Warehouse Business : गोदाम व्यवसाय सुधारण्यासाठी मोठी संधी

शेतकरी उत्पादक कंपनीने नुसतेच गोदाम बांधून शेतीमालाचे संकलन करून प्रक्रिया उद्योगाला शेतीमाल पुरवठा करणे अपेक्षित नाही. शेतकरी सभासदांचा शेतीमाल योग्य वेळी, योग्य बाजारभाव पाहून बाजारात आणण्याची जबाबदारी या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनीने घेणे अपेक्षित आहे.
Warehouse Business
Warehouse BusinessAgrowon
Published on
Updated on

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

गोदाम उभारणीनंतर शेतीमाल मूल्यसाखळीचे व्यवस्थापन आणि शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन करताना वखार विकास व नियामक प्राधिकरणाने (WDRA-Warehouse Development Regulatory Authority) शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांना काही विशेष सवलती दिलेल्या आहेत. या तरतुदी करताना गोदाम (Warehouse) प्रमाणीकरण प्रक्रियेत प्राधिकरणाकडून काही अटी शिथिल केल्या असून, ज्या शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Company) व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांच्याकडे स्वत:ची गोदामे आहेत त्यांनी याचा पुरेपूर फायदा घेऊन तत्काळ या व्यवसायात पुढचे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

नुसतेच गोदाम बांधून शेतीमालाचे संकलन करून प्रक्रिया उद्योगाला शेतीमाल पुरवठा करणे अपेक्षित नाही. शेतकरी सभासदांचा शेतीमाल योग्य वेळी, योग्य बाजारभाव पाहून बाजारात आणण्याची जबाबदारी या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांनी घेणे अपेक्षित आहे.

वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे राज्यस्तरीय सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गोदाम प्रमाणीकरण नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज येतात. या सर्व संस्थांची गोदामे मुख्यत्वे करून लहान व कमी क्षमतेची असून ती शेतकरी वर्गाच्या सान्निध्यात किंवा छोट्या गावांमध्ये उभारण्यात आलेली आहेत.

या शेतकरीभिमुख संस्था सभासद शेतकऱ्यांचा शेतीमाल गोदामात संकलित करून त्यावर शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याचा प्रयत्न करीत असतात. ही गोदामे कमी क्षमतेची असून, त्यांना कोणतेही साह्य नसल्याने आणि कोणत्याही प्रकारचे वैज्ञानिक पद्धतीने गोदाम चालविण्याबाबतचे व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने त्यांना गोदाम व्यवसायात विविध सुधारणा करण्यास मोठा वाव आहे. त्यांच्या या सर्व गरजांचा विचार करता त्यांना आर्थिक व पायाभूत सुविधा उभारणीची गरज लक्षात घेऊन गोदाम नोंदणी व प्रमाणीकरण अटींमध्ये शिथिलता आणून काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

अ) प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी करिता गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेत आर्थिक सूट -

१) गोदाम प्रमाणीकरण नोंदणी शुल्क फक्त ५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. इतर संस्थांना हेच शुल्क २०,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने केलेल्या पाठपुराव्यानुसार सद्यःस्थितीत प्राथमिक कृषी सहकारी संस्थाकरिता गोदाम प्रमाणीकरण नोंदणी शुल्क फक्त ५०० रुपये करण्यात आले आहे.

२) प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरिता नेटवर्थ (नेटवर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीच्या सर्व गैर-आर्थिक आणि आर्थिक मालमत्तेचे मूल्य वजा जाता त्याच्या सर्व थकबाकी दायित्वचे मूल्य.) हे चांगले किंवा उत्तम असावे असे अपेक्षित असून, ते गोदाम क्षमतेशी जोडलेले नाही, परंतु इतर संस्थांना नेटवर्थ गोदाम क्षमतेशी जोडणे अनिवार्य केले आहे.

३) सुरक्षा ठेव रक्कम ही प्रति गोदाम ५०,००० रुपये ठेवण्यात आलेली असून, ती बँक पतहमी (बँक गॅरंटी) किंवा मुदतठेव स्वरूपात (ही रक्कम स्थिर असून ई- निगोशिएबल गोदाम पावती किंवा ई-नॉन निगोशिएबल गोदाम पावतीच्या किमतीच्या प्रमाणात) असावी, परंतु इतर संस्थांना ही रक्कम कमीत कमी एक लाख रुपये असून, त्यासोबत ई- निगोशिएबल गोदाम पावतीच्या मूल्यावरील व्यवसायाच्या टक्केवारीची रक्कमसुद्धा वेगळी जमा करावी लागते.

ब) प्राधिकरणामार्फत प्राथमिक कृषी सहकारी संस्थाकरिता गोदाम प्रमाणीकरण प्रक्रियेत कृषी पायाभूत सुविधा उभारणीत/ गोदाम उभारणीत काही प्रमाणात अटी शिथिलता -

१) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठी गोदाम उभारणीची जागा ही उंचावर असावी. त्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता नाही किंवा ज्या ठिकाणी गोदामाची जागा पाण्याच्या संपर्कात येण्याची शक्यता असू शकते अशा ठिकाणी गोदामाच्या पायाची उंची किमान ३० सेंटिमीटर असावी. परंतु ही अट इतर संस्थांना लागू नाही. रस्त्यालगत उभारणी करण्यात येणाऱ्या गोदामांच्या पायाची जमिनीपासून उंची किमान ६१ सेंटिमीटर आणि रेल्वेलगत उभारण्यात येणाऱ्या गोदामांच्या पायाची जमिनीपासून उंची किमान ९१ सेंटिमीटर असणे आवश्यक आहे.

