Maharudra Mangnale : पाणी टंचाईला कसं तोंड द्यायचं?

चार दिवसांपूर्वी लातूरहून शिरूरला चारचाकीत जाताना नरेश म्हणाला, विहिरीत १७-१८फुटच पाणी राहिलयं.शेततळ्यातलं पाणीही पाच-सहा फुट कमी झालंय.जुनमध्ये पाण्याची अडचण होईल असं वाटतयं.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Water Shortage Update : चार दिवसांपूर्वी लातूरहून शिरूरला चारचाकीत जाताना नरेश म्हणाला, विहिरीत १७-१८फुटच पाणी राहिलयं.शेततळ्यातलं पाणीही पाच-सहा फुट कमी झालंय.जुनमध्ये पाण्याची अडचण होईल असं वाटतयं.

मी म्हटलं,विहिरीतील पाणी फक्त माणसं आणि जनावरांसाठी वापरायचं.ते दोन महिने आरामात पुरेल.बागेला आठवड्यातून एकदा जे पाणी द्यायचंय ते शेततळ्यातून देऊ. तळ्यातील आणखी आठ- दहा फुट पाणी कमी होईल,त्याला इलाज नाही.

काही वेळ शांततेत गेला.हळूच नरेश बोलला,मामा,दोन आठवड्यापूर्वीच मी खालच्या बोअरवेलमध्ये एक दगड टाकून बघितलाय.पाण्याचा आवाज येतोय.वरच्या बोअरवेलमधली मोटार काढून खालच्या बोअरवेलमध्ये टाकून बघावी का?...मी म्हटलं,काय खरंय त्या बोअरवेलचं.आतमध्ये पोकळी लागली होती.पावसाळ्यात पाणी थांबत असलं तरी,असल्या उन्हाळ्यात कसं पाणी राहिल?

नरेशच्या डोक्यात पक्कं बसलं होतं.तो बोलला, पहिल्यांदा आपण मोटार चालू केली होती तेव्हा विहीर भरली होती. आताही एकदा विहीर भरली तर, तळ्यातील पाणी वापरायची गरज पडणार नाही.

मी म्हटलं,ठिक आहे बघू.लगेच उदगीरच्या शिवाजी आपटे या मित्राला फोन लावला.बोअरवेलमधील पीयुसी पाईप व मोटार काढून, दुसऱ्या बोअरवेलमध्ये टाकायला किती पैसे घेईल तो माणूस.

आपटे म्हणाला,त्याच्याशी बोलून सांगतो. काहीवेळातच त्याचा फोन आला.साडेतीन हजार म्हणतोय.पण अंतर पाच कि.मी.पेक्षा अधिक असेल तर, गाडीचं भाडं हजार रूपये पडेल,असं तो बोलला. मी त्याला वरच्या बोअरमधली मोटार खालच्या बोअरवेलमध्ये टाकणार असल्याचं सांगितलं.....बघ..बघ.. त्याच्याशिवाय कसं कळेल? असं म्हणून त्यानं फोन ठेवला.

मी नरेशला म्हटलं,बाहेरचा माणूस सोयीचा नाही.गावातलाच माणूस पाहिजे.दरम्यान आम्ही शिरूरला पोचत होतो. पंचायतच्या दुकानासमोर गाडी थांबवली.

माझे इलेक्ट्रेशियन मित्र भोसले दुकानात काम करीत होते.आम्ही त्यांना एका बोअरवेलमधील मोटार काढून दुसऱ्या बोअरवेलमध्ये टाकण्याची कल्पना सांगितली.त्यांनी लगेच कोणालातरी फोन केला...सर, उद्या सकाळी लवकर गाडी शेतात येईल.

आम्ही रुद्रा हटवर पोचलो. डोक्यात सारखे हेच विचार सुरू होते. रात्री बोअरवेलमधील पाण्याने विहीर भरल्याची कल्पना करीत करीतच झोपलो.

Water Shortage
Water Conservation : गाळाने भरलेले नको, पाझरणारे तलाव हवेत...

सकाळी सहाच्या आतच भोसलेंचा फोन आला,माणसं आलीत गेटचं कुलूप काढा.मी उठून बाहेर आलो तर नरेशने कुलूप काढलं होतं.रान मोकळंच असल्याने, टेम्पो बोअरवेलजवळ गेला.लोखंडी कप्पी लावून त्यांनी काम सुरू केलं‌.साडे आठ वाजता सगळे पाईप आणि मोटार व्यवस्थित निघाली. ट्रॅक्टरच्या ट्रालीत पाईप भरून खालच्या बोअरवेलवर गेलो.

