Rain Update : खानदेशात पावसाची दडी; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

Farmers Wait for Rain : खानदेशात जूनमध्ये पाऊसमान चांगले असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून येत आहे. परंतु अनेक भागात पाऊस बरसलेला नाही. पेरण्या झाल्या, पण त्यावर पाऊस नाही.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात जूनमध्ये पाऊसमान चांगले असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून येत आहे. परंतु अनेक भागात पाऊस बरसलेला नाही. पेरण्या झाल्या, पण त्यावर पाऊस नाही. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी जूनमध्ये महिन्यातील सरासरीच्या ६० टक्केही पाऊस बरसला नव्हता. परंतु यंदा जळगाव व धुळे जिल्ह्यात जूनमध्ये महिन्यातील सरासरीच्या ८० टक्क्यांपर्यंत एकूण पाऊस बरसला आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, एरंडोल या भागात एकूण १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, अमळनेर, यावल, रावेरातही पाऊसमान चांगले असल्याचे आकडे सांगत आहेत. धुळ्यातील साक्री तालुक्यातही पाऊसमान यंदा तूर्त बरे दिसत आहे. नंदुरबारातही नवापूर, नंदुरबारच्या काही भागात पाऊसमान बरे दिसत आहे.

Farmer
Rain Update : नाझरे धरणक्षेत्रात सर्वाधिक २०६ मिलिमीटर पावसाची नोंद

परंतु अनेक मंडलांत पाऊस बरसलेला नाही. दर पाच किलोमीटरवर पावसाची स्थिती वेगळी आहे. पाऊस मोजण्याची यंत्रणा तहसील कार्यालये किंवा शहरांत, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रांच्या आवारात आहेत. परंतु या संस्थांत जेवढी नोंद पावसाची झाली आहे, तेवढा पाऊस सर्वत्र आहे, अशी स्थिती खानदेशात कुठेही नाही.

मागील चार दिवसात जळगाव जिल्ह्यात एरंडोल, धरणगावातील काही गावांत बरा पाऊस झाला. तर काही भागात पाऊसमान हवे तसे नव्हते. यावल, रावेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर भागात मागील चार दिवसात पाऊस आलेला नाही. धुळ्यातही शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा भागात अनेक मंडलांत पावसाने दडी मारली आहे. यावल तालुक्यातील बामणोद व लगत आठवडाभरापासून पाऊस आलेला नाही. पाऊस आला, मोसमी वारे दाखल झाले अशी घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उडीद, मूग, तूर आदींची पेरणी केली. पेरणीनंतर लागलीच पाऊस येणे अपेक्षित होते, परंतु अनेक भागात पाऊस आलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Farmer
Heavy Rain : नगर जिल्ह्यात दमदार पावसामुळे ६६ टँकर बंद

जळगाव जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) व मंगळवारी (ता.१८) सायंकाळी व रात्री काही भागात पाऊस झाला. परंतु हा पाऊस सर्वत्र नव्हता. सोमवारी जळगाव जिल्ह्यात अमळनेरातील शिरूड, मारवड मंडलांत अतिवृष्टी झाली. या भागातील काही गावांत अतिजोरदार पावसाने जमीनी खरडून गेल्या. माती वाहून गेली. अमळनेरातील लोंढावे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे, वावडे, भरवस, अमळगाव आदी भागात जोरदार पाऊस झाला.

शेतात पाणी साचले. शेतातील माती व पिकेही वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची दडी आहे. सकाळपासून ऊन तापत आहे. दुपारी ऊन सावल्यांचा खेळ असतो. परंतु उष्णताही वाढली आहे. यामुळे बागायती पिकांचे सिंचन गतीने करावे लागत आहे. केळी, कापूस, ऊस, पपई, भाजीपाला पिकांचे सिंचन करावे लागत आहे. कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. हलक्या, मुरमाड जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे. यामुळे पावसाची व तापमानात घसरणीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

अनेक प्रकल्प कोरडे

जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागातील मन्याड, भोकरबारी, बोरी या प्रकल्पांत ठणठणाट आहे. अग्नावती, बहुळा, अंजनी या प्रकल्पांतील जलसाठाही घटला आहे. धुळ्यातील मालनगाव, बुराई, अमरावती हे प्रकल्प कोरडे आहेत. पांझरा, अनेर प्रकल्पांतील जलसाठाही घटला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com