Nana Patekar : स्वामिनाथन आयोग लागू करा

Swaminathan Aayog : ‘आम्हाला भरपूर सन्मान दिला. मात्र आता हात जोडून शेवटचं मागणं मागतो आहे. केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करावा,’ अशी जाहीर मागणी अभिनेते नाना पाटेकर यांनी केली.
Nana Patekar
Nana Patekar Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘आम्हाला भरपूर सन्मान दिला. मात्र आता हात जोडून शेवटचं मागणं मागतो आहे. केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करावा,’ अशी जाहीर मागणी अभिनेते नाना पाटेकर यांनी केली. पुणे येथील गणेश कला क्रीडा संकुलात शनिवारी (ता. २१) आयोजिलेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या नवव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. नामचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्री. पाटेकर यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच स्वामिनाथन आयोगाचा उल्लेख करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दर्शविला. व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, ‘नाम’चे संस्थापक सचिव मकरंद अनासपुरे होते.

श्री. पाटेकर म्हणाले, ‘‘सरकारने आमच्यासाठी विविध कामे केली आहेत. आम्हाला सन्मानही दिला आहे. मात्र आता हात जोडून शेवटचे मागणे मागतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करायला हवा. आमच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाल्यास सर्व समस्या दूर होतील. आम्हाला कोणाकडेही हात पसरण्याची गरज भासणार नाही. तुम्ही आयोग अंशतः लागू केलाच आहे; आता तो पूर्णपणे लागू करा. आयोग लागू केल्यास त्यापेक्षा मोठा सन्मान आमचा कोणताही नसेल.’’

Nana Patekar
Dr. Swaminathan : ‘सदाहरित क्रांती’ चा जनक

शेतकऱ्यांसाठी नामच्या माध्यमातून काम सुरू केल्यानंतर जीवनात सर्वांत मोठे समाधान लाभल्याचे सांगत श्री. पाटेकर म्हणाले, ‘‘तळागाळातील शेतकऱ्यांच्या विवंचना माझ्या लक्षात आल्या. त्यानंतर नामच्या माध्यमातून सुरू झालेलं काम पाहून आता समाधानाची झोप लागते. शेती व गावासाठी काम करण्यासाठी मतभेदाच्या भिंती पाडायला हव्यात. गावात कोणाशीही वितुष्ट न ठेवता काम करायला हवे.’’

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘सरकारपेक्षाही परिणामकारक परिवर्तन लोकचळवळीतून घडू शकते हे ‘नाम’ने सिद्ध केले आहे. समाजातील नेतृत्व म्हणजे राजकीय नेता नव्हे. सामान्यांचे जीवन बदलण्यासाठी लोकांमध्ये पौरुषत्व जागृत करण्याची जिद्द निर्माण करतो तोच खरा नेता असतो. त्याअर्थी नाना, मकरंद हे सामाजिक नेतेच आहेत. सामान्य माणसांचे दुःख आपले समजत सरकारची जबाबदारीदेखील त्यांनी अंगावर घेत या दोघांनी एक हजार गावांमध्ये कामे केली आहेत. नाना मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यापेक्षाही मला ‘नाम’चा कार्यकर्ता समजा. जलसंधारणाचे महत्त्व जाणूनच आम्ही २०१४ मध्ये जलयुक्त शिवार योजनेची आखणी केली होती.’’

Nana Patekar
Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

केंद्रीय मंत्री श्री. पाटील यांनी, जलशक्ती मंत्रालय जलसंधारणासाठी नानांचे मार्गदर्शन घेण्यास उत्सुक असल्याचे नमूद केले. ‘प्रत्येक घराला नळाने पाणी’ या धर्तीवर केंद्र शासन ‘प्रत्येक घराद्वारे जलपुनर्भरण’ अशी नवी संकल्पना आणू पाहात आहे. टंचाईमुक्त भारतासाठी नामसारख्या संस्थांची मदत केंद्र शासनाकडून घेतली जाईल, असे ते म्हणाले. नामसाठी या वेळी २५ लाख रुपयांची मदत श्री. पाटील यांनी जाहीर केली.

उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी देखील नामच्या कामांची स्तुती केली. ‘‘सामाजिक काम करणारा नानासारखा कलाकार या भूमीत जन्माला आला याचा राज्याला सार्थ अभिमान आहे. शासनाच्या पलीकडे जाऊन नाम करते आहे. शासनाने देखील आपले उपक्रम विधायक व पारदर्शकपणे पुढे नेण्यासाठी नामसारख्या चांगल्या संस्थांचा सल्ला घ्यायला हवा.’’ असे श्री. सामंत म्हणाले.

शरद जोशींशी तुलना होणार नाही

शेतकरी नेते शरद जोशी यांचा उल्लेख करताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी शरद जोशी यांनी केलेलं काम अफाट आहे. त्यांच्या कामाशी कोणाचीही तुलना करता येणार नाही. आम्ही त्यांच्या पासंगाला पुरणार नाही. जोशींनी सारं आयुष्य शेतकऱ्यांसाठी वाहून टाकलं. त्यांच्या शेजारी उभे राहण्याचीही आमची लायकी नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com