Maharudra mangnale : वेड्या बाभळीच्या शेंगांचा पायगुण!

काल ठरल्याप्रमाणे आज सकाळी तळ्याच्या दिशेने निघालो. मगर भाऊच्या शेतापासून रस्त्याच्या कडेने या वेड्या बाभळीची अनेक झुडूपं आहेत.
Maharudra mangnale
Maharudra mangnale Agrowon
Published on
Updated on

दोन दिवसांपासून मुक्कामी सेवालयात आहे. त्यामुळं रवी बापटले, मगर भाऊ आणि नवनाथ सुर्यंवंशी यांच्या सोबतचं सकाळचं फिरणं आणि नाष्ता ठरलेला असतो.काल दुपारीच मी मगरभाऊंना म्हटलं होतं की, उद्या सकाळी फिरायला तुमच्या शेताकडं जाऊ. मला वेड्या बाभळीच्या शेंगा हव्या आहेत. या शेंगा सुपारी चघळल्याप्रमाणं मी अधूनमधून खातो. माझ्याकडंच्या संपल्यात.

काल ठरल्याप्रमाणे आज सकाळी तळ्याच्या दिशेने निघालो. मगर भाऊच्या शेतापासून रस्त्याच्या कडेने या वेड्या बाभळीची अनेक झुडूपं आहेत. पण एकालाही शेंगा दिसत नव्हत्या. खरं तर शेंगाचा हंगाम केव्हाच संपलाय. एका झाडावर काही वाळलेल्या शेंगा दिसल्या पण पावसाने त्या कुजून गेल्या होत्या. खुंटेगाव मध्यम प्रकल्पावर वेड्या बाभळीच्या शेंगांची भरपूर झुडूपं आहेत. तिथं एखाद्या दुसऱ्या झुडपाला शेंगा असण्याची शक्यता होती. त्यामुळं मी झपझप पावलं टाकत पुढे निघालो. माझ्या मागे तिघे. तळ्यावर पोचल्यावर मी बरीच झाडं बघितली पण त्यांना शेंगा दिसल्या नाहीत. मात्र अचानकपणे मगरभाऊंचं लक्ष एका झाडाकडं गेलं. त्याला परिपक्व झालेल्या हिरव्या शेंगा होत्या. त्या तोडून घेतल्या. मी तळ्याचे फोटो काढले. यावर्षी या मध्यम प्रकल्पात अजिबात पाणी आलेलं नाही. भरपूर पाऊस झाला नाही तर, चार महिन्याच्या आत हा तलाव कोरडा होऊ शकतो. तळं प्रत्यक्ष बघितल्यावर हे लक्षात आलं.

यावर्षीच्या दुष्काळाला कसं तोंड द्यायचं, हा रवी बापटले यांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सेवालय व हँप्पी इंडियन व्हिलेज मधील शंभर माणसं, जनावरं, फळबागा, झाडं यांच्यासाठी उन्हाळ्यात पाणी कुठून आणायचं,ही चिंता आहे. तळ्याजवळ एखादी विहीर घेतली तर तिला पाणी लागू शकतं. हे पाणी पाईपलाईनद्वारे व्हिलेजवर नेता येऊ शकतं. हा विचार रवीच्या डोक्यात अनेक दिवसांपासून होता. मगरभाऊंना या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या ओळखी असल्याने, कोणत्या जागी विहीर घेणं फायदेशीर ठरू शकतं,यावर चर्चा झाली. त्यातील रस्त्यालगतची एक जागा नजरेत भरली. योगायोगाने या शेतीचे मालकही तिथेच बाजुला होते. मगरभाऊंनी त्यांना विहिरीची कल्पना बोलून दाखवली. सेवालयाला विहीर घेण्यासाठी कोणतीही जागा निवडा, मी देतो, असा शब्दच त्यांनी दिला.

Maharudra mangnale
Maharudra Mangnale : या खरीप हंगामातून मुक्त झालो!

वेड्या बाभळीच्या शेंगांचा शोध घेण्यासाठी म्हणून मी आज सगळ्यांना या रस्त्याने तळ्यावर आणलं होतं. मला शेंगा तर मिळाल्याच शिवाय सेवालयासाठी संभाव्य विहीर घेण्याची जागाही निश्चित झाली. भाऊ बोलले,बाकी काही असो सर माझं या कडेपर्यंत शेत असूनही मी पेरणीपासून इकडे फिरकलो नव्हतो. तुम्ही शेंगासाठी म्हणून इकडे आणलो नसतो तर, इकडे कधी आलो असतो ते माहित नाही. तुम्ही आलात की, असं आपोआप काही तरी चांगलं घडून जातं बघा. मी म्हटलं, हा पायगूण माझा नाही. वेड्या बाभळीच्या शेंगांचा आहे!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com