

डॉ. सचिन शिंदे, प्रवीण मताई, डॉ. सचिन डिग्रसे
Soybean Update : बीबीएफ पेरणी यंत्र हे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र आहे. या यंत्राने रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते.
उदा. वरंब्यावर सोयाबीनच्या ३ ते ४ ओळी ३० सेंमी किंवा ४५ सेंमी अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सेंमी गरजेनुसार ठेवता येते. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्के जलसंधारण, तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.
लागवड पद्धत :
१) योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाण्यांची खतासह रुंद वरंबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) यंत्र विकसित केले आहे.
२) यंत्राच्या साह्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे (६० ते १५० सेंमी) तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या चार ओळी रुंद वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते.
३) सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर, तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
रुंद वरंबे तयार करण्याची पद्धत :
१) केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद यांनी बीबीएफ यंत्र विकसित केले आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीने खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग तसेच रब्बी हंगामात भुईमूग, हरभरा यांसारख्या पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने करता येते. कपाशी, हळद, आले तसेच तूर या पिकांचीही लागवड करता येते. बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलित आहे.
२) रुंद वरंबा सरी यंत्रामध्ये ३० ते ४५ सेंमी अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सेंमी रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते २०० सेंमी अंतरावर कमी जास्त करता येणारे दोन सरींचे फाळ आहेत.
३) यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सेंमी ते १६५ सेंमी रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सेंमी अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात.
४) तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राच्या साह्याने बियाणे व खते पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी-जास्त करता येते. हेक्टरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते.
५) एका रुंद वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी घेता येतात. यासाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी ठेवावे, बीबीएफ यंत्राच्या फणांतील अंतर त्यानुसार कमी-जास्त करावे. त्यानुसार आवश्यक रुंद वरंबे तयार होण्यासाठी ठरावीक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळांत आवश्यक अंतर ठेवावे) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी या (आवश्यकतेनुसार) ३० ते ४५ सेंमी रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी जास्त रुंदीच्या ठेवता येतात.
६) ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र आंतरमशागतीसाठी वापरता येते. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागतीसाठी व तणनियंत्रणासाठी व्ही आकाराची पास बसवता येते. हे फण पिकाच्या दोन ओळींमध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते. या शिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते.
जेव्हा एका वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी (३० सेंमी अंतर) घ्यावयाच्या असतील तेव्हा सरी घेण्यासाठीच्या खुणा १५० सेंमी (१.५ मीटर) अंतरावर ठेवून (म्हणजेच दोन फाळांतील अंतर १५० सेंमी ठेवावे) ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र (फाळाचा मध्य खुणेवर घेऊन) चालवावे. यामुळे १३५ सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर सोयाबीनच्या चार ओळी ४५ सेंमी अंतरावर घेता येतात. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या ३० सेंमी रुंदीच्या पडतात.
७) कमी ओलाव्याच्या स्थितीत रुंद वरंबा सरी लागवड अवजाराच्या साह्याने पेरणी करताना अवजारामध्ये पेरणीमागे मातीने बियाणे झाकण्याच्या दृष्टीने लोखंडी पास, लोखंडी साखळी किंवा लोखंडी दांड्याचा उपयोग करता येतो.
८) पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. कमी पाऊस पडला तर सऱ्यांमध्ये पाणी दीर्घकाळ साठून राहते. ओलावा टिकून राहतो. या उलट जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सऱ्यामधून सुरक्षितपणे निघून जाते, पाण्याचा निचरा होतो.
९) जमिनीत हवा तसेच पाणी यांचे संतुलन राहते. पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ होते. या यंत्राद्वारे रुंद वरंबा बनवणे, बियाणे पेरणी, खते देणे, रासणी करणे अशी अनेक कामे एकाच वेळी करता येतात. या पद्धतीद्वारे जमिनीची धूप कमी होते. जलसंधारणाचा शेतजमिनीस फायदा होतो.
रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे :
१) चांगली मशागत होऊन बियांसाठी चांगले वरंबे तयार होतात. वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची पुढील वाढ जोरदारपणे होते.
२) पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात लाभ होतो.
३) अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यामुळे मदत होते.
४) २० टक्के बियाणे, खताची बचत होते.
५) या पद्धतीमध्ये चार कामे एकाच वेळी करता येतात जसे, की रुंद वरंबे दोन्ही बाजूंनी सऱ्यांसह बनविणे, खत व बियाणे पेरणी, रासणी करणे, उगवणपूर्व तणनाशक फवारणीमुळे मजूर, वेळ आणि इंधनाची बचत होते.
६) सऱ्या मोकळ्या करणे, कोळपणी करणे, कीटकनाशकांची फवारणी करणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात.
७) मजूर तसेच ऊर्जेची ३५ ते ४० टक्के बचत होते. सरासरी ४ ते ५ हेक्टर क्षेत्र प्रतिदिन पेरणी करता येते.
८) पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होते. २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ होते.
बीबीएफ यंत्राचे भाग :
१) बीबीएफ यंत्रासोबत पेरणी यंत्र, बियाणे व खताची पेटी विविध कप्प्यांसह उपलब्ध आहे.
२) दोन फाळ, चार छोटे पेरणीचे फण, आधार देणारी दोन चाके आणि ही संपूर्ण यंत्रणा चालविणारे चाक उपलब्ध आहे.
३) यंत्र चालविण्यासाठी ३५ ते ४५ ते ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर पुरेसे आहे.
४) बीबीएफ यंत्राची लांबी २२५० मिमी रुंदी ११३३ मिमी आणि उंची साधारण ८६८ मिमी असून, त्याची चौकट ही २२५० मिमी लांब, ४८० मिमी रुंद असून, वजन अंदाजे २८५ किलो आहे.
संपर्क : डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९०, (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.