून ५०० रुपयांवर टिकून आहे.

पालेभाज्या, कोथिंबीरीचे उत्पादन उष्म्यामुळे घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेंढीचा दर १५ रुपयांपर्यंत आहे. काकडीला मागणी असली तरी अधिक आवकेने किलोचा दर ४० रुपयांवर कायम आहे. लिंबूचा नगाला २ ते ४ रुपयांपर्यंत दर आहे. शेवगा १५ रुपयांना दोन, तर वीसला तीन असा भाव आहे.

कांदा १५ ते २५ तर बटाटा आग्रा ३०-३५ तर इंदूर ३५ ते ४० रुपये किलो असा स्थिर आहे. लसणाची प्रत खराब असून, किलोमागे २० ते ३० रुपयांनी दर वधारल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. लसूण १५० ते २२० रुपये किलो आहेत. फुलांची आवक कमी असल्याने दर अधिक आहेत. झेंडू ६०- ८० तर शेवंती १०० ते १२५ रुपये किलो आहे.

Lemon Rate
Kolhapur Farmers : बळिराजा सुखावला! खायला शाळूही मिळाला अन् जनावरांना कडबाही

फळबाजारात कलिंगडाची मागणी कायम असून, आकारानुसार २० ते ६० रुपयांपर्यंत दर होते. कोकणाचा हापूस आंब्याची आवक वाढली असून, ४०० ते ६०० रुपयापर्यंत डझनाचा दर आहे. परदेशी सफरचंद १५० ते २०० रुपये किलो आहेत. चिक्कू, मोसंबी, माल्टा, डाळिंब १०० ते १२० रुपये किलो आहेत. वळीव पाऊस लांबल्याने द्राक्षांचा हंगाम अद्याप सुरूच आहे. पण, दर वाढले आहेत.

डोंगराचा रानमेवा मानल्या जाणाऱ्या काजू बोंडाची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात वाढत्या उन्हाचा आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. सुमारे ६० टक्के आवक कमी झाली आहे. चाऱ्याचा प्रश्न असल्याने खरेदीही जेमतेम असल्याने व्यवहार मंदावल्याचे बाजार सामितीतून सांगितले. म्हशींची आणि शेळ्या मेंढ्याची प्रत्येकी सुमारे ५० आवक नोंदली.

भुईमूग, मक्याला मागणी

उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा बाजारात दाखल झाल्या आहेत. या ओल्या शेंगांना मागणी असून, दर १०० रुपये किलो असा आहे. लावणीतील मकाही बाजारात आला आहे. मक्याच्या कणसांनाही ग्राहकांची पसंती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com