Climate Change Impact : हवामान बदलाचा सेंद्रिय कर्बावर परिणाम

Organic Carbon : सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणातील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

गहिनीनाथ ढवळे

Soil Health :

जमिनीतील सजीवांनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेला कर्ब किंवा कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थात ५८ टक्के सेंद्रिय कर्ब असतो. भारतातील साधारण ६७ टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे. महाराष्ट्रातील ५० टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी, तर ३८ टक्के जमिनीत मध्यम प्रमाणात आहे.

सेंद्रिय कर्ब कमी का होतो?

आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ती जास्तीत जास्त ०.०६ टक्क्यापर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सिडेशन’ होते. प्राणवायू व सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे त्याचे ज्वलन होते. शेतामध्ये उसाचे पाचट, कडबा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणखी कमी होत आहे.

Soil Health
Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेचे संवर्धन

जागतिक हवामान बदलाला बळी पडणारा मातीतील महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब. जमिनीच्या सुपीकतेला सेंद्रिय कर्ब बळकट करतो. मातीचे आरोग्य मूल्यमापन करण्यासाठी कार्बन संबंधित विशिष्ट प्रमाण लक्षात घेतले जाते. यामध्ये कार्बन डायऑक्साइड मुक्त होणे, ह्युमसची पातळी, सूक्ष्मजीव चयापचय या क्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात. अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध होतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो किंवा वातावरणातील कार्बन डायऑक्साइडसोबत मातीतील खनिजांची जी अभिक्रिया होते, त्या प्रक्रियेत आढळतो.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आहे. मातीच्या १२ टक्के ते १८ टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती असे संबोधतात. ५ ते २० टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात सूक्ष्म जिवांच्या कृतीद्वारे पुरवला जातो. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजिवांचे खूप मोलाचे योगदान असते. साधारणतः जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६० टक्यांपेक्षा जास्त असावे.

सेंद्रिय कर्बावर होणारा बदलत्या हवामानाचा परिणाम :

हवेतील पाण्याची वाफ (बाष्प), कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि अन्य वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते, त्याला हरितगृह परिणाम म्हणतात. या नैसर्गिक हरितगृह परिणामाबरोबरच औद्योगिक, कृषी व पूरक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळेही पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल म्हणतात.

नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमानवाढीचे प्रमाण हे मानवनिर्मित घटनांतून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना अधिक चिंताजनक वाटते. याचे परिणाम सर्व सजीवांना निश्चितपणे भोगावे लागणार आहेत.

जागतिक हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावर होणारे परिणाम, हवामान बदलाचा सेंद्रिय कर्बावर होणारा परिणाम व त्याची भविष्यवाणी करणे कठीण असते. हवामानाच्या घटकांचा व मृदा घटकांचा एकमेकांशी असणारा संमिश्र परस्पर संबंधामुळे सेंद्रिय कर्बाच्या नुकसानीची आकडेवारी काढणे अवघड जाते.

Soil Health
Organic Carbon : कर्ब संचयनाबाबत जागरूकता आवश्यक

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण (टक्केवारी) सुपीकता निकष

०.२० टक्क्यापेक्षा कमी अत्यंत कमी

०.२१ ते ०.४० टक्के या दरम्यान कमी

०.४१ ते ०.६० टक्के मध्यम

०.६१ ते ०.८० टक्क्यांपर्यंत थोडेसे जास्त

जास्त ०.८० ते १.०० जास्त

१.०० टक्क्यापेक्षा पुढे अत्यंत जास्त

परिणाम करणारे घटक

तापमान वाढ आणि सेंद्रिय कर्ब :

तापमान वाढीचा सेंद्रिय कर्बावर नकारात्मक परिणाम होतो. वाढत्या तापमानामुळे कर्बाचे सूक्ष्मजीव अपघटन वाढून परिणामी कर्बाच्या नुकसानीला उत्तेजन मिळते. या उलट थंड प्रदेशात हे अपघटन कमी होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

वाढता कार्बन डायऑक्साईड आणि सेंद्रिय कर्ब :

वातावरणातील कार्बन डायऑक्साईड स्वरूपातील कर्बात वाढ होऊन त्याचा प्रकाश संश्लेषणासाठी लाभ होऊ शकतो. मात्र, या प्रकाश संश्लेषणाद्वारे सेंद्रिय कर्बात रूपांतर होतेच, याची खात्री देता येत नाही. त्यावेळी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे नुकसान निरंतर चालू असते.

आपण मशागत करतो, त्यावेळी त्याचे प्रमाण वाढते. उलट कमीत कमी मशागत केल्यास सेंद्रिय कर्बाच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.

सेंद्रिय कर्बाचा अनियमित प्रतिसाद :

मानवी कृत्यांचा हवामानावर होणारा बदल मुळात अनिश्चित असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात. मृदेविषयी व मृदेतील असंख्य जैविक प्रक्रियांविषयी असलेले मानवाचे अपुरे ज्ञान सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनेत बाधा आणते.

तापमानात वाढ :

ओझोन थरात झालेल्या घटीमुळे भूपृष्ठावर पडणारी अतिनील किरणांच्यामुळे जमिनीचे तापमान वाढते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा वेग वाढतो, परिणामी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होऊन जमिनीची सुपीकता कमी होते

कार्बन डायऑक्साइड व मिथेन वायू :

विघटन प्रक्रियेतून उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साइड व मिथेन हे हरितगृह वायू वातावरणातील तापमान वाढ करण्यास कारणीभूत ठरतात. प्राणवायू व सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे त्याचे ज्वलन होते.

सेंद्रिय घटक जळण्याचा परिणाम :

शेतामध्ये ऊस पाचट, काडीकचरा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होत आहे.

कमी पाऊस आणि आवर्षण :

पाऊस आणि आवर्षण स्थितीमुळे सेंद्रिय कर्बाचे जास्त विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. अति पावसाच्या परिस्थितीत सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो.

दुष्काळी परिस्थितीत पाऊस कमी पडल्यामुळे मुळांची वाढ खुंटते. पिकाच्या मुळांद्वारे जमिनीस मिळणाऱ्या सेंद्रिय पदार्थांच्या वस्तुमानात घट होते.

कर्बाचे प्रकार :

जमिनीत असणाऱ्या कर्बाचे सक्रिय कर्ब, ह्यूमिक कर्ब व निष्क्रिय कर्ब असे उपप्रकार पडतात.

सक्रिय कर्ब ः पिकांच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता, सूक्ष्मजिवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त पडतो.

ह्यूमिक कर्ब ः जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी उपयुक्त .

निष्क्रिय कर्ब ः हा विघटनाचा वेग वाढून त्याचे प्रमाण कमी करतो. कालांतराने त्यापासून बनणाऱ्या ह्यूमिक कर्बाचे प्रमाणही कमी होऊन निष्क्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ होते.

ओलाव्याचे प्रमाण :

तापमान वाढीमुळे, जमिनीतील सेंद्रिय घटकांचे व अनिश्चित पर्जन्यमानामुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी होत असते, त्यामुळे परिणामी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांवर याचा अनिष्ट परिणाम होत असतो.

- गहिनीनाथ ढवळे, ९५५२५१८३२१

(लेखक महाधन ॲग्रीटेक लि. पुणे येथे सरव्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com