Lake Revival : संघटन, क्षमता बांधणीतून तलावांचे पुनरुज्जीवन

Lake Conservation : सामान्य मच्छीमार बांधव आणि महिलांचे संघटन वाढवत त्यांच्या क्षमता वाढीवर फीड या संस्थेने भर दिला. त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाने वेग घेतला. चार तलावापासून सुरू झालेले काम ४५ तलावांच्या पुनरुज्जीवनापर्यंत पोहोचले.
Lake Conservation
Lake ConservationAgrowon
Published on
Updated on

Water Resources Conservation : मनीष राजनकरांच्या फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट’ (फीड) या संस्थेने स्थानिक मच्छीमारांना तलाव जगणे कसे महत्त्वाचे आहे, हे समजावण्यावर पहिल्या टप्प्यामध्ये भर दिला. मच्छीमार सोसायटीच्या सदस्यांना तलाव जगण्यासाठी, कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी कोणकोणती कामे करण्याची गरज असते, याचे प्रशिक्षण सुरू केले. तलावातील गाळ काढणे, बेशरमसारख्या वनस्पती काढणे, मत्स्यबीज देऊन त्या माशांची सर्वांगीण माहिती देणे अशी कामे का गरजेची असतात, यावर भर देण्यात आला. या कामांबरोबरच या संबंधित कायदे कानून, नियम, हक्क, अधिकार, जबाबदारी याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. एक वर्ष सतत धडपड करूनही फारशी प्रगती दिसत नव्हती.

खरेतर तलाव, तलावातील मासे हे या लोकांचे जगण्याचे आणि हक्काचे साधन होते. पण लोकांच्या उदासीनतेमागे, दारिद्र्यामागे असलेल्या कारणांचा शोध सुरू केला. शासकीय विभागातील लोकांशी बोलताना त्यांच्या मते मच्छीमारांचे अज्ञान, निष्काळजीपणा व व्यसनाधीनता ही प्रमुख कारणे जाणवत होती. स्वतःचे हक्काविषयी जागरूक आणि लढणारे नेतृत्वही नव्हते.

तथाकथित नेतृत्व हे स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यापलीकडे जात नव्हते. आणखी एक मुख्य डाचणारा मुद्दा म्हणजे यात महिलांना काहीही स्थान नव्हते. अर्थात मासेमारी हे महिलांचे कामच नाही असा आजवर समज दृढ होता. या वर्षभरात मच्छीमाराच्या कुटुंब आणि महिलांशी ही काही प्रमाणात संवाद होत होता. यातून ‘फीड’ संस्थेने निर्णय घेऊन मच्छीमार सोसायटीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व सक्तीचे केले.

महिलांना मच्छीमारी संबंधित सर्व प्रकारचे ज्ञान आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यातून सर्वांत पहिल्यांदा धिवर समाजातील त्या वेळी सर्वात जास्त म्हणजे बारावी शिकलेल्या शालू कोल्हे या महिलेची प्रशिक्षणासाठी निवड केली. तिला मुंबईतील कोरो. (CORO- कम्युनिटी रिसोर्स ऑर्गनायझेशन) या संस्थेत नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी (लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) पाठवले.

ही संस्था समाजाच्या तळागाळात काम करू शकणाऱ्या महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करते. एक वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व, संघटन, अधिकार, जबाबदाऱ्या विषयक क्षमता बांधणी केली जाते. त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. प्रशिक्षण घेऊन आल्यावर सौ. शालू कोल्हे यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्या अगदी हत्तीचे बळ मिळाल्यासारख्या कामाला लागल्या. मनीष यांच्या सूचनेनुसार त्यांना धीवर समाजाच्या महिलांचा पहिला बचत गट स्थापन केला.

Lake Conservation
Charlotte Lake : ब्रिटिशकालीन ‘शारलोट’ गाळात

शासकीय योजनांचा फायदा घेण्यापेक्षाही संघटन आणि व्यवसायवाढ हेच मुख्य उद्देश ठेवले होते. मच्छीमारी करणाऱ्या सर्व समाजात ६५ टक्के लोक भूमिहीन आहेत. म्हणजे मच्छीमारी हेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. तेही खूप अनियमित होते. प्रशिक्षणानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शालू कोल्हे धाडस बांधतच ग्रामसभेला गेल्या.

गावाच्या इतिहासात कोणी महिला कधीही ग्रामसभेला गेली नव्हते. त्यामुळे त्यांचा तिथे अपमान झाला. पण तरीही मोठ्या धीराने त्यांनी महिला चार गोष्टी सुनावूनच तिथून बाहेर आल्या. पुढील ग्रामसभेपर्यंत गटातील अन्य महिलांचेही धाडस बांधले. पुढील ग्रामसभेला गावातील बचत गटातील सर्व महिला हजर राहिल्या. इतक्या महिला आल्यावर पुरुष मंडळी काय बोलणार? ग्रामसभेला महिला हजर राहण्याची प्रथाच पडली.

