
Pune News : केंद्र शासनाने घोषित केलेल्या उद्दिष्टानुसार इंधनातील इथेनॉल मिश्रण प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सद्यःस्थितीत ८०० कोटी लिटर इथेनॉलचा तुटवडा आहे. खरेदीदर न वाढवल्यास तुटवडा कायम राहील, असा दावा साखर उद्योगातील जाणकारांनी केला आहे.
देशात अद्यापही इथेनॉलचे मिश्रण प्रमाण २० टक्क्यांपर्यंत गेलेले नाही. अर्थात, काही राज्यांमधील ‘इंधन विक्री केंद्रां’वर जादा मिश्रण प्रमाण असलेल्या पेट्रोलची विक्री सुरू आहे. परंतु अशा केंद्रांची संख्या नगण्य म्हणजेच १६०० च्या आसपास आहे. मिश्रणाचा कार्यक्रम वेगाने पुढे नेण्यासाठी केंद्राने उसाबरोबरच मका, तांदूळ व इतर अन्नधान्यापासून तयार झालेल्या इथेनॉलसाठी देखील खरेदी दर जाहीर केले. मात्र अलीकडेच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणली गेली. त्यानंतर इथेनॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळावरील अनुदानही केंद्राने मागे घेतले आहे. दुसऱ्या बाजूला इथेनॉलसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या तांदळाचा पुरवठादेखील कमी करण्यात आला आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी साखर उद्योगाला विविध अडचणी येत असल्या, तरी मूळ मुद्दा इथेनॉलसाठी तेल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या कमी दराचा असल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. केंद्राला २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण खरोखरच अमलात आणायचे असल्यास इथेनॉलचा सध्याचा खरेदीदर प्रतिलिटर ६५.६१ रुपयांवरून किमान ६९.८५ रुपयांपर्यंत वाढवायला हवा, अशी मागणी भारतीय साखर कारखाने संघटनेने यापूर्वीच केली आहे. इथेनॉल निर्मिती वाढवायची असल्यास साखर उद्योगाला किमान अजून १८ हजार कोटी रुपये गुंतवावे लागतील. मात्र त्यासाठी साखर कारखान्यांनी सावधपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. कारण गुंतवणूक वाढवायची असल्यास इथेनॉल निर्मिती प्रकल्प नफ्यात चालणे गरजेचे आहेत. परंतु खरेदीदर वाढल्याशिवाय नफादेखील वाढणार नाही. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक वेगाने होण्यात अडचणी येत आहेत, असा युक्तिवाद साखर उद्योगाकडून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.