डॉ. एस. एस. खडबडी, डॉ. शारदा देवरे
Healthy Ashwagandha : अश्वगंधा ही वनस्पती रोगप्रतिकारक असून मेंदूमधील चेतापेशी पुनरुत्पादन म्हणून कार्य करते. अस्थिमज्जेचा स्तर वाढवतो.वृद्धत्व रोखण्याचे कार्य करते. सर्दी, खोकला, अशक्तपणा, ताप, वेदनादायक सूज, क्षयरोग, कर्करोग,
हाडांची कमकुवतता, चिंता, वृद्धापकाळ, स्नायू कमकुवतपणा, निद्रानाश इत्यादींमध्ये या वनस्पतीच्या विविध भागांचा वापर केला जातो. अश्वगंधाची पाने, मुळांचे किंवा फळांपासून पावडर, चूर्ण, काढा, रस, बिस्किटे, कुकीज, लोणचे, सॉस निर्मिती शक्य आहे.
वनस्पती परिचय
अश्वगंधा ही एक अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदिक उपचारांसाठी या वनस्पतीचा वापर होतो.
या वनस्पतीला वैज्ञानिक भाषेत ‘विदानिया सोम्निफेरा’ (कुल सोलॅनेसी) आणि इंग्रजीत ‘विंटर चेरी’, 'इंडियन जिनसेंग' असे म्हणतात.
तणाव दूर करून उत्साह निर्माण करणाऱ्या औषधी वनस्पतीला बाजारात मागणी वाढत आहे. याची मुळे आणि पाने पारंपरिक आयुर्वेद, युनानी, सिद्धा औषध पद्धतीत वापरली जातात.
कोरोना काळात उपचारासाठी ही वनस्पती फायदेशीर ठरल्याचे आयुष मंत्रालयाच्या प्रकल्पातील आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे.
वनस्पतीच्या विविध भागांत अल्कलाइड, स्टिरॉइड्स यासारखे अनेक रासायनिक घटक असतात.
लागवडीसाठी पोशिता, रक्षिता, जवाहर अश्वगंधा २०, जवाहर अश्वगंधा १३४, नागोरी, गुजरात आनंद अश्वगंधा, राज विजय अश्वगंधा १०० या जातींची शिफारस करण्यात आली आहे.
पीक उत्पादन
भारताचा वायव्य भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणी आढळते. या वनस्पतीची पावसाळ्यात लागवड केली जाते.
५००-७५० मिमी पर्जन्यमान असलेले अर्धशुष्क उष्णकटिबंधीय प्रदेश या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे. चांगला निचरा असलेली, वालुकामय, हलका पोत, लाल, पांढरा काळ्या जमिनीत ही वनस्पती चांगली वाढते. जमिनीचा सामू ५.५ ते ८ च्या दरम्यान असेल तर चांगले उत्पादन मिळते.
साधारणत: १० ते १२ किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. या पिकाला सेंद्रिय खतांचा चांगला वापर करावा.
जेव्हा पाऊस नसेल तेव्हा गरजेनुसार १५ ते २० दिवसांतून एकदा हलके सिंचन करावे.
लागवडीनंतर १२० ते १५० दिवसांत पीक काढणीला येते. पाने वाळणे आणि फळांचा लालसरपणा पिकाची परिपक्वता दर्शवितो. संपूर्ण वनस्पती उपटून मुळांची स्वच्छता केली जाते. मुकुटापासून १ ते २ सेंमी वर खोड कापून मुळे स्वच्छ केली जातात.
७ ते १० सेंमी लांबीचे तुकडे करून पूर्णपणे उन्हात वाळवावे लागतात. मुळांच्या आकारानुसार छाटणी करणे फायदेशीर ठरते. परिपक्व फळे तोडून वाळवतात. त्यानंतर बियाणे स्वच्छ करून साठवणूक करावी.
साधारणपणे कोरडवाहू मुळांपासून एकरी ४०० ते ६५० किलो व एकरी ५० ते ६० किलो बियाणे मिळते. गुणवत्तेनुसार दर मिळतो.
पानांचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून केला जातो. बियाणे आणि पाने विकून अतिरिक्त परतावा मिळवता येतो.
डॉ. शारदा देवरे, ९७६६५७७६४६ (शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.