Yavatmal News : खाण्याची पाने याचाही समावेश मसालावर्गीय पिकात व्हावा, अशी मागणी केली जात आहे. विडूळ (ता. उमरखेड) येथील विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्याकरिता पाठपुरावा होत असून ग्रामपंचायतीचे ठरावही संकलित केले जात आहेत.
पश्चिम विदर्भात बारी तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाद्वारे खाण्याच्या पानांचे उत्पादन होते. या समाजाचा हा परंपरागत व्यवसाय आहे. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत व्यवस्थापनातील चुकांमुळे सध्या ही पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु विडूळ (यवतमाळ) आणि परिसरात ६० ते ६५ मळे असून २७ हेक्टरवर खाण्याच्या पानाचे उत्पादन होते. हैद्राबाद तसेच विदर्भ व राज्यात याचा पुरवठा होतो.
याच खाण्याच्या पानाचा समावेश मसालावर्गीय पिकात व्हावा याकरिता विडूळ शेतकरी उत्पादक कंपनीकडून पाठपुरावा सुरू आहे. पानवेली श्रेणीतीलच पानपिंपळी तसेच काळेमिरीचा समावेश मसालावर्गीय पिकात केला आहे.
त्यामुळे खाण्याच्या पानांचा देखील मसालावर्गीय पिकात समावेश करावा, अशी मागणी आहे. त्याकरिता यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यामार्फत स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला.
स्पाईस बोर्डने त्याकरिता पुरावे मागितले आहेत. वरवट बकाल येथील अनिल मिसाळ संचालक असलेल्या शेतकरी कंपनीने ठराव घेतला. वरवट बकाल ग्रामपंचायतीने ठराव दिला. आणखी काही ठराव मिळाल्यास हा मार्ग सुकर होईल.
शेगावच्या गजानन महाराज मंदिराकडून ठराव मिळाल्यास ही वाट आणखी प्रशस्त होईल. मसालावर्गीय पिकात समावेश झाल्यास तांबूल, ऑईल, खवय्ये अशी बाजारपेठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर तयार होईल.
विडालयचे झाले विडूळ
विडूळमध्ये पान उत्पादनांची २५० वर्षांची परंपरा आहे. व्यवस्थापनातील चुकांमुळे २००१ मध्ये एकच मळा शिल्लक होता. त्यापूर्वी ७०० मळे असल्याने गावाला विडालय असे नाव होते. पुढे अपभ्रंश होत विडूळ असे नाव झाले. येथील हेमांडपंथी मंदिरात विडा वाहण्याची प्रथा होती, अशी माहिती विडूळ शेतकरी उत्पादक कंपनीचे रामेश्वर बिच्चेवार यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.