Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांमध्ये मागील काही तासांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. वाशीम जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. या जिल्ह्यात पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच तालुक्यांमध्येही दमदार पाऊस झाला असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
या मोसमात जुलै, ऑगस्ट महिन्यांत सातत्याने पावसाने हजेरी लावलेली आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले. आता सोयाबीन पिकाची कुठे फुलोर, तर कुठे शेंगाची परिपक्वतेची अवस्था सुरू आहे. अशा काळात सततचा पाऊस नुकसानकारक ठरू लागला आहे.
सखल भागात पिकात सातत्याने पाणी साचून असल्याने झाडांची मुळे कुजत आहेत. झाडे आपोआप वाळू लागली आहेत. काही भागात सूर्यप्रकाश न मिळाल्याने फळधारणेची शक्यता बरीच कमी झाली. आता पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने नुकसानाची पातळी वाढत आहे.
गेल्या २४ तासात वाशीम जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस नोंद झाला. वाशीम ४८, रिसोड ४१.८, मालेगाव ४२.६ तालुक्यांमध्ये अशी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यात राजगाव ७८, वारला ७२, केकतउमरा ६०, मोप ७२, कवठळ ६८.३, इंझोरी ६८.३ मिलिमीटर पाऊस झाला. अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात टिटवी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. तेथे ७५ मिलिमीटर पाऊस पडला.
प्रकल्पातून विसर्ग
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा व वाण या दोन्ही प्रमुख प्रकल्पांत साठा वाढत चालला आहे. काटेपूर्णामध्ये ८२.३४ दलघमी (९५.३६ टक्के) साठा झाला आहे. वाण प्रकल्पात ७३.४८ दलघमी (८९.६५ टक्के) साठा बनलेला आहे.
या दोन्ही प्रकल्पांचे दरवजे उघडण्यात आलेले असून नदीपात्रांमध्ये विसर्ग सुरू आहे. यामुळे काटेपूर्णा, वाण या दोन्ही नद्यांना पूर वाहत आहे. पूर्णा नदीही दुथडी भरून वाहत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त साठा २९.७९ दलघमी झालेला आहे. नळगंगामध्य २७.८५ दलघमी आणि पेनटाकळीचा साठा ३१.३२ दलघमी बनलेला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.