Kolhapur Rain Forecast : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस; ५ ठिकाणी विज कोसळली, दोन दिवस येलो अलर्ट

Heavy Rainfall Kolhapur : सुमारे ३ ते ४ तास पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी हलक्या सरी पडतच राहिल्या. रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून हलक्या सरी कोसळतच होत्या.
Kolhapur Rain Forecast
Kolhapur Rain Forecastagrowon
Published on
Updated on

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांपासून दररोज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी(ता.१८) सलग ४ तास झालेल्या पावसाने पाच ठिकाणी वीज कोसळली. कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क, उजळाईवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील पडळ व यवलूज या ठिकाणी वीज कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु सुमारे १ लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. दरम्यान हवामान विभागाने पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अंजली भानुदास मसराम यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे छताच्या भिंतीचा काही भाग कोसळून ५० हजारांचे नुकसान झाले. नागाळा पार्कातील नष्टे हॉलच्या मोबाईल टॉवरवर वीज कोसळली. त्या परिसरातील इमारतींचा वीज पुरवठा खंडित होऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाले.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भात, सोयाबीनसारखी काढणीला आलेली पिके हातभर पाण्यात तरंगू लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी सकाळच्या दरम्यान काही काळ ऊन पडले. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेबाराच्या दरम्यान धुवाधार पाऊस सुरू झाला. सुमारे ३ ते ४ तास पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी हलक्या सरी पडतच राहिल्या. रात्री उशिरापर्यंत हलक्या सरी कोसळतच होत्या.

दरम्यान, पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत थोडी वाढ झाली. इचलकरंजी व रुई येथील बंधारे पाण्याखाली गेले. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भुदरगड - ४४.८, राधानगरी - २३.४, आजरा - ४, शिरोळ - ३.८, पन्हाळा - ७, शाहूवाडी- ६.२, गगनबावडा - १९.३, करवीर - ७.६, कागल- २३.१, गडहिंग्लज - २९.७, आजरा - १६.६, चंदगड- १६.

Kolhapur Rain Forecast
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

चौदा गावांची वीज खंडित

पन्हाळा तालुक्यातील पडळ व यवलूज परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ठिकाणी वीज कोसळल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. चार पाच दिवस परतीच्या पावसाने विजेच्या लखलखाटासह थैमान घातले आहे. पडळ फाटा येथील महावितरणच्‍या उपकेंद्रातील उच्च दाबाच्या ३३ के.व्ही.च्या वीज वाहिनीवर वीज कोसळली. खांबावरील चिनी मातीचे उपकरण फुटल्याने १४ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. केंद्रातील कर्मचारी संजय सोळशे, अभिजित पाटील, राम जाधव, के. के. कांबळे, गोपी डिळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या वाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर करून १४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

पडळ दत्त मंदिराजवळील शेती पंपासाठी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर व यवलूज येथील विकासनगरमधील दत्त गल्लीत एकाच वेळी वीज कोसळली. तेथील डॉ. तुकाराम पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह पाच ते सहा नागरिकांचे सौरऊर्जा संच, टीव्ही संच व घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com