Kharif Season 2024 : कोरडवाहू जमिनीत आंतरपीक पद्धत नेहमीच फायद्याची दिसून आली आहे. सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास आंतरपीक पद्धतीमुळे हमखास उत्पादन मिळत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कोरडवाहू जमिनीत आंतरपिक लागवडीचा नक्की विचार करा.
कोरडवाहू शेतीमध्ये शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य पिके आणि पीक पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आंतरपिके ही कमी कालावधीत येणारी, कमी पाण्यात येणारी असावीत. कोरडवाहू जमिनीत आंतरपीका निवड करताना मुख्य आणि आंतरपीकाची वाढ ही वेगवेगळी होणारी असावी. मुख्य आणि आंतरपिकाच्या मुळांच्या वाढीमध्येही भिन्नता असावी. मुख्य व आंतरपिकांच्या पक्वतेच्या कालावधीमध्ये योग्य फरक असावा. मुख्य व आंतरपीक एकमेकात स्पर्धा करणारे नसून पूरक असावेत. आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.
आता पाहुया कोरडवाहू जमिनीत कोणती आतरपिके घ्यावीत?
तूर पिकात भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी किंवा सूर्यफूल अशा वेगवेगळ्या आंतरपिकांची निवड करावी. पाऊस वेळेवर झाल्यास तुरीतील आंतरपिकास मर्यादा येत नाहीत, पण पाऊस उशिरा आला तर मात्र मूग, उडीद, सोयाबीन यांसारखी आंतरपिके घेता येत नाहीत. त्यामुळे तुरीतील आंतरपिकासाठी बाजरी आणि सूर्यफूल या दोन पिकांचा पर्याय शिल्लक राहतो. अगदीच पाऊस लांबला तर तूर अधिक सूर्यफूल आंतरपीक पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन मिळते.
आंतरपिकाची निवड करताना
कोरडवाहू जमिनीत म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करावा. यामध्ये मूग, उडीद, चवळी, सोयाबीन यासारखी पिके घ्यावीत. हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, भुईमूग यासारख्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांचा समावेश करावा. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन, हवा, सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादीसाठी स्पर्धा करणार नसाव. मुख्य पीक आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणारी आणि जास्त पसरणारी असावीत. सूर्यफूल, मका यांसारखी खादाड पिके आंतरपीक म्हणून घेणं टाळावं.
जमिनीनूसार कोणती आंतपिके घ्यावीत
सरासरी पाऊसमान आणि जमिनीचा प्रकार यावर आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, मटकी, हुलगा, तीळ, कारळा, एरंडी यांसारखी पिके घ्यावीत. मध्यम जमिनीत तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत.तर मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन आणि खरीप ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत.
हलकी जमीन - बाजरी, कुळीथ, मटकी, हुलगा, तीळ, कारळा, एरंडी
मध्यम जमीन - तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन आणि खरीप ज्वारी
मध्यम तसेच भारी जमिन - कापूस, तूर, सोयाबीन आणि खरीप ज्वारी
अशा पद्धतीने आंतरपिकाच नियोजन केलं तर चांगल उत्पादन मिळू शकत.
-----------
डॉ.आदिनाथ ताकटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.