
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Management: राज्यातील गोदाम आधारित पुरवठा साखळी अभियानात शेतकरी कंपन्या आणि सहकारी संस्थांसाठी शाश्वत व्यवसाय उभारणी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण हे उद्देश आहेत. शासनामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने गोदामाची बांधणी करण्यासाठी योग्य आराखडा, बांधकाम खर्च आणि गोदाम व्यवस्थापन करण्यासाठी अंतर्गत कामकाजाची ठरावीक सूत्रे व नियम यांची माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस गोदाम व्यवसायात उतरणाऱ्या किंवा उतरण्यास इच्छुक लाभार्थ्यास गोदामाची साठवणूक क्षमता कशी मोजावी याचे ज्ञान नसते. बहुतांश लाभार्थी ऐकीव माहितीवर विसंबून राहिल्याने गोदामाची क्षमता कशी काढायची याबाबत अनभिज्ञ असतो. एकूण ३६ चौरस फूट जागेत एक टन धान्य साठते असा ठोकताळा सर्वसामान्यपणे गृहीत धरण्यात येतो.
कोणत्याही गोदामाची लांबी व रुंदी यांचा गुणाकार करून चौरस फुटामध्ये मोजमाप घेऊन त्याला सहा ने भागावे. त्यामुळे संपूर्णपणे अचूक नाही, परंतु अचूकतेच्या जवळपास गोदामाची क्षमता समजते. मागील लेखात आपण गोदाम क्षमता कशी काढायची याबाबत उदाहरणासह माहिती घेतली. त्यावरून बिनचूक गोदाम क्षमता मिळू शकते. परंतु गोदाम खरेदी विक्री अथवा भाड्याने घेणे अथवा गोदाम व्यवस्थापन असे व्यवहार करताना ही सूत्रे योग्य असली तरीही त्यावरून प्रश्न पूर्णपणे सुटत नसल्याने आणखी काही तपशील समजून घेणे आवश्यक आहे.
गोदामात इतर जागा सोडून किती शेतीमालाची साठवणूक होऊ शकते हा विषय अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे गोदामाची ढोबळ साठवणूक क्षमता लक्षात आल्यानंतर त्यात खरोखर किती धान्य साठू शकते याची तांत्रिक माहिती समुदाय आधारित संस्था म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांना असणे गरजेचे आहे.
उदाहरण : आकृती क्रमांक २ नुसार
मोठ्या क्षमतेच्या गोदामांमध्ये एकूण आकारमानाचा विचार केला तर १५ मीटर रुंद x ४० मीटर लांब x ५ मीटर उंच गोदामाचे आकारमान ३,००० घनमीटर असेल.
या गोदामाचा स्टॅकिंग प्लॅनचा विचार केला तर प्रत्यक्ष वापराची जागा व साठवणुकीचे आकारमान = ६ मीटर रुंद x ८ मीटर लांब x ४ मीटर उंच x असे एकूण ८ स्टॅक = १,५३६ घनमीटर असेल.
याच सूत्रानुसार चौकटीमधील अनुक्रमांक ३ च्या नियमानुसार २५ किलोच्या पोत्यात अन्नपदार्थ साठविले तर प्रत्यक्ष वापराची जागा
व साठवणुकीचे आकारमान = ६मीटर रुंद x ८ मीटर लांब x २.५ मीटर उंच x ८ स्टॅक = ९६० घनमीटर (उंची व पदार्थ यातील बदल)
मेट्रिक टनातील साठवणूक क्षमता काढताना एखाद्या विशिष्ट शेतीमालाच्या साठवणूक क्षमतेने वरील चौकटीमधील आकारमानाने (घनमीटर /टन) भागावे.
२५ किलोच्या पोत्यात साठविलेले अन्नपदार्थ वरील टेबलमधील अनुक्रमांक ३ मध्ये नमूद उदाहरणानुसार प्रत्यक्ष वापराची जागा व साठवणुकीचे आकारमान = ६ मीटर रुंद x ८ मीटर लांब x २.५ मीटर उंच x ८ स्टॅक = ९६० घनमीटर आणि सदर पदार्थाची साठवणूक क्षमता = ९६० घनमीटर / २.४ = ४०० टन
अशाच प्रकारे वरील चौकटीमध्ये नमूद माहितीच्या आधारे गोदामधारकास गोदामात प्रत्यक्ष किती शेतीमाल आहे किंवा किती शेतीमाल साठू शकतो याचा अचूक अंदाज बांधता येतो.
गोदामातील जागेच्या वापरानुसार थरांच्या आकारमानाप्रमाणे साठवणूक (घनमीटर)
गोदामातील पोत्यांची योग्य मांडणी करण्याच्या दृष्टीने गोदामात १५० टनांचे आयताकार पट्टे किंवा खुणा जमिनीवर तयार करून पिवळ्या किंवा लाल रंगाने रंगविण्यात आल्याचे वखार महामंडळाच्या प्रमाणित गोदामांना दिलेल्या भेटीवरून दिसून येते. या खुणांमुळे पोती रचताना अचूक अंदाज येतो. याला स्टॅक प्लॅन असे म्हटले जाते.
