Sugarcane Juice Benefits : उसाच्या रसाचे आरोग्यासाठी फायदे

Sugarcane Juice : उसाच्या रसात भरपूर पोषक तत्त्वे असतात. यामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, झिंक, थायमिन, रिबोफ्लेविन हे घटक असतात.
Sugarcane Juice
Sugarcane JuiceAgrowon

प्रीती भोसले, डॉ. व्ही. एस. पवार

Health Benefits of Sugarcane Juice : उसाच्या रसात भरपूर पोषक तत्त्वे असतात. यामध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, झिंक, थायमिन, रिबोफ्लेविन हे घटक असतात. २४० मिलिलिटरच्या एका ग्लास उसाच्या रसात १८० कॅलरीज, ३० ग्रॅम साखर असते. फ्लाव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलिक कम्पाउंड्ससारख्या अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे आरोग्य चांगले राहते. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होते.

आरोग्यदायी फायदे

उसामध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा देते. शरीरातील ग्लुकोजची पातळी पुन्हा सामान्य करण्यास मदत होते. शरीरातील थकवा दूर होतो. किडनीचे कार्य चांगले राहते.

रसामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही खनिजे भरपूर असतात. ही खनिजे दातांची इनॅमेल मजबूत करून त्यांना खराब होण्यापासून वाचवतात. रसामधील पोषक घटक कमतरतेमुळे होणारी तोंडाला येणारी दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

Sugarcane Juice
Sugarcane Juice : आरोग्यवर्धक ऊस रसाचे मूल्यवर्धित पदार्थ...

रसामधील अँटिऑक्सिडंट्स यकृताला संसर्गापासून वाचवतात. बिलीरुबीनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. रसातील घटक आजारापासून लवकर बरे होण्यासाठी आवश्यक प्रथिने आणि पोषक घटक शरीराला पुन्हा देतात.

रस प्यायल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहण्यास मदत होते. पोटॅशिअम पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते. तसेच पोटाच्या संसर्गापासून बचाव करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

रस ज्वर येणाऱ्या तापाच्या समस्यांवर म्हणजेच ‘फेब्राइल डिझॉर्डर’वर उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या आजारामध्ये व्यक्तीला ताप येते, झटके येणे आणि शरीरातील प्रथिने कमी होणे हे त्रास होतात. ही समस्या विशेषत: लहान बाळ आणि मुलांमध्ये जास्त दिसून येते. रस शरीरातील कमी झालेल्या प्रथिनांची भरपाई करण्यास मदत करतो आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देतो.

रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी आम्ल असतात. त्यापैकी ग्लायकोलिक आम्ल हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आम्ल त्वचेची चमक वाढवण्यास मदत करते. डाग, मुरूम यांसारख्या समस्यांवर रस गुणकारी ठरतो. तसेच त्वचा लचकदार आणि तरुण ठेवण्यासही मदत करते.

Sugarcane Juice
Sugarcane Juice : उसाचा रस शेतीमाल नाही; लागणार १२ टक्के जीएसटी

उसामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रस प्यायल्याने पचनसंस्थेच्या तक्रारी, यकृताच्या समस्या, श्‍वसनाचा संसर्ग यांसारख्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. जळजळ कमी करण्यासही मदत करते. शरीरातील बिलीरुबिनच्या स्तरावर नियंत्रण ठेवण्याचे कामही अँटिऑक्सिडंट्स करतात.

रसामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सुक्रोज (साखर) असते. जखमा लवकर भरवून निघण्यास ही साखर उपयुक्त ठरते. जखमेवर थेट उसाचा रस लावल्यानेही बरे होण्यास वेग येतो.

रसामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशिअम यांसारखी खनिजे असतात. ही खनिजे हाडांची वाढ आणि मजबुतीसाठी आवश्यक असतात. नियमित रस पिल्याने हाडांची घनता राखण्यास मदत होते. त्यामुळे वयाच्या वाढीबरोबर हाडांच्या समस्या येण्याचा धोका कमी होतो.

प्रीती भोसले ८७६७९२०३८४

(अन्न प्रक्रिया विभाग, अन्नप्रक्रिया महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com