Food Adulteration : वेळीच ओळखा अन्नातील भेसळ

Human Health : अन्नातील भेसळ ही भयंकर समस्या असून, त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अलीकडे ग्राहकांमध्ये जागरूकता होऊ लागलेली असली तरी बहुतांश सामान्य लोकांपर्यंत भेसळीचे आरोग्यासाठी असलेले भीषण परिणाम अद्याप माहिती नाहीत.
Food Adulteration
Food AdulterationAgrowon

दिशा चव्हाण

Food Quality : अन्नातील भेसळ ही भयंकर समस्या असून, त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अलीकडे ग्राहकांमध्ये जागरूकता होऊ लागलेली असली तरी बहुतांश सामान्य लोकांपर्यंत भेसळीचे आरोग्यासाठी असलेले भीषण परिणाम अद्याप माहिती नाहीत.

श रीरासाठी पोषक आणि ताजे अन्न अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वी ग्रामीण पातळीवर बहुतांश अन्नधान्य, खाद्य पदार्थ हे पंचक्रोशीमध्ये उत्पादित केलेले असत. मात्र वाढत्या शहरीकरण आणि एकल पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांना आपल्या आहारामध्ये असलेले अनेक खाद्य पदार्थ हे कोठून आले आहेत, याचा अंदाजही करणे शक्य होत नाही. आता गहू वेगळीकडचा, दूध एकीकडचे, डाळ दुसरीकडची, तर भाजीपाला तिसऱ्याच ठिकाणचा अशी परिस्थिती असते. वाहतुकीच्या सोयी वाढल्या आहेत. आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले अन्नधान्य किंवा पदार्थ नेमका कोणी उत्पादित केला, वितरित केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला, याचा काही अंदाजही बांधता येत नाही. यातील कोणत्याही टप्प्यावर त्यामध्ये भेसळ होऊ शकते. रोजच्या आहारामध्ये असलेल्‍या अनेक पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भेसळ केली जाते. अलीकडे ग्राहकांमध्ये जागरूकता होऊ लागलेली असली तरी बहुतांश सामान्य लोकांपर्यंत भेसळीचे आरोग्यासाठी असलेले भीषण परिणाम अद्याप माहिती नाहीत.

अन्न भेसळ म्हणजे काय?

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने केला जाणारा बदल म्हणजे अन्न भेसळ होय.

आर्थिक फायद्यासाठी अन्न उत्पादनांमध्ये विविध घटक मिसळले जातात. त्यामुळे त्या पदार्थाच्या रंग, देखावा, चव, वजन, मात्रा आणि टिकवण क्षमता यापैकी कोणत्याही गुणधर्मांमध्ये बदल केले जातात.

प्रजाती, प्रथिने सामग्री, चरबी सामग्री किंवा वनस्पती घटकांसह बदलणे हे अन्न भेसळीचे प्रमुख प्रकार आहेत.

Food Adulteration
Food Adulteration : ओळखा अन्नपदार्थांतील भेसळ

बाजारातील अन्नाची मागणी वाढविण्यासाठी अन्नाचे चुकीचे वर्णन केले जाते.

मानवी शरीरावर जलद प्रभाव सुनिश्‍चित करण्यासाठी सेंद्रिय आणि कृत्रिम संयुगे जोडले जातात.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक नुकसान होते. भेसळीचे आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होऊ शकतात. भेसळयुक्त अन्नामुळे अतिसार, मळमळ, ॲलर्जिक प्रतिक्रिया, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग इ. आजार वारंवार दिसून येतात.

काही पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीमुळे कर्करोगकारक (कार्सिनोजेनिक), पेशींच्या एक किंवा दोन स्वरूपावर आघात करणारे (क्लॅस्टोजेनिक) आणि गुणसूत्रासाठी हानिकारक (जीनोटॉक्सिक) गुणधर्म दिसून येतात.

अन्न भेसळीचे तीन प्रकार

जाणीवपूर्वक केलेली भेसळ ः

अन्नपदार्थांमध्ये हेतुपुरस्सर एकसमान गुणधर्म असलेल्या निकृष्ट पदार्थांची भर घातली जाते. हे हानिकारक घटक वेगळे करणे कठीण असतात. भेसळीचे स्वरूप हे भौतिक किंवा जैविक असू शकते. अधिक फायदा उपटण्याच्या उद्देशाने बेईमान उत्पादक किंवा व्यापाऱ्यांकडून हेतुतः भेसळ केली जाते. कोणत्या पदार्थांची भेसळ केली जाते, यावरून त्याची आरोग्यासाठी धोक्याची पातळी वेगवेगळी असू शकते. भेसळीमुळे पोषक तत्त्वे कमी होतात.

आकस्मिकपणे झालेली भेसळ

आकस्मिक अन्न भेसळ ही सहसा निष्काळजीपणा, अज्ञान किंवा शेतापासून टेबलापर्यंत अन्न प्रक्रिया करताना योग्य सुविधा आणि स्वच्छतेच्या अभावामुळे होते. अनवधानाने होणाऱ्या अन्न भेसळीसाठी प्रामुख्याने उत्पादन पद्धती; वेगवेगळ्या टप्प्यावरील हाताळणी, प्रक्रिया आणि साठवण यातील निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. उदा. कीडनाशकांची फवारणी करताना काढणीपूर्व कालावधीचा विचारच शेतकरी करत नाही. त्यामुळे कीडनाशकांचे अंश त्या शेतीमालामध्ये राहण्याचा धोका मोठा असतो. ही बाब अज्ञानामुळे होते किंवा ‘काय होतेय त्याला’ अशा बेफिकिरीमुळे होत असते. दीर्घकाळ साठवणीसाठी मिसळली जाणारी धूरकारके किंवा कीडनाशके अन्नपदार्थांमध्ये तशीच राहण्याची धोका असतो. म्हणजेच आपण शेतकरीही कळत नकळत अन्नभेसळीसाठी कारणीभूत ठरत असतो.