त्या ग्रामसभेमध्ये तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदीवर घ्यायला लावली. पुढे काही महिने लढा देऊन त्यांनी तलावातील गाळ काढणे हा विषय ‘मनरेगा’अंतर्गत घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्याच प्रमाणे तलावातील गाळ यंत्रांनी न काढता मजुराकरवीच काढण्याचा नियम करून घेतला. तलाव स्वच्छतेसाठी, गाळ काढायला, माशांसाठी अपायकारक ठरणाऱ्या वनस्पती, झाडेझुडपे काढण्यासाठी गावातील शेकडो माणसांना काम मिळू लागले.

त्यातून प्रत्येक घरात खेळणाऱ्या पैशामुळे सर्वांनाच आनंद झाला. नेतृत्व गुण आणि विविध क्षमता बांधणीच्या प्रशिक्षणाची ही फळे होती. शालू कोल्हे यांच्यानंतर पुढील वर्षी सरिता मेश्राम, नंतर कविता मौजे यांनीही प्रशिक्षण घेतले. शालू कोल्हे यांच्या लढ्यात दर वर्षी एका प्रशिक्षित महिला कार्यकर्त्याची भर पडत गेली. जाणीवजागृती वाढत गेली. या शालू कोल्हे यांना रोटरी, पुणे यांनी सर्वांत प्रथम २०२२ मध्ये जलदुर्गा पुरस्कार देत गौरवान्वित केले. त्या आता सर्व महाराष्ट्रभर जलदुर्गा म्हणूनच ओळखल्या जातात.

तलावांची जैवविविधता समृद्धता वाढविण्यासाठी प्रयत्न

मनीष यांचा तलाव, तलावातील पाण्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने व्यवस्थापन याविषयी थोडाफार अभ्यास आधीच झालेला होता. त्यासंदर्भात छोटीमोठी कामे करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी ते विविध तज्ज्ञांच्या संपर्कातही होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी व पुणे येथील विजय परांजपे यांनी तलावांचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकसमूहांच्या प्रमुखांचे पाच दिवसांचे संमेलनही नवेगाव बांध येथे भरवले होते. त्यामुळे हे सर्व लोक एकमेकांच्या संपर्कात येण्यासोबतच माहितीची, समस्यांची आदान प्रदान झाली होती. त्यातून एक मुख्य गोष्ट जाणवली, ती म्हणजे प्रत्येक प्रदेशातलाच नव्हे तर भागातला तलाव हा वेगवेगळा आहे. तेथील जैवविविधता विशेषतः मासे, इतर प्राणी, वनस्पती यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत. तिथल्या अन्नसाखळ्यांचे मनोरे वेगवेगळ्या प्रजातींनी भरलेले आहेत.

Lake Conservation
Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

आता नव्याने काम सुरू करताना सर्वप्रथम त्यांनी भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील तलावातील विविध प्रजातींबद्दल माहिती गोळा करणे सुरू केले. त्यासाठी प्राणी आणि वनस्पती शास्रांच्या प्राध्यापकांची मदत घेतली. मात्र काही मोजके अपवाद वगळता पुस्तकी ज्ञानाने परिपूर्ण असलेली ही मंडळी प्रत्यक्षात अडखळू लागली. मग त्यांनी मच्छीमारी समाजातील अनुभवी व जाणकारांशीच संवाद सुरू केला.

त्यातून स्थानिक भाषेत असली तरी अत्यंत मोलाची माहिती मिळू लागली. मच्छीमारांच्या प्रथा व परंपरा बरेच ज्ञान दडलेले असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी दिलेल्या माहितीचा, त्यांच्या परंपरांचा योग्य वैज्ञानिक अर्थ लावत काम केल्यास पर्यावरण व अन्नसाखळ्यांचे उत्तम संवर्धन होऊ शकते हे स्पष्ट होऊ लागले. त्यातूनच माशांची पैदास व उत्पादन वाढून मच्छीमारांनाही चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी मनीष व त्यांच्या सहकाऱ्यांना खात्रीच पटली.

स्थानिक हुशार व अनुभवी मच्छीमारांना सोबत घेत सर्वप्रथम तलावातल्या मातीचा अभ्यास केला. तसेच या तलावांमध्ये पूर्वी कोणती झाडेझुडपे आणि वनस्पती होत्या, त्याचे साधारण फायदे लक्षात घेत त्यांचे तलावामध्ये संवर्धन करण्यासाठी काम सुरू केले. पहिल्या वर्षी चार तलावात काम सुरू केले.

जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या तलावातून वाढणाऱ्या आणि माशांना आश्रय, खाद्य देऊ शकणाऱ्या सुमारे १६ वनस्पती प्रजाती मिळवल्या. त्यापैकी ९ पावसाळ्याच्या तोंडावर तलावात लावण्यात आल्या. यात काही पाण्याबाहेर वाढणाऱ्या, काही पाण्यात अर्धवट बुडालेल्या, तर काही पूर्ण पाण्याखाली वाढणाऱ्या वनस्पती ( झाडंझुडपं! गवतं) यांचा समावेश होता.

पहिले दोन ते अडीच महिने आवश्यक ती काळजी घेतली गेली. गाळ काढतानाच तलावातील बेशरमची झाडे मुळासकट काढून टाकली. ही झाडे सर्वच सजीवासाठी विषारी असल्याने ती बाजूला वाळवून जाळून टाकली. मुळे व बुडखे निघत नसलेली झाडे जागेवर जाळूनच नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.

ही सर्व तयारी झाल्यावर तलावांमध्ये स्थानिक माशांचीच पैदास होईल हे आवर्जून पाहिले गेले. हे करताना स्थानिक माशांच्या मिळालेल्या एकूण प्रजाती ४९ इतक्या होत्या. या स्थानिक प्रजातीव्यतिरिक्त बाहेरील माशांचे बीज तलावात सोडणे पूर्णपणे टाळले. पहिल्या तलावात आठ महिन्यांतच अपेक्षित बदल दिसू लागले. मासे संख्येने व आकाराने वाढू लागले. याचे कारण वनस्पतीच्या रूपात त्यांचे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत होते.

हे यश मिळून ही मच्छीमार सोसायटीमध्ये महिलांच्या समावेशाचे सक्ती केली. त्यांचे आता प्रत्येक कामावर लक्ष राहू लागले. बेशरम झाडे दिसताच काढून जाळली जाऊ लागली. तलावात विविध झाडांची लागवड केली गेली. चक्क छातीभर पाण्यात उभे राहून मासेमारीही महिला करू लागल्या. तलावावरील सर्व कामांमध्ये महिला बचत गट पुढे सरसावले. ४३ खेड्यांत ६३ तलाव होते. त्यापैकी ३२ तलावांत बारमाही पाणी, तर ३१ तलावांत आठ नऊ महिने पाणी राहते. या सर्व गावांत मिळून बारा मच्छीमार सोसायट्या होत्या. सहा वर्षांत या गटांनी ११ तलाव पुनरुज्जीवित केले. पुढे हळूहळू तलावात विविध ठिकाणी माशांच्या प्रजातींना अनुकूल अशी आश्रयस्थाने निर्माण केली गेली. अशा प्रयत्नातून स्थानिक माशांची पैदास दोन ते बारा पटींनी वाढली.

पूर्वी जे मासे २०० ते ३०० ग्रॅम पेक्षा अधिक वाढत नव्हते, त्यातील एकेक मासा आता एक किलोपेक्षा अधिक वजनाचा मिळू लागला. पुढील दोन-तीन वर्षांतच महिला गटांनी पाणवनस्पतींची बीज बँक सुरू केली. माशांची नवी बाजारपेठे, नवे पदार्थ, दीर्घकाळ टिकणारे प्रक्रिया पदार्थ तयार केले जाऊ लागले. त्यातही ‘माशांचे लोणचे’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यासाठी नव्या बाजारपेठांचा शोध सुरू झाला.

तलावातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी...

याच दरम्यान पर्यावरण महर्षी माधवराव गाडगीळ यांच्या पुढाकाराने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने ‘महाराष्ट्र जनुक कोष’ हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात महाराष्ट्रातील विविध अधिवास आणि परिस्थितिकी (Habitats & Ecosystems) यांच्या संवर्धित व संरक्षित करण्याचे लोकसहभागातून करण्यात येणार होते. त्यात पारंपरिक बीज संरक्षण, गवताळ प्रदेश, सागर, पाण्याचे तलावातील अधिवासांना बळकट करून तिथल्या अन्नसाखळ्या समृद्ध करण्याचा उद्देश होता. त्या प्रकल्पात तलावातील जैवविविधता संवर्धनाबाबत उपक्रम राबवण्यासाठी मनीष यांच्या फीड या संस्थेची निवड झाली. त्यातून त्यांना संसाधने मिळण्यास बरीच मदत झाली.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com