Solapur News : धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगांत आणि हिंगणी धरण क्षेत्र परिसरात जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने राम नदी व भोगावती नदीला पूर येऊन हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
हिंगणी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १६०० दशलक्षघनफुट इतकी असून मृतसाठा पाणीपातळी ४७८ दशलक्षघनफूट आहे. सध्या धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे.
बार्शी तालुक्यात चार मध्यम प्रकल्प व पंधरा लघु प्रकल्पाबरोबरच २३० पाझर तलाव,११८ के.टी.वेअर, सहा गावतलाव व जवळपास ६०० च्या वरती सिमेंट बंधारे आहेत. ढाळे पिंपळगाव प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला असून, निलकंठा नदीच्या पाणी पात्रात वाढ होताना दिसत आहे.
गेल्या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याने प्रकल्पाने तळ गाठला होता. भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे.
हिंगणी येथील भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या, बंधारे, तलाव, एल बेस भरून वाहत आहेत.
या प्रकल्पामुळे हिंगणी, पिंपरी, साकत, मळेगाव, लाडोळे, घाणेगाव, उपळे, जामगाव, नांदणी, लाडोळे, हळदुगे, मानेगाव, काळेगाव, तडवळे, इर्ले, इर्लेवाडी येथील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.