
Chh. Sambhajinagar News : हवामान बदल विषय १९८८ पासून पुढे आला. पृथ्वीचे एकूणच तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. उष्णता वाढल्यामुळे आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांचाही समावेश असल्याचे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. १७) ‘उष्णतेशी लढा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये श्री. देऊळगावकर बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हवळ, डॉ. अविनाश गरुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच शाश्वत अधिवास विभाग सेंटर फॉर सायन्स ॲण्ड डेव्हलपमेंटच्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मीनाक्षी सिंह, सार्वजनिक आरोग्य चळवळ तज्ज्ञ डॉ. अनंत फडके, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुकास्तरीय अधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
श्री. देऊळगावकर म्हणाले, की पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी झाला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढू लागला आहे. अशा या उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की पुढच्या पिढीला शुद्ध हवा, पाणी मिळावे यासाठी प्रत्येकाने किमान १० रोपे लावण्याचा व जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी उष्माघात आणि त्यामुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम, त्यावरील उपचार या विषयी शास्त्रीय माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी वाढत्या तापमान समस्येचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असे सांगितले. प्रास्ताविक मारुती म्हस्के यांनी केले. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
शासकीय कार्यालयांना सौरऊर्जेची जोड
जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेवर वीजपुरवठा करण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.