२) वखार प्राधिकरणामार्फत प्रमाणित गोदाम उभारणी करिता प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठीच्या गोदामाची क्षमता किमान १०० टन असणे आवश्यक आहे.

३) गोदाम उभारणी करताना आतल्या भागातील स्टॅकिंग प्लॅन (गोदामातील अंतर्गत पोत्यांची उभी व आडवी मांडणी) यांचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. गोदामाची भिंत व पोत्यांची उभी व आडवी मांडणी यांच्यात पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

४) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठीच्या गोदामांची उभारणी मुख्यत्वे करून त्यांच्या सभासद शेतकरी वर्गासाठी झालेली असल्याने, तसेच या संस्थांकडे पुरेशी जागा उपलब्ध नसून उभारण्यात आलेली गोदामे लहान आणि कमी क्षमतेची असल्याने वाहनांसाठी पार्किंग सुविधा व गोदामाच्या चारही बाजूला मोकळी जागा अशी अट शिथिल करण्यात आली आहे.

५) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठीच्या गोदामांतील गोदाम पावती व्यवस्थापन व गोदामाची निगडित कामकाजाकरिता संस्थेच्या सचिवाव्यतिरिक्त पूर्ण वेळ गोदाम व्यवस्थापक नेमणे आवश्यक आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेसाठी गोदामाकरिता सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे, परंतु अनिवार्य नाही.

Warehouse Business
Strawberry Farming : महाबळेश्‍वरसह भाव खातेय नाशिक- सापुताराची स्ट्रॉबेरी

६) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठीच्या गोदामांना पक्क्या विटांच्या भिंतीचे कुंपण अथवा तारेचे कुंपण अनिवार्य नाही. परंतु गोदामातील शेतीमालाच्या सुरक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन अथवा व्यवस्था करणे आवश्यक आहे.

७) प्राथमिक कृषी सहकारी संस्थांसाठीच्या ५०० टन क्षमतेच्या गोदामांना कमीत कमी एक आग विझवणारी यंत्रणा आणि वाळूने भरलेल्या सहा लोखंडी बादल्यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच ५०० टन क्षमतेच्या पुढील गोदामांना वखार विकास व नियामक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार १,५०० टन क्षमतेपर्यंतच्या गोदामांना कमीत कमी तीन आग विझवणाऱ्या यंत्रणा आणि वाळूने भरलेल्या १५ लोखंडी बादल्यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

प्राधिकरणामार्फत कमी क्षमतेच्या छोट्या गोदाम धारकांसाठी काही अटींमध्ये शिथिलता -

कमी क्षमतेच्या छोटे गोदाम असणाऱ्या गोदामधारकांनी प्राधिकरणाला विनंती केल्याने गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेतील नोंदणी शुल्क, नेटवर्थ, सुरक्षा शुल्क इत्यादी अटींमध्ये शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या सेवांमुळे शिथिलता आणण्याबाबत विचार करण्यात आला. त्यानुसार २१.१२.२०२० च्या गॅझेट नोटिफिकेशननुसार शासनाच्या परवानगीने प्राधिकरणाने छोट्या गोदाम व्यवस्थापनातील विविध अडचणी समजून घेऊन आणि अशा गोदामधारकांना गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेचे प्रोत्साहन देण्यासाठी खालील अटींमध्ये सूट देण्यात आली आहे.

१) गोदाम प्रमाणीकरण नोंदणी शुल्क ५,००० टन क्षमतेपेक्षा कमी क्षमता असणाऱ्या गोदामधारकांना २०,००० रुपये वरून ५,००० ते १५,००० रुपयांदरम्यान विविध क्षमतेनुसार शुल्क करण्यात येते.

२) गोदाम क्षमतेनुसार नेटवर्थ ठरविण्यात आले आहे. विविध गोदाम क्षमतेनुसार नेटवर्थ ५० लाख ते ५ कोटी रुपयांवरून ४ लाख ते २ कोटींपर्यंत कमी करण्यात आले आहे.

Warehouse Business
Green House : हरितगृह उभारणीत शेतकऱ्याची फसवणूक

३) सुरक्षा रक्कम ठेवींबाबत एकूण २,००० टन गोदाम क्षमतेपर्यंत असणाऱ्या गोदामांना एक लाख रुपये (स्थिर रक्कम) अधिक ३ टक्के ई- निगोशिएबल गोदाम पावतीच्या रकमेपासून ५०,००० रुपये (स्थिर रक्कम) अधिक ३ टक्के ई- निगोशिएबल गोदाम पावती पर्यंत कमी करण्यात आली.

४) शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपनीसाठी रिपोसिटरी शुल्क (ज्यांचे गोदाम आहे किंवा ज्यांच्या गोदामात शेतीमाल ठेवला जातो ती संस्था अथवा कंपनीस रिपोसिटरी संबोधले जाते.) ५ रुपये प्रति टन आणि ५०० रुपये प्रति ई- निगोशिएबल गोदाम पावती आणि ४० रुपये (स्थिर रक्कम) आणि ई- नॉन निगोशिएबल गोदाम पावती कोणत्याही क्षमतेसाठी शुल्क ठेवण्यात आलेले आहे.

लेखक - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com