Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Safflower Farming : करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे गळीतधान्य पीक आहे. एकूण जागतिक करडई लागवडीच्या ७० टक्के क्षेत्र हे भारतात असून, त्यातही ६५ टक्के उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते.
Safflower Farming
Safflower FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. अशोक डंबाळे

Safflower Management : करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे गळीतधान्य पीक आहे. एकूण जागतिक करडई लागवडीच्या ७० टक्के क्षेत्र हे भारतात असून, त्यातही ६५ टक्के उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद, परभणी, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर, पुणे, सोलापूर, वाशिम, अकोला, बुलडाणा आणि अमरावती हे जिल्हे करडई पिकाकरिता ओळखले जातात. करडईची उत्पादकता कोरडवाहू क्षेत्रामधील लागवडीमध्ये कमी आहे.

कमी उत्पादनाची अन्य प्रमुख कारणे

लागवडीखालील क्षेत्र हलक्या जमिनीत लागवड.

पिकाची फेरपालट न करणे.

बीज प्रक्रिया न करणे

उशिरा ते अतिउशिरा पेरणी करणे.

बियाणे ओलीत न पडणे.

विरळणीकडे दुर्लक्ष.

रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा न देणे.

योग्य वेळी संरक्षित ओलीत न करणे. केवळ संवेदनशील अवस्थेत एक किंवा दोन पाणी दिले तरी कोरडवाहूपेक्षा दुप्पट उत्पादन येते.

मावा किडीचे व्यवस्थापन न करणे.

Safflower Farming
Safflower Cultivation : जिरायती क्षेत्रासाठी करडई पीक उत्तम पर्याय

करडईची लागवड मुख्यत बियापासून मिळणाऱ्या तेलासाठी व फुलापासून मिळणारा उपयुक्त रंग यासाठी केला जातो. करडई झाडाचा प्रत्येक भाग (खोड, पाने, फुले, बिया) उपयुक्त असून करडईच्या पाकळ्यापासून बनविलेला चहा ‘हर्बल टी’ म्हणून प्रसिद्ध होत आहे. करडईच्या तेलामध्ये लिनोलिक आम्लाचे प्रमाण भरपूर असून, ह्रदय रोग रोखण्यामध्ये करडई तेल उपयुक्त मानले जाते.

हवामान

या पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. अतिउष्ण तापमान किंवा अतिथंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो.

जमिनीची निवड

या पिकास मध्यम ते खोल ओल टिकून ठेवणारी, परंतु चांगला निचरा असणारी जमीन असावी. क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे पीक घेता येते. अतिखोल किंवा अतिउथळ पेरणी केल्यास उगवण होत नाही. योग्य ओलावा पाहून योग्य खोलीवर पेरणी करावी.

पूर्वमशागत

खरिपातील पूर्व पिकाची काढणी झाल्यानंतर वखरणीच्या ३ ते ४ उभ्या आडव्या पाळ्या देऊन राहिलेला काडीकचरा वेचून घ्यावा. जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. खरिपातील पूर्व पिकाची काढणी झाल्यास कमीत कमी मशागतीने जमीन करडई पेरण्यास तयार करावी. त्यामुळे ओलावा टिकून राहील. पिकाची उगवण क्षमता चांगली राहील.

भरखते

पूर्वमशागत करताना शेणखत / कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन शेवटचे वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे.

Safflower Farming
Safflower Cultivation : सुधारित पद्धतीने करडई लागवड

पेरणीची वेळ

करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. खूप लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) केल्यास पिकाचे पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते. फार उशिरा पेरणी केल्यास पीक थंडीच्या काळात येण्याचा आणि माव्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

बियाणे व बीजप्रक्रिया

लागवडीसाठी करडईचे सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे. पेरणीसाठी प्रती हेक्टरी दहा किलो बियाणे वापरावे. खरीप पिकानंतर त्याच क्षेत्रात करडईचे घेताना १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझीम प्रति किलो प्रमाणात चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर अधिक पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या जिवाणू संवधकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे पिकाचे सुरुवातीच्या अवस्थेत रोगांपासून रक्षण होते. तर हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ मिळते.

पेरणी पद्धत

कोरडवाहू करडईची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर २० सें.मी. अशी पेरणी करावी.

आंतरपिके

आंतरपीक पद्धतीमध्ये जोखीम कमी होते. त्यामुळे कोणत्याही सलग पीक लागवडीपेक्षा आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्यावे. रब्बी हंगामात सहा ओळी हरभरा + तीन ओळी करडई (६:३) किंवा चार ओळी जवस + दोन ओळी (४:२) करडई ही आंतरपीक पद्धत फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन

करडई पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे. पाण्याची योग्य सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६५ किलो युरिया) व ५० किलो स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी द्यावे.

विरळणी व आंतरमशागत

करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढते. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे गरजेचे आहे. गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून शेत स्वच्छ व तण विरहित ठेवावे. तणाच्या प्रादुर्भावानुसार १ ते २ निंदण्या व कोळपण्या पीक उगवणीनंतर २५ ते ३० आणि ४५ ते ५० दिवसांनी कराव्यात.

पाणी व्यवस्थापन

करडई हे पीक अवर्षणास प्रतिकारक्षम असून, कमी पाण्यावरही येते. मात्र ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याची सोय आहे, त्यांनी पिकास पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी पाण्याच्या तीन पाळ्या दिल्यास अधिक उत्पादन मिळते. एकाच ओलिताची सोय असल्यास, ५० दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी. दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी पाणी पाळी द्यावी.

पीक हलक्या जमिनीत घेतले असल्यास ओलिताच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. ओलीत करताना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. करडईला ओलित करण्याकरिता विशिष्ट पद्धत वापरावी म्हणजेच दोन तासाच्या आड दांड काढून दांडानी फक्त पाणी शेवटपर्यंत घेऊन जावे. झाडांना पाण्याचा स्पर्श होण्याची किंवा झाडांच्या अगदी बुडाशी पाणी देण्याची अजिबात गरज नाही. जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्यास पाणी देऊ नये. अशावेळी पाणी दिल्यास पिकाची लोळण होऊन मर रोगाचा प्रादुर्भाव होतो.

मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या खालील अवस्थेत द्यावे.

पेरणीच्या नंतर ३५ ते ४० दिवसांनी (बाल्य अवस्था) - एक पाणी

पेरणीच्या नंतर ६५ ते ७० दिवसांनी (पीक फुलावर येते वेळेस) - दुसरे पाणी

पेरणीच्या नंतर ८५ ते ९० दिवसांनी (बोंड भरण्याची अवस्था) - तिसरे पाणी

करडई चे सुधारीत व संकरित वाण

वाण परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस) दाण्याचा रंग १०० दाण्याचे वजन (ग्रॅम) तेलाचे प्रमाण (टक्के) हेक्टरी उत्पादन (क्विंटल)

सुधारीत वाण

एकेएस-२०७ १२५- १३० पांढरा ६.५ ३० १५ ते २०

भीमा १३०-१३५ पांढरा ६.० ३० १२ ते २०

पी. के. व्ही. पिंक(एकेएस-३११) १३० -१३५ पांढरा ३.८ ३२ १५ ते २१

परभणी कुसुम (पीबीएनएस-१२) १३५-१४० पांढरा ६.५ २९ १२ ते १५

नारी-६ (बिनकाटेरी) १३५-१४० पांढरा ४.५ ३१ १० ते १२

संकरित वाण

नारी- एन एच-१ (बिनकाटेरी) १३५-१४० पांढरा ४.३ ३ १५ ते १८

- डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४

(सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com