
Karmala News : करमाळा ः जळगावनंतर करमाळ्यात केळीचे क्षेत्र वाढते आहे, इथले वातावरण केळीसाठी अत्यंत पोषक आहेच. पण निर्यातक्षम केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे, त्यात मोठ्या संधी आहेत, असे मत प्रयोगशील केळी उत्पादक कपिल जाचक यांनी करमाळ्यात व्यक्त केले.
करमाळा तालुक्यातील कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कमलाई कृषी प्रदर्शन आणि निर्यातक्षम केळी व डाळिंब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. जाचक बोलत होते. डाळिंब मार्गदर्शक राहुल रसाळ आणि पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पाणी फाउंडेशनचे रवींद्र खोमणे, विभागीय समन्वयक संतोष शिंनगारे, सुखदेव भोसले, विक्रम फाटक, उमेदचे योगेश जगताप, प्रा. लक्ष्मण राख आदी उपस्थित होते.
श्री. जाचक म्हणाले, की केळीमध्ये पारंपरिक पद्धतीने लागवड न करता ती जोड ओळ पद्धतीने केली पाहिजे, त्याचा फायदा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी होतोच, त्याबरोबर आंतरमशागत करणेही सोपे जाते. केळी हे पीक सूर्यप्रकाशाचे भुकेलेले असते, त्यामुळे लागवड ही नेहमी उत्तर-दक्षिण याच पद्धतीने केली पाहिजे. केळीच्या शेतामध्ये कसलाही काडी कचरा न ठेवता, तो बाहेर काढून आपण त्याचे खत तयार केले पाहिजे. या साध्यासाध्या गोष्टींचे आपण पालन करत गेलो, तर केळी निर्यात करणे अजिबात अशक्य नाही. त्याचबरोबर केळीसाठी जे अन्नघटक आवश्यक आहेत, त्याची मात्रा नियमितपणे ड्रेंचिंगच्या माध्यमातून गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
डाळिंबाविषयी राहुल रसाळ म्हणाले, की गेल्या २० वर्षांपासून डाळिंबामध्ये आहे, यामध्ये कधीच अपयश आले नाही, याचे कारण म्हणजे पिकाला योग्य ती खते आणि पाणी देण्याच्या वेळा, फवारणी करण्याची वेळा महत्त्वाच्या ठरल्या, मुख्यतः व्यवस्थापनावरच याचे गणित अवलंबून आहे. त्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही आवर्जून केला. शेतकऱ्यांकडे हायड्रोमीटर, टीडीएस मीटर हे मीटर असलीच पाहिजेत, कारण आपण पिकांसाठी जी महागडी खते-कीटकनाशके वापरतो, त्यातील ५० टक्के वाया जातात, वाया जाणारा हा खर्च केवळ या दोन मीटरने वाचू शकतो, असेही ते म्हणाले. डॉ. अविनाश पोळ यांनी जाचक आणि रसाळ ही दोन ज्ञानपीठे आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांचा अनुभव मोठा असल्याचे सांगितले. कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सुजाता भोर यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र देशमुख यांनी आभार मानले.
महिला गटांसह शेतकऱ्यांचा सन्मान
या कार्यक्रमात चेंज मेकर पुरस्कार देऊन तालुक्यातील १० महिला गटांचा व विक्री उत्पन्न घेणाऱ्या २ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्या महिला गटांमध्ये महालक्ष्मी महिला शेतकरी गट (साडे), अन्नपूर्णा महिला शेतकरी गट (पोटेगाव), संघर्ष महिला शेतकरी गट (कोर्टी), जिजाऊ महिला शेतकरी गट (फिसरे), जिजाऊंच्या लेकी महिला शेतकरी गट (सरपडोह), मदार महिला शेतकरी गट (घोटी), कुटुंब महिला शेतकरी गट (कुंभारगाव), क्रांती ज्योती महिला शेतकरी गट (शेलगाव (क), राजमाता महिला शेतकरी गट (वीट), कृषी क्रांती महिला शेतकरी गट (हिसरे) यांचा समावेश आहे. तर वैयक्तिक शेतकरी पुरस्कारात राहुल राऊत (कुंभारगाव) आणि अक्षय शेंडे (घोटी) यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनालाही शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.