
Nandurbar News : अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राज्य शासनाच्या समन्वयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) (पीएम किसान) योजना सुरू केली आहे.
या योजनेत जिल्ह्यात एक लाख १२ हजार शेतकरी लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. पण केवायसी, नावातील अक्षरांत बदल, खाते क्रमांकातील चुका आदी किरकोळ त्रुटींमुळे अनेक जण योजनेपासून वंचित आहेत.
या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबीयांना दोन हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण सहा हजार प्रतिवर्ष लाभ अनुज्ञेय आहे. नुकतेच देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण एक लाख ३० हजार ३६६ लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
त्यात नंदुरबार २७ हजार ११५, नवापूर २७ हजार ८१०, शहादा ३१ हजार ७३१, अक्राणी १२ हजार २६४, अक्कलकुवा १६ हजार ८८०, तर तळोदा १४ हजार ५६६ असे आहेत.
आज अखेर नंदुरबार जिल्ह्यात एक लाख १२ हजार ४१९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली असून, यांपैकी जिल्ह्यातील ९१ हजार ६८८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे.
यात नंदुरबार १८ हजार २६९, नवापूर १९ हजार ७७९, शहादा २२ हजार ८४३, अक्राणी आठ हजार ३०८, अक्कलकुवा १२ हजार ८२५, तसेच तळोदा तालुक्यातील नऊ हजार ६६४ अशा ९१ हजार ६८८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले असून, जिल्ह्यात ई-केवायसी पूर्ण करण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे.
या योजनेमुळे नंदुरबारात शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली असून, ऐन खरीप हंगामात या रकमेचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.
ई-केवायसी बंधनकारक...
पी. एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर ओटीपी पद्धतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करू शकतील.
आता पीएम किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे अधिक सहज आणि सोपी करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.