Solapur News : रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने व अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने एका बाजूने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला व दुसऱ्या बाजूने दुधाचे दर घसरल्याने पशुधन कसे सांभाळायचे, अशी चिंता मंगळवेढा दक्षिण दुष्काळी भागातील पशुपालकांना लागली आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाची कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. खरिपासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात वेळेवर पाऊस पडला तरच खरिपाची बाजरी, सूर्यफूल, मका आदी पिके शेतकऱ्यांच्या हाती लागतात.
रोहिणी नक्षत्राच्या पावसाने या परिसरातील शेतकरी दरवर्षी पेरण्या करतात. मात्र यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने व अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर होऊन आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
दक्षिण मंगळवेढा दुष्काळी भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने या परिसरात शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे. गावोगावी प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन जर्सी गायी घरोघरी असून, म्हशी देखील भरपूर प्रमाणात आहेत.
उन्हाळ्याच्या सुरवातीला पशुपालकांनी जनावरांना चाऱ्यासाठी मका, कडबा आदी मिळेल त्या भावाने खरेदी करून जनावरे जोपासली. विहिरीत असणाऱ्या थोड्याशा पाण्यावर पशुपालकांनी उन्हाळी वैरणी केल्या; परंतु पावसाचे आगमन लांबल्याने व विहिरी, बोअरच्या पाण्याची पातळी पूर्णपणे खालावल्याने उन्हाळी वैरणी अक्षरशः पाण्याअभावी होरपळून जात आहेत.
अनेक गावांतील विहिरी पडल्या कोरड्या
दक्षिण भागातील हुन्नूर, भोसे, रड्डे, नंदेश्वर, मानेवाडी, लोणार आदी परिसरातील विहिरी अक्षरशः कोरड्या पडल्या असून, बोअर पाण्याअभावी बंद पडले आहेत. शिरनांदगी मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी खालावली असून, भोसे तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.
पाऊस पडेल या आशेने बियाणे विक्रेत्यांनी मुबलक बियाणे खरेदी करून ठेवले असून, पाऊसच लांबल्याने बियाणे विक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने व जनावरांना घालण्यास काहीच नसल्याने बहुतांश पशुपालक आपले पशुधन कवडीमोल किमतीने विकत आहेत.
आणखी आठ ते दहा दिवस पाऊस लांबल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.