Solapur News : जिल्ह्यातील खरीप हंगामातील मूग, उडदाची काढणी आता अंतिम टप्प्यात असून, सोयाबीनची काढणीही लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मूग, उडादासाठी जिल्ह्यात यंदा ११ हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी राज्याच्या पणन विभागाकडे पाठवला आहे.
जिल्ह्यात यंदा सुमारे पाच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यातही सोयाबीनच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यानंतर मूग, उडीद आणि तुरीची पेरणी झाली आहे. यंदा अगदी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकेही चांगली आहेत.
मध्यंतरीच्या पावसात काही भागांत त्याचा मोठा फटका बसला आहे. पण एकूणच खरिपातील सर्वच पिकांची स्थिती यंदा चांगली राहिली आहे. सध्या मूग आणि उडदाची काढणी सुरू आहे. उत्तर सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांत या कामांना अधिक वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी जिल्ह्यात ११ हमीभाव केंद्रे सुरू करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
या ११ ठिकाणी असणार हमीभाव केंद्रे
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, करमाळा, मानेगाव, मंगळवेढा, नंदेश्वर, मरवडे, पंढरपूर, बार्शी आणि कुर्डुवाडी या ११ ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील. यापैकी बहुतेक हमीभाव केंद्रे बाजार समित्यांकडेच असणार आहेत. एक-दोन ठिकाणी मात्र शेतकरी कंपन्यांना ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
...असे असतील हमीभाव
मुगाला प्रतिक्विंटलला ८६८२ रुपये, उडदाला -७४०० रुपये, सोयाबीनला-४८९२ रुपये आणि तुरीला ७५५० रुपये या दराप्रमाणे धान्यांची खरेदी या केंद्रांवरून केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.