एक व्यापारी एका शेतकऱ्याकडे येतो. शेतकऱ्याला म्हणतो, कापसाला भाव काय? शेतकरी म्हणतो, सध्या सात हजार रुपये मिळतोय. चल, तुला साडे सात हजाराचा भाव देतो. पण पैसे पंधरा दिवसानं मिळतील. वैतागलेला शेतकरी खुश होतो. जणू काही दत्तचं प्रकटले. घरात कापूस ठेवून अंगाला खाज येतंय, पण भाव काही वाढत नाहीत. त्यामुळं लगबगीनं शेतकरी सौदा पक्का करतो. दुसऱ्या दिवशी मोठा ट्रक गावात येतो. दारापुढे ट्रक उभा राहतो. कापूस ट्रकमध्ये भरला जातो. कापूस घेऊन ट्रक गावाबाहेर पडतो. हळूहळू दिवस पुढे सरकतात.
पंधराव्या दिवशी शेतकरी सकाळीच आवरून बाहेर पडतो. व्यापाऱ्यानं सांगितलेल्या पत्त्यावर पोहचतो. पण व्यापारी मात्र कापूस घेऊन फरार झालेला असतो. शेतकऱ्याला रुपयाही मिळत नाही. शेतकऱ्याचा पद्धतशीरपणे गेम झालेला असतो. स्टोरी इथेच संपत नाही. ही तर गुन्हाची एक कडी असते. पुढे काय होतं? शेतकऱ्यांला पैसे मिळतात? पळून जाणारा आरोपी पकडला जातो? असे प्रश्न आता तुम्हाला पडले असतील. काहीजण म्हणतील की, ही काहीतरी भाकडकथा आहे. पण ही कथा नाही. तर राज्यात घडलेला शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मोठा प्रकार आहे. या व्यापाऱ्यांनं शेतकऱ्यांला कसा चुना लावला ते समजून घेऊ.
जग्गूचं प्रकरण काय?
जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे या ४३ वर्षीय व्यापाऱ्यानं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर भागात शेतकऱ्यांचा कापूस खरे दीचा व्यवसाय सुरू केलेला. शेतकरीही जग्गूला कापूस विकत होते. या व्यवसायात जग्गूसोबत आणखी काही साथीदारही होते. पण हळूहळू शेतकऱ्यांचा माल खरेदी करूनही शेतकऱ्यांना रक्कम देण्यास मात्र जग्गूकडून टाळाटाळ केली जाऊ लागली होती. एकदिवस कुंड बुद्रुक ता मलकापुरच्या अतुल मधुकर पाटील या ४२ वर्षीय शेतकऱ्यांचा कापूस जग्गू व्यापाऱ्याने खरेदी केला. १५३ क्विंटल ४० किलो कापूस ९ हजार रुपये प्रतिक्विंटलने सौदा केला. कापूस घेऊन जाताना नगदी १ लाख ६६ हजार ६५० रुपये जग्गूने शेतकऱ्याला दिले. तर उर्वरित रक्कम २० दिवसाच्या करारावर देतो, असा शब्द जग्गूनं दिला होता. पाहता पाहता २० दिवस उलटून गेले आणि जग्गू पैसे न देताच फरार झाला. मग अतुल पाटील या शेतकऱ्यानं ३० नोव्हेंबर २०२३ रोजी गाठलं पोलिस स्टेशन. घडला प्रकार पोलिसांना सांगत तोंडी फिर्याद दिली.
पोलिस तक्रार!
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासात मग एक एक धागा उलगडत गेला. जग्गूनं फक्त एका शेतकऱ्याला चुना लावला नव्हता तर अनेक शेतकऱ्यांना बरोबर जाळ्यात खेचलं होतं. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचं पोलिसांना तपासा दरम्यान लक्षात आलं. मग प्रकरण आर्थिक व्यवहाराचं आणि गुंतागुंतीचं असल्यानं गुन्हाचा तपास योग्य दिशेनं होण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं. विशेष पथकानं या प्रकरणात तपास करून व्यापारी जग्गूला २१ डिसेंबर २०२३ रोजी अटक केली. अटक केल्यानंतर चौकशी केली गेली. या प्रकरणात ९ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जग्गू व्यापारी नव्हे जग्गू डॉन?
पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांनी पत्रकार परिषद घेत गुन्हयातील तपशिलाची माहिती दिली. तपासात तर धक्कादायक माहिती समोर आली. जग्गूकडे २० किंमत असलेल्या नकली नोटा छपाईच्या तीन मशीन सापडल्या. ४१ लाख किमतीच्या दोन चारचाकी, १ लाख २५ हजार किमतीचे दोन मोबाईल व एक टॅब, रोख रक्कम १९ लाख, एक ई बाईक ६० हजारांची आणि एकुण ८१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जग्गूकडून जप्त केला.तून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा धडा घेतला पाहिजे. या बातम्यासोबत इथेच थांबतो.
जग्गूची मालमत्ता किती?
जगन उर्फ जग्गु रामचंद्र नारखेडे याने शेतकऱ्यांची फसवणूक करत मिळालेल्या पैशातुन भालेगावला ७० लाख रुपयांची चार एकर शेती खरेदी केली. याच पैशातुन बद्री कॉम्प्लेक्स मलकापूरला २६ लाख ५३ हजार किमतीचा एक फ्लॅट विकत घेतला. श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये २३ लाखाचे दोन व्यावसायिक गाळे घेतले. बोदवडच्या खंडेलवाल जिनींग खरेदीचा सौदा करुन दोन कोटी एक लाख ॲडव्हान्स दिले. एवढचं नाहीतर रमेष्टा ग्रीन एनर्जी प्रा.लि. कंपनीत ४६ लाख रुपये गुंतवणुक केली. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर शेतकरी हदरले आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही जास्त भावाच्या अमिषाला बळी पडून आपला शेतमाल फसवणुक करणाऱ्यांना विक्री करु नये. शासनाची परवानगी मिळविलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वा संस्थांना विक्री करावी. जेणेकरून फसवणुक टाळता येईल, असं आवाहन पोलिसांनी केलं. तर ही होती, कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या जग्गू व्यापाऱ्याचं प्रकरण! या प्रकरणातून शेतकऱ्यांनी सजग राहायचा धडा घेतला पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.