
Pune News: बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा, वऱ्हाडसह विदर्भातील काही भागांत सोमवारी (ता.२१) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला. विदर्भातील अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक मंडलांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसानही झाले. मराठवाड्यातील ३० मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर तालुक्यांत पावसाने नुकसान केले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत तुषार सिंचनही सुरू केले होते. सोमवारी (ता. २१) सायंकाळी पुनरागमन केलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा, कोकण घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. काही महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने शेती व पिकांची धूळधाण झाली. विविध ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात सर्वाधिक १७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
टिटवी १५४.५, हिरडव १८५, पळशी बुद्रुक १५१ व जवळा बुद्रुक मंडलांत १७७.३ मि.मी. पाऊस पडला. वाशीम जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अपवाद वगळता बहुतांश भागात मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लावली. जालना व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता त्या दोन जिल्ह्यातील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका मात्र पावसाच्या हजेरीला अपवाद ठरला. या पावसामुळे खरिपातील पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यात मात्र पावसाचा जोर थोडा कमी होता.
परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत मंगळवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील १३ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील ३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त तर १ मंडलात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सुकू लागलेल्या पिकांना पावसामुळे जीवनदान मिळाले असले तरी अतिवृष्टी झालेल्या मंडलांतील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, केळी आदी पिकांमध्ये पाणी साचले, जमिनी खरडून गेल्या. उसाचे पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा यी तालुक्यांतील मंडलांत पावसाचा जोर होता. गंगाखेड, पालम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ४३.८ मिमी, तर जुलैमध्ये सरासरी १२४.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील मागील २४ तासांमध्ये सरासरी २९.७ मिमी, तर जुलैमध्ये आजवर सरासरी ११६.२ मिमी पाऊस झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असून कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. याशिवाय उर्वरित तालुक्यांमध्येदेखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सर्व नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यात भातरोप लागवडीला गती मिळाली आहे.आतापर्यत ४० हजार हेक्टरवर भातरोप लागवड पुर्ण झाली आहे. गेले अनेक दिवस किनारपट्टी भागात अपेक्षित पाऊस पडला नव्हता, परंतु गेल्या दोन दिवसांत या भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील तिलारी, गड, जानवली, शुक, भंगसाळ, शांती आदी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
तेल्हारा तालुक्यात बाप-लेक वाहून गेले
तेल्हारा तालुक्यात मनोज गवारगुरू व मुलगा वैभव गवारगुरू हे दुचाकीने जात असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले. वैभव याचा यात मृत्यू झाला. तसेच नद्यांना पूर आल्याने बाळापूर तालुक्यात अनेक रस्ते बंद होते. मन प्रकल्पातून मंगळवारी सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अकोट-देवरी-शेगाव रस्त्यावरील लोहारा गावाजवळील मन नदीच्या पुलावरून पाणी वाहिले. यामुळे हा मार्ग सकाळी नऊपासून बंद करण्यात आला होता. दुपारी पुलावरून प्रवाह कमी झाल्याने १२.३० च्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
वर्धा परिसरात पावसाची हजेरी
तेल्हारा तालुक्यात बाप-लेक वाहून गेले
विदर्भात अन्य जिल्ह्यांसह सांगली, परभणीत ढगाळ वातावरण
परभणी जिल्ह्यात दुधना नदीवरील सेलू-वालूर रस्त्यावरील राजेवाडी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
अकोला जिल्ह्यात अनेक मार्गांवरील वाहतूक बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.