पाठोपाठ टेम्पो आला. काम सुरू झालं.काढण्यापेक्षा आत सोडायला कमी वेळ लागतो.३२पाईपनंतर,खाली पाईप सरकेना.म्हणजे ३६०फुटच बोअरवेल शिल्लक होता.अकरा वाजता थ्रीफेज लाईट येणार होती. त्यांचं काम संपलं होतं .३५००रू.घेऊन ते गेले.नरेश आणि गजाननने वायर अंधरून कनेक्शन दिलं.

साडेअकराला लाईट आली गेली.बराचवेळा असं झालं.शेवटी एक वाजता नीट लाईट आली. पाईपातून पाणी तर नाहीच,हवा पण नीट येईना.शिवाय स्टार्टर सोडून द्यायला लागलं. भोसलेंना फोन केला.ते आले .सगळं नीट तपासून बघितलं.कनेक्शन उलटसुलट करून बघितलं.पाण्याचा थेंबही बाहेर आला नाही....सर,पाणी नाही बोअरवेलमध्ये.

मी म्हटलं, सकाळी आलेल्या तुमच्या माणसांना लगेच फोन करा.आजच्या आज ही मोटार काढून वरच्या बोअरवेलमध्ये सोडायला सांगा.किमान सात- आठ महिने तर तो चालतो.त्यांनी फोन करून सांगितलं.दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन ती मोटार त्यांनी परत पूर्वीच्याच बोअरवेलमध्ये सोडली.मी परत ३५००रूपये देऊन नमस्कार केला.

मी नरेशला म्हटलं,केवळ तु हे करायला सांगीतलसं म्हणून मी हे काम केलं असं समजून तू स्वत:ला दोषी मानण्याचं कारण नाही.माझ्याही मनात कुठेतरी हे होतं म्हणूनच मी संमती दिली.सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे,ही काही पहिली वेळ थोडीच आहे.

शेतीतील अशी ५०उदाहरणं मला माहित आहेत. शेतीला उगीच ' पालथा धंदा ' म्हणत नाहीत. आता एकच कर.जेसीबी आली की, त्या बोअरवेलमधली केसींग पण काढून घे.म्हणजे त्या बोअरवेलचा नाद कायमचा संपेल.

Water Shortage
Water Management In Bhandara : भंडारा जिल्ह्याचा आराखडा सूक्ष्म नियोजनासह बनवावा

या बोअरवेलची कहाणी फेसबुक आणि ॲग्रोवनमध्ये, 'शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं गारूड' म्हणून गाजलीय.ही गोष्ट वाचून अनेकजण रडले होते.पुण्यातील दोन तज्ज्ञांनी तुमच्या शेतात पाणी लावूनच दाखवतो,असं आश्वासन दिलं होतं.ती कथा वाचून कर्नाटकातून एक पाणाड्या आला होता.नारळ गरगर फिरवून त्याने दोन जागा दाखवल्या.

एक जागा फेल गेली.दुसऱ्या जागी डिसेंबर पर्यंत पाणी चालतं.हिवाळ्यात विहिरीला पाणी असतंच त्यामुळं या बोअरवेलचा तसा फार उपयोग नाही.तरीही लाखाची पाईपलाईन मोटार टाकलीच...बारा वर्षांत विहीर ७२ फुटावर गेली.सहा बोअरवेल झाले. तरीही पाण्याचा प्रश्न तसाच कायम आहे. शेवटी तीन लाख रूपये खर्चून शेततळं केलय.बाकी काही असो आता बागेतील झाडं वाळणार नाहीत, एवढी तरतूद या पाण्यानं केलीय.

आताच विहिरीवर जाऊन आलो.सततच्या या पावसाने विहीरीला छोटे छोटे पाझरे सुटलेत.हे आठवडाभर चालले तर नक्कीच पाच- सहा फुट पाणी वाढेल.मी नरेशला म्हटलं, बघं आपले सात हजार रूपये पाण्यात गेल्याचं निसर्गाला पण वाईट वाटलयं! तेवढ्या पैशाचं पाणी विहीरीत जमा करण्याची जबाबदारी निसर्गानं घेतलीय. आता तरी खूष हो...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com