Food Adulteration
Ghee Adulteration : तुम्ही खाताय ते तूप खरंच शुध्द आहे का? ; अशी ओळखा भेसळ

जड धातूची भेसळ ः

जड धातूंचे अंश अन्नपदार्थांमध्ये येणे ही बाब कळत नकळत होते. ज्या ठिकाणी व पाण्यावर पीक घेतले जाते, त्या जमीन किंवा पाण्यामध्ये मुळांत जड धातूंचे प्रमाण अधिक असणे, ही बाब आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. उदा. कीटकनाशकांपासून आर्सेनिक, पाण्यातून शिसे, रासायनिक सांडपाण्यातील पारा आणि अन्य जडधातूंचा समावेश अन्नपदार्थांमध्ये होतो.

निष्कर्ष

अन्न भेसळ म्हणजे निकृष्ट दर्जाचे पदार्थ घालून किंवा बदलून किंवा अत्यावश्यक पदार्थांमधून काही मौल्यवान घटक काढून टाकून खरेदी केलेल्या पदार्थांची गुणवत्ता जाणूनबुजून कमी करणे ही एक वाढती जागतिक समस्या आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, तेल आणि चरबी, मसाले आणि मसाले आणि कॉफी आणि चहा यांसारख्या पेयांसह आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या पदार्थातील भेसळीचे परिणाम आर्थिक नुकसानापासून सार्वजनिक आरोग्यापर्यंत विनाशकारी असू शकतात.

कायदे असले तरी त्यात आवश्यकतेनुसार बदल आणि कठोर अंमलबजावणी यांचा अभाव हे अन्न भेसळीतील झपाट्याने वाढीचे प्राथमिक कारण आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींना अत्यंत कडक शासन करण्याची आवश्यकता आहे.

अंतिम वापरकर्ते म्हणून ग्राहकांमध्ये भेसळीविषयी जागरूकता करण्याची आवश्यकता आहे. अन्नातील भेसळ ओळखण्यापासून स्वतः आणि आपल्या कुटुंबांच्या संरक्षणापर्यंत माहिती सातत्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. भेसळ ओळखण्याच्या साध्या सोप्या चाचण्या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.

भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्याची तक्रार नेमकी कोठे, कशी करायची याचीही माहिती व शिक्षण झाले पाहिजे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली पाहिजे. यामध्ये तक्रारकर्त्यांची ओळख गुप्त ठेवण्याबाबतही विचार झाला पाहिजे. त्यामुळे भेसळीच्या तक्रारी करण्यासंदर्भातील सर्वसामान्यातील भीती कमी होईल.

सार्वजनिक आरोग्यावर अन्न भेसळीचे परिणाम

अन्नातील भेसळ जुलाब, पोटदुखी, मळमळ, उलट्या, दृश्य विकार, डोकेदुखी, कर्करोग, अशक्तपणा, निद्रानाश, स्नायू पक्षाघात, मेंदूचे नुकसान, पोटाचे विकार, चक्कर येणे, सांधेदुखी, यकृत रोग, जलोदर, आतडे व पचनसंस्थेच्या समस्या, श्‍वासोच्छ्वासाच्या समस्यांशी जोडलेले आहे. तीव्र व सातत्याने अन्न भेसळयुक्त आहारामुळे आतड्यांना सूजेसह हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत परिणाम पोहोचू शकतात.

मेलामाइन हे नायट्रोजन-समृद्ध संयुग असून, दुधातील नैसर्गिक प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी दुधामध्ये मिसळले जाते. या मेलामाइनच्या सेवनामुळे मूत्रपिंड निकामी होणे, मूतखडे आणि मूत्रमार्गात संसर्ग होतात.

तेलाच्या भेसळीमुळे पित्ताशयाचा कर्करोग, जलोदर, काचबिंदू, दृष्टी कमी होणे, पक्षाघात, यकृत खराब होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

काही भेसळयुक्त पदार्थांमुळे कर्करोग होण्याच्या शक्यता वाढतात. भेसळयुक्त अन्नाचे दीर्घकाळ सेवन मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरते.

अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कोणती कारवाई होते?

आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. नवीन कायद्यात अन्नपदार्थांचे नमुने घेणाऱ्या व्यक्तीला अन्न निरीक्षकाऐवजी अन्न सुरक्षा अधिकारी असे संबोधले जाते. भेसळ आढळल्यास या अधिकाऱ्याकडून रु. १० लाखांपर्यंत दंड देखील ठोठावण्यात येतो. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ शिवाय अन्नपदार्थांवर नियंत्रणासाठी ॲगमार्क, बी.आय.एस., भारतीय दंड संहिता (कलम २७२, २७३) हे कायदे आहेत.

दिशा चव्हाण, ८८५६८१४६७४ (सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, सोनई, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com