
Jalgaon Election Update : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकींसाठी इच्छुकांनी अर्ज भरावेत. ‘स्वबळाची’ तयारी करा. मात्र, सन्मानाने जागावाटप झाल्यास शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करण्यात येईल.
त्याबाबत नेते गिरीश महाजन (Girish Mahajan), शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याशी चर्चा करतील, असा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे.
निवडणुका ‘स्वबळावर’, की शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युती करून लढविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची जिल्हा बैठक जळगावातील औद्यौगिक वसाहतीतील एका हॉटेलात झाली.
भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, तसेच सर्व मंडलाध्यक्ष उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की काही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सर्वपक्षीय, तर काही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी ‘स्वबळावर’ तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युती करून निवडणूक लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली.
बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक सर्वांनी अर्ज भरून ठेवावेत, युतीसाठी प्रयत्न करण्यात येईल. योग्य पद्धतीने जागावाटप होत नसेल, तर त्या ठिकाणी युती करण्यात येणार नाही, असेही स्षष्ट करण्यात आले.
धुळ्यात भाजप स्वबळावर लढणार
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेण्यात आल्या आहेत.
खासदार संपर्क कार्यालयात धुळे तालुक्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. बाजार समितीच्या विकासासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून झाला.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, उत्कर्ष पाटील, रामकृष्ण खलाणे, शंकरराव खलाणे, संग्राम पाटील, राम भदाणे, आशुतोष पाटील, किशोर आलोर, रोहिदास पाटील, श्रीराम पाटील, आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.