एक स्टॅक किमान १५० टनाचा तयार करण्यात येतो. त्यानुसार ३००, ४५०, ६००, ७५०, ९००, १०५०, १२००, १५००, १८०० टन या क्षमतेच्या गोदामांची निर्मिती करण्यात येते. अशाप्रकारचे स्टॅक तयार करताना दोन स्टॅकमध्ये किमान एक मीटर अंतर ठेवावे. मोठे गोदाम असल्यास दोन मीटर अंतर ठेवण्यास प्राधान्य द्यावे. तसेच गोदामाचे छत व एकावर एक रचलेल्या पोत्यांचे थर यामध्ये किमान एक फूट अंतर ठेवावे. ज्या इच्छुकांना हे प्रत्यक्ष पाहायचे असेल त्यांनी नजीकच्या वखार महामंडळाच्या गोदामास आवर्जून भेट द्यावी.
गोदामाची सर्वसाधारण एकूण जागेची मापे आणि गोदामातील प्रत्यक्ष वापराची जागा याचा विचार केल्यास गोदामाच्या साठवणूक क्षमतेचा अंदाज येतो. आकृती क्रमांक १ व २ मध्ये नमूद छोटी गोदामे व मोठी गोदामे आणि चौकटीमधील मार्गदर्शक आकडेवारी व इतर माहितीचे प्रत्येक गोदामातील व्यावसायिकाने सूक्ष्मपणे आकलन करावे, जेणेकरून त्यानुसार गोदामात प्रत्यक्ष किती शेतीमाल साठू शकतो याचे गणित लक्षात येईल.
शेतीमालाच्या प्रकारानुसार गोदाम क्षमता
गोदामधारकाने शेतीमालाच्या प्रकारानुसार गोदामात लेआउट तयार करावा. गोदाम व्यवसायात जागेच्या उपलब्धतेच्या अंदाजासाठी ही अत्यंत महत्त्वाची पद्धती वापरली जाते. गोदामाचे छत व एकावर एक रचलेल्या पोत्यांचे थर यामध्ये किमान १ फूट अंतर ठेवावे किंवा १ फूट हवेतील जागा रिकामी ठेवावी, हा नियम गोदामाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वापरण्यात येतो. प्रत्यक्ष कामकाजात शेतीमालाच्या प्रकारानुसार पोत्यांच्या थरांची उंची ठेवण्यात येते. गोदाम व्यवसायात नेहमी साठविण्यात येत असलेल्या धान्याच्या व इतर पदार्थांच्या पोत्यांच्या थरांच्या उंचीबाबत मार्गदर्शक आकडेवारी चौकटीमध्ये देण्यात आली आहे.
शेतीमाल पॅकेजिंग / पोत्याची क्षमता जास्तीत जास्त स्टॅकची / पोत्याच्या थराची उंची आकारमान (घनमीटर / टन)
धान्ये, कडधान्ये ५० किलोचे पोते ४ मीटर (२०-४० पोती) १.५
पीठ, अन्नपदार्थ २५ किलोचे पोते ३.५ मीटर (२०-३० पोती) २
पोत्यात साठविलेले पदार्थ २५ किलोचे पोते २.५ मीटर (२०-३० पोती) २.४
टीनमध्ये साठविलेले पदार्थ २० किलो प्रति बॉक्स
(१ बॉक्समध्ये ४ टिन्स) ८ बॉक्स स्वतंत्र रचल्यावर, जर पॅलेट असेल तर गरजेनुसार २० बॉक्सचे थर ४
कॅनमध्ये साठविण्यात येणारे खाद्य तेल २५ किलो प्रति बॉक्स
(१ बॉक्समधे ६ कॅन्स) ८ बॉक्स स्वतंत्र रचल्यावर, जर पॅलेट असेल तर गरजेनुसार २० बॉक्सचे थर २
टीप :
कोणत्याही प्रकारच्या शेतीमालाची साठवणूक क्षमता प्रत्यक्ष शेतीमालाच्या प्रकारानुसार पोत्यांच्या थरांच्या उंचीवरून गणली जाते, परंतु त्या शेतीमालाच्या पोत्यांच्या थरांची जास्तीत जास्त उंची त्या शेतीमालावरसुद्धा अवलंबून असते.
मोठ्या गोदामांच्या (आकृती क्रमांक २) प्रत्यक्ष वापरातील जागेतील पोत्यांच्या थरांचे आकारमान जरी १,५३६ घनमीटर नमूद करण्यात आले असले तरीही चौकटीमध्ये नमूद अनुक्रमांक ३ नुसार २५ किलोच्या पोत्यात साठविलेले पदार्थ ९६० घनमीटर आकारमानाच्या स्टॅकमध्ये सुरक्षितपणे साठविले जाऊ शकतात हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रशांत चासकर ९९७०३६४१३०(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.