
Summer Farming Management:
आंबा
फळधारणा (सुपारी ते अंडाकृती फळे)
काढणीस तयार आंबा फळांची काढणी झेल्याच्या साह्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करून घ्यावी.
ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीनाशकाची फवारणी न केल्याने फळावरील काळे डाग वाढत जाऊन फळ सडण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी पुढील १५ दिवसांनंतर जी फळे काढायची आहेत, त्यावर करपा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी त्या फळांची काढणी करावी.
आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. वाढत्या उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा काढल्यानंतर लगेच सावलीमध्ये ठेवावा. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. आंबा वाहतूक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून करू नये.
दमट व पावसाळी वातावरणामुळे काढणी केलेल्या आंब्यावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे काढल्यानंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून लागतात आणि फळे कुजतात. त्यामुळे फळांच मोठे नुकसान होते. फळकुज नियंत्रणासाठी, फळे काढणीनंतर लगेच ५० अंश सेल्सिअसच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत (उष्ण जलप्रक्रिया). अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी अढीत ठेवावीत.
कोरडे हवामान, तापमानात आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याच्या शक्यता आहे. बागेमध्ये गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत. बागेमध्ये गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेटची (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत एकूण तीन फवारण्या कराव्यात.
नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.
गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांचे फळमाशीपासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी २५ बाय २० सें.मी. आकाराच्या कागदापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण फळांवर घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे उपलब्ध होतात.
डॉ. विजय मोरे (नोडल अधिकारी),
९४२२३७४००१, ८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.