Solapur News : सोलापूर जिल्ह्यात रविवारी (ता. ९) पावसाने विजांच्या कडकडाटासह सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर काही ठिकाणी शिवाराला तळ्याचे स्वरूप आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत थांबून-थांबून सुरूच होता. सोमवारीही (ता. १०) पुन्हा दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन असे वातावरण राहिले.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मॅान्सूनने ठरलेल्या वेळेआधीच आगमन केले. गुरुवारपासून (ता. ६) रविवारपर्यंत (ता. ९) रोज पावसाने हजेरी लावली. रविवारीही दिवसभर कडाक्याचे ऊन होते, पण सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात एकदम बदल झाला आणि पावसाला सुरवात झाली. मध्यरात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची मुसळधार सुरूच राहिली.
जिल्ह्यातील ९१ मंडलापैकी जवळपास सर्वच मंडलात पावसाने हजेरी लावत जोरदार सलामी दिली. जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १०२.५ मिमी आहे. पण आतापर्यंत गेल्या पाच दिवसांत जवळपास १३६.५ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील करमाळा, उत्तर सोलापूर, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.
पंढरपुरातील करकंब, रोपळे, तुंगत, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, हत्तूर, औराद, अक्कलकोटमधील चपळगाव, वागदरी, हुन्नूर, मोहोळमधील नरखेड, वाळूज, कामती, कुरुल, उत्तर सोलापुरातील वडाळा, नान्नज, मार्डी, तिऱेहे, पाथरी, करमाळ्यातील केम, वाशिंबे, पारेवाडी, केत्तूर, बार्शीतील वैराग, पानगाव, पांगरी आदी भागांत पावसाचा जोर राहिला. या भागांतील ओढे, नाले तुडुंब भरले, तर अनेक ठिकाणी शिवारात पाणी वाहू लागले. काही शिवारांना तळ्याचे स्वरूप आले. सोलापूर शहरातही रात्रीपासून सकाळपर्यंत जवळपास ८० मिमीहून अधिक पाऊस झाला. सोमवारी (ता. १०) पुन्हा दिवसभर कडाक्याचे ऊन होते. पण दुपारनंतर वातावरणात बदल होत राहिला. कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण राहिले.
मार्डी, टाकळी, मंद्रूप मंडलांत जोर
रविवारी (ता. ९) एका रात्रीत जिल्ह्यातील मार्डी (ता. उत्तर सोलापूर) मंडलात सर्वाधिक ५४.३ मिमी, दक्षिण सोलापुरातील मंद्रूपमध्ये ६३.३, बार्शीतील गौडगाव मंडलात ४७.५ मिमी, मोहोळ तालुक्यातील कामती मंडलात ६८९.५, टाकळी मंडलात ५६.३, माढ्यातील मोडनिंबमध्ये ४५.३, करमाळ्यातील कोर्टी मंडलात ५६.३ मिमी असा सर्वदूर पाऊस झाला.
उजनीत दीड टीएमसी पाणी वाढले
जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणक्षेत्रात आणि धरणाच्या परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होतो आहे. सध्या धरण उणे पातळीत आहे. पण सततच्या या पावसामुळे धरणाच्या वरच्या बाजूकडून साडेसहा हजार क्युसेक इतके पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे धरणात दीड टीएमसीने पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणात सोमवारी (ता. १०) पाण्याची एकूण पातळी ४८५.३१० मीटरपर्यंत राहिली. तर धरणातील एकूण पाणीसाठा ३२.९६ टीएमसी तर त्यापैकी उणे ३०.७० टीएमसी उपयुक्त साठा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी उणे ५७.३१ टक्के राहिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.