Humani Control : हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

White Grub Pest Management : हलक्या ते मध्यम जमिनीतील बहुतांश सर्व पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मॉन्सूनपूर्व पावसाच्या काळात हुमणीचे भुंगेरे बाहेर पडतात. हुमणीची प्रौढ भुंगेरे आणि अळी अवस्था अधिक नुकसानकारक असते.
Humani Pest
Humani PestAgrowon
Published on
Updated on

Crop Protection : हुमणी या बहुभक्षी किडीला वेगवेगळ्या भागामध्ये उन्नी, उकरी, गांढर, खतातील अळी, मे-जून भुंगेरे किंवा जून भुंगेरे, कॉकचाफर्स व मुळे खाणारी अळी अशा नावानेही ओळखले जाते. दरवर्षी अनेक पिकांमध्ये प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींमध्ये वाढ होत आहे.

मागील काही वर्षांपासून मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम जमिनीतील बहुतांश सर्व पिकांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या भागातील मध्यम ते कमी व अनियमित पाऊस हे हुमणीसाठी अनुकूल ठरत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी मॉन्सूनपूर्व पावसाच्या काळात बाहेर येणारे भुंगेरे पकडून सामुदायिकरीत्या नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे.

ओळख

हुमणी किडीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष अशा चार अवस्था आहेत.

प्रौढ : लालसर किंवा तपकिरी रंग, लांबी २ सें.मी. व रुंदी १ सें.मी., पुढील पंख टणक, तर मागील पंखाची जोडी पातळ पारदर्शक असते. मादी ही नरापेक्षा आकाराने थोडी मोठी असते. भुंगेरे निशाचर असून उडताना ‘घुंऽऽ घुंऽऽ’ असा आवाज करतात.

अंडी : पिवळसर पांढरी

अळी : मऊ, पांढरे शरीर, डोके मजबूत व पिवळसर लाल किंवा तपकिरी रंगाचे, पूर्ण वाढलेली अळी ३-५ सें.मी. लांबीची, विश्रांतीवेळी अळीचा आकार इंग्रजी ‘C’ सारखा दिसतो. अळीच्या मागील टोकाकडील शरीरातील माती दिसते. अळीला पायाच्या तीन जोड्या असतात.

कोष : कोषाची लांबी ३ सें.मी. व रुंदी १.२ सें.मी., रंग तपकिरी असतो.

Humani Pest
Humani Pest Control: ऊस पिकातील हुमणी नियंत्रणासाठी तातडीचे उपाय

जीवनक्रम

पहिल्या चांगल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर निघतात. संध्याकाळी हे प्रौढ भुंगेरे खाद्य वनस्पतीभोवती थोडा वेळ उडतात व नंतर झाडावर बसून रात्रभर पाने खातात. या झाडावरच नर व मादीचे मिलन होते. पहाटे भुंगेरे पुन्हा जमिनीत लपतात. मिलनानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये ७ ते १२ सें.मी. खोलीपर्यंत सुमारे २० ते २५ अंडी घालते.

अंडी घालण्याचा कालावधी जून, जुलै व ऑगस्टपर्यंत असतो. अंडी अवस्था ८ ते १० दिवसाची असून, त्यानंतर अळ्या बाहेर पडतात. अळीच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले पदार्थ खाते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी पिकांच्या मुळे कुरतडून त्यावर उपजीविका करते.

अळीची पूर्ण वाढ ६ ते ८ महिन्यांमध्ये होते. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत २० ते ४० सें.मी. खोलीवर मातीचे कोषावरण तयार करते. त्यात कोषावस्थेत जाते. कोषावस्था २ ते ३ आठवड्यांची असते. यानंतर कोषातून प्रौढ बाहेर पडले तरी पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. प्रौढ १ ते ३ महिने जिवंत राहतात. अशा प्रकारे हुमणी किडीची एका वर्षामध्ये केवळ एकच पिढी तयार होते.

Humani Pest
Humani Pest Control: हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण

खाद्य वनस्पती

प्रौढ भुंगेरे व अळी यांच्या खाद्य वनस्पती वेगवेगळी आहेत.

प्रौढ भुंगेरे : बाभूळ, कडुनिंबाची पाने खातात.

अळी : अळी विविध पिकांच्या मुळ्या कुरतडून त्यावर उपजीविका करते. उदा. सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, आले, भाजीपाला पिके.

नुकसानीचा प्रकार

अळी जमिनीत राहून पिकाची मुळे कुरतडत असल्याने झाडे सुरुवातीला पिवळी पडून सुकतात. नंतर वाळतात. अशी झाडे सहजरीत्या उपटली जातात तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात.

एकात्मिक व्यवस्थापन

हुमणीचे प्रौढ भुंगेरे व अळ्या यांचे खाद्य व आढळ ही वेगवेगळी आहेत. या दोन्हींचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.

प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन

मशागतीय पद्धती

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असलेले प्रौढ भुंगेरे पृष्ठभागावर येतात. ते सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात किंवा पक्षी खाऊन टाकतात.

नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकावेत.

यांत्रिक पद्धती

मार्च ते जून महिन्यांत चांगला पाऊस पडताच सूर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे बाभूळ, कडुनिंब यासारख्या झाडांवर खाद्यासाठी किंवा मिलनासाठी एकत्र येतात. रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडून ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकावेत. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करावा.

प्रौढ भुंगेरे प्रकाश सापळ्यांतील प्रकाशाकडे आकर्षित होतात. शेतामध्ये संध्याकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत प्रकाश सापळे लावावेत. या सापळ्यात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत.

कीटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात. रात्री भुंगेरे या फांद्यांची पाने खाल्ल्यामुळे मरतील.

जैविक पद्धती

पक्षी, कुत्रे, व वराह भुंगेरे खातात.

रासायनिक पद्धती

जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब इ. झाडावर कीटकनाशकाची फवारणी करावी.

अळीचे व्यवस्थापन

पीक काढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी.

अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये निंदणी आणि कोळपणी ही आंतरमशागतीची कामे करावीत. या वेळी वर आलेल्या हुमणीच्या अळ्या पक्षी वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने मरतात किंवा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी देऊन काही काळ तुंबवून ठेवावे. त्यामुळे श्‍वासोच्छ्वास न करता आल्याने जमिनीतील अळ्या मरतात.

मेटारायझिम ॲनिसोप्ली १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापरावे. ही बुरशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करते.

हुमणी अळीला रोगग्रस्त करणाऱ्या उपयुक्त सूत्रकृमीचा वापर करावा.

हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशके

अ.क्र. पीक कीटकनाशक प्रमाण

१. ऊस (आळवणीसाठी) फिप्रोनील (४० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड

(४० टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त कीटकनाशक) ४ ग्रॅम/१० लिटर

२. भुईमूग (आळवणीसाठी) फिप्रोनील (४० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड

(४० टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त कीटकनाशक) ३ ग्रॅम/१० लिटर

- डॉ. योगेश मात्रे, ७३८७५२१९५७

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com